वाढदिवस म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर रंगीत फुगे, सजवलेला हॉल, पाहुणे, मित्र मंडळी यांची वर्दळ, मोठ्ठा केक, हॅप्पी बर्थडे चे गाणे, शुभेच्छा, मस्त मौज मजा, खाणे पिणे असेच चित्र येते.
पण काही संवेदनशील, सामाजिक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या व्यक्ती अशा पारंपरिक बाबी ला छेद देऊन जेव्हा आपला वाढदिवस साजरा करतात, तेव्हा खरंच त्यांच्या विषयी आदर वाटू लागतो. मूळ यवतमाळ येथील पण आता पुणे येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर असलेल्या, माझे सहकारी निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्री रणजितसिंह चंदेल आणि सौ कमलाताई चंदेल यांच्या अभिजित या मुलाने थाटामाटात वाढदिवस साजरा न करता यवतमाळ जिल्ह्यातील उमरी (पठार) या गावात असलेल्या संत दोला महाराज वृध्द आश्रमातील १६० आजी आजोबांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी अभिजितचे आई वडील, पत्रकार श्री राजकुमार भितकर, संतोष दास, श्री जयप्रकाश डोंगरे आदी मित्रमंडळी ही उपस्थित होती.
‘यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी (पठार) येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांना दिली जाणारी सेवा ’अनमोल’ असून तिची दुसर्या कोणत्याही गोष्टीशी तुलना करता येत नाही’, असे मत सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह चंदेल यांनी नुकतेच व्यक्त केले. ते वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत दोला महाराज वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे होते.
श्री चंदेल पुढे म्हणाले की, ‘या वृद्धाश्रमात आजच्या घडीला १६० महिला व पुरुष वृध्द वास्तव्यास आहेत. गेल्या ३० वर्षांपूर्वी या वृद्धाश्रमाची स्थापना झाली. तेव्हापासून वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे समर्पित भावनेने वृद्धांची सुश्रृषा व सेवा करीत आहेत. आता त्यांचे चिरंजीव जयप्रकाश डोंगरे यांनी या सेवेला वाहून घेतले आहे. या माध्यमातून डोंगरे पितापुत्र मानवसेवेचेच कार्य करीत आहेत. त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे.’
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पत्रकार श्री राजकुमार भितकर यांनी, वृद्धाश्रमाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थापक शेषराव डोंगरे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तीस वर्षांपूर्वी त्यांनी उमरी (पठार) या गावी संत दोला महाराज वृद्धाश्रम स्थापन केला. वेळप्रसंगी वृद्धांच्या सेवेसाठी स्वत:ची जमीन विकली, पत्नीचे मंगळसूत्र विकले. परंतु, वृद्धांची आबाळ होऊ दिली. आज मुलांना आपले वृद्ध आई-वडील पोसणे जड जाते, त्याठिकाणी डोंगरे पितापुत्र 160 वृद्धांची माता पित्याप्रमाणे सेवा करतात. हे कार्य अतुलनीय असल्याचे मत श्री भितकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री जयप्रकाश डोंगरे यांनी केले. यावेळी सौ कमलाताई चंदेल, सत्कारमूर्ती श्री अभिजित चंदेल, श्री संजीव भितकर, श्री संतोष दास आणि सर्व आश्रमवासियांची उपस्थिती होती.
श्री अभिजित चंदेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदेल कुटुंबीयांनी यावेळी वृद्धाश्रमाला १० हजार रुपयांची भेट दिली. वृद्धाश्रमातर्फे शेषराव डोंगरे यांनी श्री अभिजित चंदेल यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अभिजित व त्याच्या परिवाराने आगळ्या वेगळ्या वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या पोर्टल तर्फे ही अभिजित ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800