टोकियो स्काय ट्री
ट्री म्हणजे झाड, हे आपल्याला माहिती आहे.त्यामुळे ओसाका हून आल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा आता आपल्याला “टोकियो स्काय ट्री” पहायला जायचं आहे असे सांगण्यात आले, त्यावेळी उंचच उंच असे पुरातन, आकाशाकडे झेपावलेले एखादे झाड पहायचे आहे, असेच मला वाटले. पण तिथे जाऊन पहातो तर काय ? तिथे उंचच उंच असा टॉवर बघायला मिळाला. कदाचित आधी उभारण्यात आलेल्या टॉवर ला टोकियो टॉवर असे नाव देण्यात आले असल्यामुळे नवीन काही तरी, नाम साधर्म्य नको म्हणून या टॉवरला टॉवर न म्हणता स्काय ट्री असे नाव देण्यात आले असावे !
या टॉवर वर वेगवेगळ्या टप्प्यांवर जायला लिफ्ट आहे. अर्थात तिकीट काढूनच जावं लागतं. आम्ही गेलो तो दिवस नेमका रविवार असल्याने गर्दी प्रचंड होती. कदाचित नेहमीच रहात असावी. लिफ्ट सुध्धा एखाद्या खोली इतक्या मोठ्ठ्या म्हणजे दहा बाय दहाच्या आकाराच्या, एकावेळेस २०/२२ माणसं मावतील इतक्या मोठ्या आहेत. टॉवर गोलाकार असल्याने प्रत्येक ठिकाणी गोल फिरून सर्व टोकियो शहर आपल्याला पाहता येते.
इथे पर्यटकांना भुरळ पाडून छायाचित्रं घेण्याची सोय आहे. त्यामुळे आधी येऊन गेलेल्या पर्यटकांची मोठ मोठी आकर्षक छायाचित्रं जागोजागी लावण्यात आली आहेत. साहजिकच ती पाहून नव्याने येणारे पर्यटक आपापली छायाचित्रे काढून घेतात.
आम्ही मात्र, आमच्या मध्यमवर्गीय स्वभावाला जागून काही ठिकाणी एकमेकांची छायाचित्रे 📷 काढली.
तर काही ठिकाणी सेल्फिज घेण्यात धन्यता मानली ! त्यात परत स्मरण म्हणून विक्रीस ठेवलेल्या वस्तू विकत न घेऊन, पैश्यांची आणि पुढे घरात गेल्यावर जागा अडविणाऱ्या वस्तूंचीही खरेदी आम्ही केली नाही. 😄
अशा प्रकारे टोकियो स्काय ट्री वर चढून उतरून खाली आल्यावर कळाले की, आम्ही आलेल्या बसची उंची जास्त असल्याने ती तळघरातील पार्किंग लॉट मध्ये येऊ शकत नाही. आम्ही खूपच थकलो होतो त्यामुळे जेथे ती बस येऊ शकली, त्या जागेपर्यंत आम्ही चरफडत पोहोचलो आणि पुढच्या ठिकाणी, म्हणजेच “टीम लॅब” ही अत्याधुनिक कला अनुभवयाला निघालो.
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800
स्काय ट्री टॉवर प्रमाणेच आपल्या लेखांची उंची वाढत राहो हीच शुभेच्छा