टीम लॅब प्लॅनेट
आता तुम्ही म्हणाल, “टीम लॅब प्लॅनेट” ही काय भानगड आहे ? तर खरंच ही खूपच अत्याधूनिक भानगड आहे. कारण लॅब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते शाळेतील प्रयोगशाळा किंवा वयोमानानुसार प्याथोलॉजी लॅब ! आणि टीम म्हटले की एखादी क्रिकेट किंवा अन्य कुठल्या तरी खेळाची टीम डोळ्यासमोर येते.
पण या टीम लॅब प्लॅनेट च्या दर्शनी भागात लिहिलेले होते की या आणि “अत्याधुनिक कला अनुभवा” ! आता कला म्हटले की, आपल्याला चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, अभिनय कला, संगीत कला अशा पारंपरिक कलाच आठवतात. त्या आपण पाहून, ऐकून त्याचा आनंद घेतही असतो. पण अत्याधुनिक कला अनुभवा, म्हणजे नेमके काय अनुभवायला मिळेल या विषयी मला खूपच कुतूहल वाटत होते.
त्या भव्यदिव्य लॅब च्या आत पाऊल टाकता क्षणीच लक्षात आले की, आजच्या अत्याधुनिक, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात कला या पारंपारिक कलांपुरत्याच मर्यादित राहिल्या नसून त्या खुप पुढे निघून गेल्या आहेत. “कलेत स्वतःला विसरून जा”, असे सांगणारी ही आधुनिक कला आम्हाला येथेच “अनुभवायला” मिळाली. अमेरिकेत सुध्धा असेल पण कुठे दिसली नाही !
तर चला, आता आपण आम्हाला आलेले अत्याधुनिक कलेचे “अनुभव ” वाचू या आणि पाहू या सुद्धा !
टीम लॅब प्लॅनेट चे बाह्य स्वरूप पाहून आपण आत कुठली, कशी कला अनुभवणार आहोत, स्वतःला या कलेत कसे हरवून बसणार आहोत, याची जराशीही कल्पना आपल्याला येत नाही. तेथील दिल्या जाणाऱ्या सूचना अमलात आणून तर आणखीनच गोंधळल्या सारखे होते. सगळ्यांनी पँट गुडघ्या पर्यंत वर केल्या आम्हीं सुध्दा मग तेच केले.
तर दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही पादत्राणे, सर्व बॅगा, पर्सेस तेथील लॉकर मध्ये सर्व ठेवले आणि सुरू झाले एकेक अद्भुत अनुभव….
प्रथम अनवाणी चालत असताना एक चढ लागला. थोड्याच वेळात पायांना पाणी लागले. पाय भिजवत भिजवत आम्ही तो चढ चढून वर आलो. खरेतर आम्हीं टोकियो स्काय ट्री बघून खूपचं थकलो होतो. पाय तर खुप दुखत होते, पाय पाण्यातून बाहेर आल्यावर थकवा खूपचं कमी झाला होता आणि आता काय बघायला मिळणार ही उत्सुकता तर होतीच. तर व्ही आय पी ट्रीटमेंट प्रमाणे लगेच पाय पुसण्यासाठी छोटे छोटे टॉवेल मिळाले.
पुढच्या अनुभवात, गुढगाभर स्पंजच्या गादीतून स्वतःला सावरत, अक्षरशः उड्या मारत मोठा हॉल पार करण्याची कसरत करावी लागली. आपण पडतो की काय, असे सारखे वाटत होते. भीतीने अलका तर मोठमोठ्याने ओरडायला लागली. इतर बऱ्याच जणांची अवस्था अशीच काहीशी झाली होती.
बरे तर बरे, अलका ने माझा हात धरला होता म्हणून. त्यामुळे ओरडत, किंचाळत का होईना तिने माझ्या साथीने तो हॉल पार केला. ज्यांना ते दिव्य पार पाडायचे नव्हते त्यांनी सरळ सोपा पर्यायी मार्ग निवडला.
हा हॉल पार पाडल्यानंतर एकदम दिवाळीला आपण लावतो तशा छोट्या छोट्या दिव्यांच्या, उंचच उंच माळा लागल्या. चालू बंद होणाऱ्या, रंग बदलणाऱ्या या दिव्यांच्या माळातून रस्ता शोधत आपण पुढे जात राहायचे. कधी चुकतो, तर कधी बरोबर रस्ता सापडतो. एक प्रकारचा हा रंगीत भूलभुलैया च आहे म्हणाना.
एकदाचा हा टास्क पूर्ण केल्यावर पुढचा टास्क येतो. इथे छतावर आपल्याला फुलेच फुले दिसतात. तिथे आपण आपल्याला फरशी वर झोकून द्यायचे. सर्वत्र पूर्ण काळोख असतो. पालथे पडून वर छताकडे पाहताना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येणारी फुले पाहून आपण आपल्याला पूर्णपणे विसरून जातो. असे वाटते, जीवनात ही घडी अशीच राहू दे !
तिथून पुढच्या दालनात गेलो की, दोन्ही हातात न मावणारे फुगे भेटतात. आपण त्यांना कितीही मारा, डोक्यावर घ्या, काही ही करा, ती आपल्या सोबत खेळत बसतात. शेवटी आपण थकतो, पण त्या फुग्यांना किंवा बॉल ना काही होत नाही !
हे दालन ओलांडून आपण पुढे जातो तर, सारखे वरून खाली व खालून वर येणारी बागेतील फुले आपल्याला दिसतात. तिथेही आपण स्वतःला फरशी वर झोकून द्यायचे आणि वरून खाली, खालून वर येणारी फुले पहात स्वतःला विसरून जायचे, असा हा खेळ !
नंतर एक डिजिटल उद्यान लागते. ते हुबेहूब खऱ्या उद्यानासारखे वाटते. हे उद्यान नकली आहे, असे वाटतच नाही. काही लोक बसतात तर काही सरळ पडून राहून गम्मत अनुभवतात.
खरोखरच स्वतःला कलेत विसरून जा, असे जे सुरुवातीला म्हटले आहे, त्या अनुभवाची अनुभूती अलौकिक अशीच आहे.
अशी ही अत्याधुनिक कला, स्वतःला विसरायला भाग पाडणारी, दुसऱ्या कुठल्या तरी विश्वात नेणारी अनुभवताना काही जण खुप आनंदित होतात, तर काही जण खूप भयचकित !
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️+91 986948484800