“मुलं जमिनीवरचे तारे” हा बालकाव्यसंग्रह गोविंद पाटील यांचा असून अथर्व प्रकाशन जळगाव यांनी तो प्रकाशित केलेला आहे .
प्रस्तुत काव्यसंग्रहात विविध विषयांवरील बालकवितांचा समावेश आहे .बालभाव विश्वाचे विविध कंगोरे या संग्रहातून प्रकट झाले आहेत. मुलांचे बदलते भाव विश्व नेमकेपणाने या संग्रहात टिपले गेले आहे. डिजिटल युगातील ही बालके आता संगणकामध्ये रमत आहेत .तथापि त्यांच्या बालभाव विश्वात अजूनही हत्ती आहे, फुलपाखरू आहे, कोकिळा आहे, उंट आणि घोडा आहे. प्राण्यांचीही शाळा आहे.
अत्यंत प्रासादिक अशा बाल सुलभ भाषेचे उपयोजन गोविंद पाटील यांनी या संग्रहामध्ये केलेले आहे. सर्व कविता लयबद्ध आहेत. छोटी छोटी वाक्ये, बालसुलभ प्रतिमा व प्रतीके, दैनंदिन जीवनातील दाखले यामुळे हा संग्रह बालवाचकांच्या पसंतीस उतरला नाही तरच नवल.
प्राण्यांची शाळा मधील मौज तर वाखाणण्याजोगीच आहे. त्यातील कवी कल्पना खासच आहे. कवीचे बालभाव विश्वाशी घडून आलेले तादात्म्य येथे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. अदभूत रम्यतेची बालकांची आवड लक्षात घेऊन सर्वच कवितांची निर्मिती कवी गोविंद पाटील यांनी केली आहे. वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन पुस्तकं ओरडतात बरं या कवितेत येते.
जळगाव जिल्हयाची वैशिष्टये सांगणारी कविता प्रांत प्रेमास उद्युक्त करते . मेहरूण तलाव ही कविता देखील परिसराचा अभिमान जागृत करते. धाडसी सीमा या कवितेतून मुलामुलींना संकट समयी काय करावे ते सांगितले आहे. बाल वाचकांच्या मनात प्लॅस्टिक वेचणाऱ्या मुलांच्या बद्दल सहवेदना जागृत करण्या सोबतच शिक्षणावरील श्रद्धाही दृढ करणारी कविता लक्षणीय होय.
घे भरारी सारख्या कविता प्रबोधनमूल्य असलेल्या आहेत. लहानपण दे गा देवा ही कविता नॉस्टॅल्जिक आहे. वाघूर नदीबद्दलच्या आठवणी तिच्या केंद्रस्थानी आहेत. शूर गार्ड ही कविताही त्याच प्रकारातील आहे. मित्र प्रेम, दिव्यांगांबाबत संवेदना, मराठी भाषा प्रेम, गुरुऋण या आशयाच्या कवितांनी हा संग्रह वाचनीय बनवला आहे.
मोबाईल मधून बाहेर पडून मैदानी खेळ खेळण्याचे आवाहनही या संग्रहातून कवी करतो. फौजी होण्याचे स्वप्न pकवी बालकांना दाखवतो. एक प्रकारे सुसंस्कार करण्याचीच भूमिका या संपूर्ण संग्रहातून कवीने घेतल्याचे दिसते. संगणक जशी माझी आई भाऊ बहिण आहे तशीच शेती ही माझी माऊली आहे हे आंतरिक अद्वैत कमालीचे रंजक आहे. मुलांना संगणका इतकेच ममत्व काळ्या मातीबद्दल वाटले पाहिजे ही तळमळ महत्त्वाची आहे.
स्मरणरंजन करणाऱ्या कवितांत पाथरी गावाचा बस थांबा येतो. माझी शाळा येते. पाथरी गावाचा हत्ती डोंगर येतो. माय मराठीचा आग्रह एका कवितेत येतो. कुतुहलातून पडलेले प्रश्न खारूताई कवितेत येतात. गायी अचानक घरी येतात, घाबऱ्याघुबऱ्या होतात, आनंदाने उडया मारतात हे निरीक्षण व त्याची कारणे वाचकांना थक्क करतात. शाकाहारी होण्याचा अप्रत्यक्ष संदेश एका कवितेतून दिला जातो.
पालकाची भाजी असावी ताजी आणि बीट खा धीट व्हा या कविता म्हणजे आकर्षक घोषवाक्यांचा नमुना आहे.
जो खाईल कांद्याची पात करेल तो आजारांवर मात (पृ .७२)
जो खाईल वांगी,
शरीर औषध नाही मागी (पृ .७३)
ही ती उदाहरणे होत.
मायबापावरच्याही कविता या संग्रहात आहेत. बाप समजून घ्यावा लागतो (पृ .७४) आणि माय असावी सर्वांना . नको पोरकी कोणी बालके (पृ ७५) या ओळी अर्थसमृद्ध आहेत.
आमच्याशी संवाद करा ना या कवितेतील चित्र घराघरात आहे. पैशांच्या मागे धावणारी पालकांची पिढी आणि त्यांच्या प्रेमाला आसुसलेली घरातील बालकांची पिढी हे द्वैत या कवितेच्या केंद्रस्थानी आहे.
चिमणीला पाणी ठेवूया या कवितेतून भूतदयेचा संदेश आणि संस्कार कवी करतो.
काही कविता सामान्य आशयाच्या आहेत. एखाद दुसऱ्या कवितेचा शेवट विसंगत आहे. प्रमाण लेखनाच्या चुका काही कवितात आहेत. उपमांचे दुर्भीक्ष्य आहे. या किरकोळ त्रूटी वगळता रंजन, प्रबोधन, सुसंस्कार करणारी ही कविता आहे.
— परीक्षण : डॉ फुला बागूल. शिरपूर
— संपादन:देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800