Friday, November 22, 2024
Homeलेखमाझी जडण घडण : ५

माझी जडण घडण : ५

हे देखील करायला हवे…

“..भांडता सुद्धा आलं पाहिजे. आपली बाजू प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. भांडण करणं म्हणजे दादागिरी करणं, दहशत निर्माण करणं, अथवा उद्धटपणा दाखवणं असा अर्थ नव्हे. आपली अस्मिता विनाकारण दुखावली गेली अथवा पणाला लागत असेल तर भक्कमपणे बोलणं आपल्याला जमलं पाहिजे.” असं पपा नेहमी सांगायचे.

एकीकडे शालीनता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असं न बोलणं, अशा तर्‍हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘”तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे हं !!” असं जेव्हां पपा सांगायचे तेव्हां या विरोधाभासाची मला नुसती गंमतच नव्हे तर आश्चर्यही वाटायचं. पण त्याचा प्रत्यय लवकरच यायचा होताच !

एकदा गणिताच्या पेपरात, वेगळ्या पद्धतीने गणित सोडवल्यामुळे, उत्तर बरोबर असतानाही त्या उदाहरणाला बाईंनी मला मार्क्स दिले नाहीत. परिणामी त्या दोन मार्कांनी माझा क्रमांक एकाने खाली गेला. मी खूप खट्टु झाले होते. माझ्या पद्धतीने यथाशक्ती मी गणिताच्या बाईंना “माझे मार्कस उगीच कमी केले” असल्याचे निदर्शनास आणून दिले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बाईंची प्रतिक्रिया शून्य होती. मी आपली “जाऊ दे” या मोड मधेच राहिले. गेला नंबर मागे तर गेला.. असं मुळमुळीत धोरण धरुन गप्प बसले. तेव्हां पपा म्हणाले, “प्रश्न गुणानुक्रमाचा नाहीय्. तुला जर खात्री आहे, तुझं गणित बरोबरच आहे तर ते पटवून देण्यात कमी का पडावंस ? तू मुख्याध्यापिकांना सांग.” तर मी त्यांना म्हणाले, “पपा, तुम्ही भेटाल का त्यांना ? एकदम मुख्याध्यापिकांना ? भेटायची मला भीती वाटते.”
“नाही मी नाही भेटणार त्यांना. हे तुलाच करायचेय्. हा तुझा प्रश्न तुलाच सोडवायचाय्. आधी पटवून देण्याचा प्रयत्न कर, नाहीतर भांड त्यांच्याशी तुझ्या हक्काच्या मार्कांसाठी. काही हरकत नाही.” पपा म्हणाले.
“पण पपा त्यांनी मला बेशिस्त वर्तनासाठी शिक्षाच केली तर ?.”
“बघूया.” पपा एव्हढच म्हणाले. पण एक पलीता पेटवला होता मनात.

मग मी भीतभीतच, दुसर्‍या दिवशी माझा गणिताचा पेपर घेऊन मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये गेले. तशी शाळेत वर्गाच्या कामानिमीत्त मी अनेक वेळा इथे आले होते. डेंगळे बाई चांगल्या स्वभावाच्या होत्या. प्रेमळ, समंजस, रागवायच्या पण तरी आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. पण यावेळी कारण वेगळं होतं. म्हणून फार दडपण आलं होतं. पाऊल पुढे मागे होत होतं. “जाऊच दे” वाटत होतं. पपा काहीही सांगतात,मदत तर करत नाहीतच म्हणून त्यांचाही थोडासा रागच आला होता मला .पण नेहमीप्रमाणे त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्ण झाक माझा विश्वास बळावत होती. माघार का ? हेही बळावत होतं.
मग मी धैर्य गोळा करुन डेंगळे बाईंना माझी समस्या सांगितली. “मला वर्गात शिकवलेल्या पद्धतीनेही गणित सोडवता येत होतं पण ही पद्धत थोडी कमी लांबीची व सोपी वाटली म्हणून मी ती वापरली” वगैरे सर्व मी त्यांना पटवून दिले.मग मुख्याध्यापिका डेंगळे बाईंनी ! बिजगणिताच्या बाईंना बोलावून घेतलं. मला जायला सांगितलं. “मी बघते काय ते” असंही म्हणाल्या.

दुसर्‍या दिवशी गणिताच्या बाईंनी माझे प्रगती पुस्तक मागवले. पेपरातले दोन मार्क्स वाढवले आणि वरचा क्रमांकही दिला. मला न्याय मिळाला. माझ्या बोलण्याचा उपयोग झाला. पण माझी मैत्रीण जिचा वरचा नंबर मिळाल्याचा आनंद माझ्यामुळे लोप पावला, ती नाराज झाली. मी थेट मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली म्हणून गणिताच्या बाईंनीही राग धरला. त्यावेळी सर्व वर्गच, “स्वत:ला काय समजते” या भावनेनी माझ्याशी वागत असल्याचं जाणवलं. काही दिवस हे वातावरण राहिलं.

आजही मनात गुंता आहे.
मी केलं ते बरोबर की चूक ?
त्या वेळच्या कारणाची धार आता जरी बोथट झाली असली तरी योग्य ठिकाणी योग्य ते बोलायला कां घाबरायचं ?
हे एक सूत्र पुढे अनेक वेळा संरक्षक शस्त्र जरुर बनलं. अनेक संघर्षाच्यावेळी, अडचणीच्या वेळी त्याने साथ दिली हे मात्र खरं…..
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments