शनिवार… २९ जून
शुक्रवारी ठिकाण शोधून, बॅचेस वगैरे घेऊन, ब्रेकफास्टचा हॅाल शोधेपर्यंत आम्हाला जरा उशिरच झाला होता. पण शनिवारी आम्ही जरा लवकर मुख्य ठिकाणी पोहोचलो.
आज जातांना काही मधल्या पॅसेज मधले स्टॅाल्स पाहिले. चितळे बंधू, बेडेकर, पीएनजी, इतर काही खाद्य पदार्थांचे स्टॅाल्स, ग्रंथाली पुस्तकांचा, काही सेवाभावी संस्थाचे स्टॅाल्स होते. कपडे, दागिने साड्या इथेही खूप गर्दी दिसत होती.
मधल्या वेळात भेट देऊ ठरवून पोटपूजा करायला गेलो. तिथे अनेक जणं ओळखीची भेटली.शाळेतली, ग्रूपवरची, वाशीच्या मराठी विश्वसंमेलनात भेटलेली ! खूपच छान वाटले.
BMM येणाऱ्यांची ओळख होण्यासाठी, कार्यक्रमाची माहिती, कुठल्या हॅालमध्ये कुठला कार्यक्रम हे सांगण्यासाठी एक ॲप डाऊन लोड करायला सांगितले होते. त्याचा फायदा झाला. वेगवेगळे ग्रूप तिथे दिसले. संपर्क करायला सोपे गेले. त्या भेटलेल्या व्यक्तींशी गप्पा मारत, उपमा, साबुदाणावडा, नारळवडी, चहा घेतांना मजा आली.
आम्हा सिनीयर लोकांसाठी वेगळा हॅाल होता. तिथे मुलं नव्हती. पण मुलांसाठी त्यांच्या आवडीचे पॅनकेक, सिरीयल, फ्रुटज्यूस, मफिन्स असे वेगळे पदार्थ त्यांच्या हॅाल मध्ये होते.
आम्ही टेबलाशी बसून आज कुठले कार्यक्रम पहायचे ते ठरवले. काल वाटले हा ही कार्यक्रम पहावा, तो ही थोडा पहावा.. त्यासाठी काही अर्धेच पाहिले गेले. एका हॅाल पासून दुसरा शोधत जाईपर्यंत काहींची सुरवात गेली. थोडे दमायलाच झाले. पण आज सगळे हॅाल कुठे ते नक्की कळले होते. लिफ्ट, एस्कीलेटर कुठे आहे, चहा कॅाफी कुठे, कधी आहे ते कळल्यामुळे आम्ही थोडेच पण आवडीचे कार्यक्रम पूर्ण वेळ पहायचे ठरवले.
प.प. गुरु गोविंद गिरी महाराज ह्यांचे अयोध्या विषयी चे विचार ऐकायचे होते. पण लोकल सुगम संगीत स्पर्धा, बक्षिसपात्र शॅार्टफिल्म्स, एकांकिका हे थोड्या वेळाचे होते ते आम्ही पाहिले. सर्वांची तयारी पाहून खरंच सगळयांचे कौतुक वाटले. किती क्रिएटिव्ह आहे आपली मराठी जनता !
नंतर आम्ही गौर गोपालदास ह्यांचे सातासमुद्रपार अध्यात्म आणि बुध्दीवाद ह्यावरचे त्यांचे विचार ऐकायला गेलो. आम्ही कुटूंबातले सर्वच त्यांचे व्हिडिओ नेहमी पहातो, पण त्यांना प्रत्यक्ष पहाणे आणि ऐकणे हा विलक्षण अनुभव होता. किती साध्या उदाहरणातून, हसत खेळत, गप्पा मारत त्यांनी जीवनातली, अध्यात्मातली मुल्यं, आपली कर्तव्य, सांगितली ! ३/४ हजार लोकांचा हॅाल … हसत, टाळ्या वाजवत, उपदेशाचे डोस न समजता, मजेत आनंदानी त्या भाषणाचा आस्वाद घेत होता. सर्वांना खूपच आवडले त्यांचे भाषण.
आज जेवायला मेजवानी होती. नावच होते .. स्वाद महाराष्ट्राचा! तुम्ही ओळखले असेल ना काय मेनू असेल. जेवायला होते अळूवड्या, भरली वांगी, सोलकढी, मोदक, बटाटेवडे चटणी, वरणभात, साटोऱ्या, मॅंगो लस्सी, पापड, ४ चटण्या, लोणचे हेही होतेच !
संध्याकाळचा मेनू वेगळा बे एरिया स्पेशल होता. फलाफल, मोमोज, व्हेज मन्चुरियन, लाल थाई करी, साईस, स्वीट कॅार्न सूप, पास्ता, गार्लिक ब्रेड, बकलावा, तिरामिसू ! ४/५ हजार लोकांसाठी रोजचा असा मेनू ठरवायचा, करायचा, वाटायचा ह्या मागे किती आयोजन असेल कल्पना करा ! पण सर्व व्यवस्था अतिशय उत्तम होती.
आज अनेक कार्यक्रम होते. शरद पोंक्षे ह्यांचे मराठी योध्दे, मुक्ता बर्वेचे “भाई एक कविता हवी”, भाडिपा फेम सारंग साठे ह्यांची कॅामेडी, कौशल इनामादार व अनिरूध्द जोशी यांचे सप्तसूर, किरण पुरंदरे ह्यांच्या जंगलच्या गोष्टी ..
अशा प्रसिध्द व्यक्तीचे कार्यक्रम ऐकायला लगबगीने श्रोते जात होते. मोठ्या हॅालमध्ये ३ दिवसाच्या तिकीट वाल्यांची जागा ठरलेली होती. पण आज १ दिवसांचे, किंवा एखाद्या कार्यक्रमापुरते तिकीट उपलब्ध केले होते. त्यामुळे छोट्या हॅाल मधल्या जागा लगेच भरत होत्या. अनेक जण उभ्यानी, आनंदानी कार्यक्रम पहात होते. मेडिटेशन, अभिवाचन, शास्त्रीय संगीताच्या, ढोल ताशाच्या स्पर्धा, मीना नेरूरकराचे प्रभात सिनेदर्शन, ज्योतिषातल्या गमती जमती, परिसंवाद, युवाग्रूपचे म्युझिक, फॅशन, सायन्स, करियर बद्दल आनंद गानू, वेद, तन मन संतुलन, असे अनेक कार्यक्रम ह्यांनी आजचा दिवस गच्च भरलेला होता. मन रे इंद्रधनु हा बे एरियातील ग्रूपनी केलेला कार्यक्रम लक्षांत रहाण्यासारखा होता. अतिशय कल्पकतेने हा कार्यक्रम सादर केला गेला.
या दोन दिवसात अमेरिकेत प्रकर्षांने एक जाणवले ते आपल्या मराठी संस्कृतीचे दर्शन, वागण्या बोलण्यातून सूत्रसंचालनातून दिसत होते. अंगभर, घरंदाज वाटतील असे कलाकारांचे कपडे, कुठेही वाह्यात वागणे, बोलणे नाही, अभिमान वाटेल असाच झाला हा कार्यक्रम !
आज मध्येच जागा उपलब्ध केली असेल तिथे वेगवेगळे ग्रूप भेटत होते. शाळाकॅालेज चे ग्रूप खूप वर्षांनी एकमेकांना भेटत होते. अमेरिकेतून लांबून लांबून मराठी प्रेमी आले होतेच पण भारतातून आणि जगभरातून अनेक ठिकाणाहून खूप जणं आले होते. त्यामुळे ह्या सर्व भेटींना भरतभेटी सारखे महत्व होते. आठवण म्हणून अनेक ठिकाणी एकत्र फोटो काढले जात होते.
मला इथे सांगायला आवडेल, की BMM चा महाराष्ट्रीन आर्टिस्ट नॅार्थ अमेरिकेचा (MANA) एक ग्रूप आहे. मी पण त्या ग्रूप वर आहे. वॅाट्सॲपवर आम्ही भेटतो, एकमेकांच्या चित्रांचे कौतुक करतो. त्यातले १५ जण आम्ही १ तासासाठी आज भेटलो. काहींनी आपली छोटी चित्र आणली होती आणि स्वतःची ओळख करून देतांना दाखवली. मी चित्र नाही आणली, पण रांगोळी आर्टिस्ट असल्यामुळे काही रांगोळीचे फोटो लॅमिनेट करून घेऊन दाखवले. इतरही काही बाहेरची लोकंही हे आमचे छोटे प्रदर्शन पहायला आली होती. अमेरिकेत अशी प्रोत्साहन देणारी संधी मला मिळाली, हा माझा आणखी आनंदाचा क्षण !
संध्याकाळच्या जेवणानंतर १० वाजेपर्यंत अजय अतुल ह्यांचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम म्हणजे आजच्या पूर्ण दिवसाचा क्षीण घालवणारा, अतिशय बहारदार झाला. त्यांच्या गाण्याचे अमेरिकेतही इतके छोटे मोठे चाहते आहेत हे पाहून तेही खूष होते. अख्खा हॅाल त्यांच्या गाण्यावर नाचत होता. इतका ५०००, उत्साहातला मराठी जमाव प्रथमच पाहिला.
अतिशय योग्य कार्यक्रम आणल्याबद्दल BMM ला धन्यवाद देत सकाळी ७/८ वाजता आलेली मंडळी, १० वाजता संगीतमय वातावरण बरोबर घेऊन परत गेली.
क्रमशः
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800