१ जुलै हा कॅनडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जाणून घेऊ या, कॅनडा चा इतिहास, सद्यस्थिती आणि या वर्षी साजरा करण्यात आलेल्या कॅनडा दिवसाची आतषबाजी !
आपल्या कॅनडातील युवा लेखिका प्रियांका शिंदे जगताप यांनी संशोधनपूर्ण लिहिलेल्या या लेखाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कॅनडातील सर्व मराठी जणांना कॅनडा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
‘मेपल सिरपचा देश’, ‘द ग्रेट व्हाईट नाॅर्थ’, ‘अमेरिकेची हॅट’, ‘व्हिक्टोरिया लॅन्ड’, ‘बर्फाची भूमी’ अशा नानाविध टोपण नावांनी जगाच्या नकाशावर विराजमान असलेला देश म्हणजे कॅनडा.
कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील एक विशाल देश आहे. नितळ सौंदर्यानं नटलेल्या कॅनडाच्या तिन्ही बाजू सागराच्छादित आहेत. पूर्वेकडील श्रेणी रॉकी पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्रफळानुसार रशियानंतर जगातील द्वितीय क्रमांकाचा सगळ्यात मोठा देश म्हणून कॅनडाची वर्णी लागते.
कॅनडा हा संघीय संसदीय लोकशाही व घटनात्मक राजेशाही असलेला देश आहे. नोव्हा स्कॉशिया, न्यू ब्रन्सविक आणि कॅनडा प्रांताच्या प्रतिनिधींनी ब्रिटिशांच्या पाठिंब्यानं नवा देश स्थापन करण्यासाठी एकत्रितपणे कार्य सिद्धीस नेलं. १ जुलै, १८६७ ह्या दिवशी ब्रिटिश उत्तर अमेरिका कायदा पास झाला. हाच कॅनेडियन कन्फेडरेशनचा वर्धापन दिन होय. त्यामुळे Province of Canada, नोवा स्कोशिया आणि न्यू ब्रन्सविक यांची ’कॅनडा’ नावाची एक वसाहत (Dominion) निर्माण झाली. हाच दिवस ‘कॅनडा दिवस’ अर्थात ‘कॅनडा डे’ म्हणून साजरा केला जातो.
संपूर्ण कॅनडा प्रमाणे ‘ओंटेरियो’ प्रांतातील ‘मिसिसागा’ येथे १५७ वा ‘कॅनडा दिवस’ मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. शहराचा मध्यवर्ती भाग (Downtown) असलेल्या ‘मिसिसागा’चा ५० वा वर्धापन दिन सोहळा तितक्याच जल्लोषात पार पडला. मिसिसागाच्या मध्यभागी स्थित असलेल्या ‘सेलिब्रेशन स्क्वेअर’मध्ये दुपारी तीन वाजल्यापासून रात्री साडे-दहापर्यंत सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं सुनियोजित असं आयोजन करण्यात आलं होतं. लोकप्रिय कलाकार क्रॅश ॲडम्स, झीना, लू कला, ओमेगा मायटी, बॅन्गर्झ ब्रास यांनी थेट सादरीकरणाच्या माध्यमातून कॅनडा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवरती नेलं. संगीत-नृत्यमय मैफिल, लहानग्यांसाठी असलेला कॅम्प कॅनक किड्स झोन, फूड ट्रक्स, कर्बसाईड पाककृतींची रेलचेल, आकर्षक प्रकाश योजना व रात्री साडे-दहाच्या ठोक्याला आकाशाला गवसणी घालणारी नेत्रदीपक आतषबाजी, ही या कार्यक्रमाची काही प्रमुख वैशिष्ट्ये.
फटाक्यांचा बहारदार सोहळा (Fireworks) पाहण्यासाठी हौशींनी लांबून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बहु सांस्कृतिकतेची झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमास येथील स्थानिक रहिवासी व कॅनेडियन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती. बहुतेकांनी कॅनडाच्या ध्वजात समाविष्ट असलेल्या लाल व सफेद रंगसंगतीला पहिलं प्राधान्य दिलं होतं.
मी, माझे यजमान, सुपुत्र व माझे वडिल ज्यांचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे, आम्ही सर्वांनी मिळून रात्रीच्या नयनरम्य आतषबाजीची सुखानुभूती घेतली. साहजिकच ही दृश्ये जरी डोळ्यांत सहज भरता येण्याजोगी होती; तरी भ्रमणध्वनीत ती टिपण्याचा मोह काही मला आवरला नाही.
अधिकृतपणे ‘देश’ म्हणून निर्मिती झाल्यापासून ते अगदी आजपर्यंतच्या १५७ वर्षांच्या काळात समृद्ध इतिहासाची साक्ष असलेल्या कॅनडा या देशानं जगातील धनाढ्य देशांच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं आहे. कॅनडाची अर्थव्यवस्था उच्च विकसित मिश्र अर्थव्यवस्था आहे. कॅनडा हे जगातील सर्वात मोठ्या व्यापारी राष्ट्रांपैकी एक आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. येथील जीवनमान उच्च दर्जाचं आहे. जगभरातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कॅनडातील विद्यापीठांना प्रथम पसंती दर्शवतात. आरोग्य सेवा उत्तम दर्जाची आहे. ‘सौदी अरेबिया’ हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असून, त्यानंतर रशिया व कॅनडा यांचा क्रमांक लागतो. शांतताप्रिय, शिस्तबद्ध, नीटनेटका व मुशाफिरगिरी करण्याजोगा असलेला ‘कॅनडा’ हा देश सदैव चिरायू राहो.
— लेखन : प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800
छान लेख