Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यसाहित्य तारका : ५२

साहित्य तारका : ५२

डॉ. सुमती क्षेत्रमाडे

सातत्याने चाळीस वर्षे मराठी कादंबरी लेखनावर आपला स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणा-या कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या तसेच वैद्यकीय कारकिर्दही तितकीच यशस्वी ठरलेल्या डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात, राजापूर तालुक्यात, झापडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकला झाले. शालेय जीवनात त्या नेहमी प्रथम क्रमांकावरच असत. नाशिक सेंटरमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत्या. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची एल्. सी. पी. एस्. ही वैद्यकशास्त्रातील पदवी मिळविली. त्यांनी काही वर्षे बडोदे संस्थानात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. १९३५ साली त्या उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या (१९४८). तिथे रोटंडा विद्यापीठाची बालरोग आणि प्रसूतिशास्त्रातील एल्.एम्. ही पदवी घेऊन त्या भारतात परतल्या नंतर कोल्हापुरात स्थायिक होऊन त्यांनी वैद्यक व्यवसाय केला.

डॉ क्षेत्रमाडे यांनी शाळेत असताना अनेक मासिकांमधून, हस्तलिखितांमधून लिखाण केले होते. वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. त्यांची ‘वादळ’ ही पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री व माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या नंतर त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या.

सुमतीबाईंनी सातत्याने मराठी कादंबरी लेखनावर आपला स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटविला आहे. मराठी खेरीज कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, बंगाली या भाषांवरही सुमतीबाईंचे विलक्षण प्रभुत्व होते. गुजरातेत केलेल्या दीर्घ वास्तव्यामुळे त्यांचा गुजराती संस्कृतीशी जवळून परिचय होता.

कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुमती बाईंची वैद्यकीय कारकिर्दही तितकीच यशस्वी ठरली होती. स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लिहिता लिहिता सुमती बाईंनी विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यांचे वीस कथासंग्रह, पंधरा कादंबऱ्या, कुमार वाङ्मय व दोन नाटके असे विविध साहित्यप्रकारांना स्पर्श करणारे लेखन आहे. या साहित्य संपदेपैकी प्रीतिस्वप्न (१९५४), बीजेची कोर (१९६२) हे कथासंग्रह, महाश्वेता (१९६०), मैथिली (१९६३), श्रावणधारा (१९६४), मेघमल्हार (१९६८),  अनुहार (१९७६), युगंधरा (१९७९), वादळवीज (१९८१), पांचाली (१९८४), तपस्या (१९८४) इत्यादी कादंबऱ्या आणि भैरवी (१९६८) व मीच जाहले माझी मृगया (१९८७) ही नाटके या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत.

लिखाणाची आवड असल्याने दवाखान्यातील वातावरणावर आधारीत “आधार” ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना लाभली आहे. वि.स.खांडेकरांना त्या गुरुस्थानी मानत असत. ‘आधार’ ही कादंबरी एका असहाय, पति प्रेम वंचित स्त्रीच्या जीवनावर आधारलेली आहे. स्वतःच्या हिमतीवर उभे राहून संकटांशी लढणारी नायिका रेखाटताना त्यांनी परंपरेत पिचणार्‍या स्त्रीचे चित्रण केले आहे. तर “युगंधरा” ही कादंबरी थेट अंत:करणाला स्पर्श करुन जाते. हृदयात भावनांचा कल्लोळ आणि मनात विचारांचा संघर्ष निर्माण करते. वाचकाला विलक्षण अस्वस्थ व अंतर्मुख करुन सोडते. युगंधरा खर्‍या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते अशी उदाहरणे वास्तव जगातही अनेकदा दिसतात यावर आधारित यांची युगंधरा ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. इतकचं नाही तर सीतेच्या जीवनाचे सर्व अंगांनी चित्रण करणारी “मैथिली” ही कादंबरी आणि महाभारतावरील गांधारीने कथन केलेली प्रभावी कादंबरी ती म्हणजे “सत्यप्रिय गांधारी”.

प्रेम हा सुमतीबाईंच्या लेखनाचा स्थायिभाव आहे. त्यांच्या सर्व नायिका या ताठ मानेने परिस्थितीशी झुंजत असतात मात्र तरीही त्या विद्रोही वाटत नाहीत. तर आक्रस्ताळेपणा हा त्यांचा स्वभावधर्म नाही. लेखन करणार्‍या सुमतीबाईंनी केलेले स्त्री-चित्रण म्हणजे स्त्रीच्या भावविश्वातील आणि अंतःकरणातील शक्ती ओळखून त्यांनी तिचे रेखाटन केलेले आढळते तर पौराणिक व्यक्तिरेखांना कवेत घेऊन ‘मेघमल्हार’, ‘योगेश्वर श्रीकृष्ण’, ‘नल-दमयंती’ अशा अनेक कादंबर्‍या त्यांनी आपल्या लेखणीतून साकारल्या.
त्यांची महाश्वेता ही आणखी एक भावस्पर्शी कादंबरी. कोड आलेल्या मुलीच्या मनाच्या अवस्थेचे हृदयस्पर्शी वर्णन यात केलेले आहे. या कादंबरीवर आधारित मराठी मालिका सुद्धा झाली आहे. तसेच द्रौपदीच्या जीवनावर आधारित “याज्ञसेनी” या कादंबरीत तर द्रौपदीच्या मनाच्या अवस्थेचे वर्णन केले आहे. श्रेष्ठ कादंबरीकार व ज्ञानपीठकार विष्णु सखाराम खांडेकर यांच्या सूचनेवरून अमरावतीच्या (विदर्भ) शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या तपोवन संस्थेत त्यांनी काही दिवस वास्तव्य केले. तेथील कुष्ठरोग्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या अनुभूतीतून तेथील वास्तवावर बेतलेली त्यांची तपस्या ही कादंबरी मनाला भिडते. महाश्वेता व मेघमल्हार या कादंबऱ्यांचे गुजरातीत तर श्रावणधारा आणि मेघमल्हार यांचे हिंदीत अनुवाद झाले आहेत आणि काही कादंबऱ्यांच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांच्या स्वप्न अधुरा या गुजरातीत अनुवाद केलेल्या नाटकाला केंद्र शासनाचा पुरस्कार लाभला.
स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, स्त्री-दु:खांचे केंद्र एकामागोमाग एक पन्नासहून अधिक कादंबऱ्यांत मांडणाऱ्या डॉक्टर आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या डाॅ. सुमती क्षेत्रमाडे यांचे ८ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. साहित्य वाचनाची गोडी निर्माण झाली, त्या वयापासून प्रचंड आवडत असलेली एकमेव लेखिका म्हणजे डाॅ. सुमती क्षेत्रमाडे! आज खरोखरच कामात व्यस्त असूनही त्यांच्यावर लिहिलेला लेख वाचल्यावाचून राहवले नाही, आणि इतक्या आतुरतेने वाचल्यानंतर निराशाही झाली नाही. लेखिका संगीता कुलकर्णी ह्यांनी डाॅ. सुमती क्षेत्रमाडे ह्यांचा यथोचित परिचय करून दिलेला आहे. त्यांचे वैयक्तिक जीवनात, वैद्यकीय करिअर आणि साहित्यिक वाटचाल ह्यांचा सुंदर आढावा घेतला आहे. त्यामुळे ह्या इतक्या आवडत्या लेखिकेच्या कादंबऱ्यांमधून साकार झालेली काही पात्रे, काही प्रसंग ह्यांच्याविषयी मनात असलेले कुतूहल शमले. ते काय, कसे, वगैरे विषयांवर सविस्तर लिहायला गेले, तर माझाच स्वतःचा एक स्वतंत्र लेख तयार होईल, म्हणून तसे उल्लेख टाळून इतकेच लिहिते की लेखन क्षेत्रातील माझ्या ह्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या संगीता कुलकर्णी ह्यांचे आभार व अभिनंदन आणि माझ्या आजी, आई, व आमच्या नंतरच्याही पिढीतील आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या लाडक्या लेखिका सुमती क्षेत्रमाडे ह्यांना विनम्र अभिवादन. 🙏🌹
    सुमती क्षेत्रमाडे ह्यांचा फोटो लावलेला पाहून अधिकच आनंद झाला. लहानपणापासून दरवर्षी कोल्हापूर येथे अंबाबाईच्या देवळात जाताना महाद्वार रोडवर “डाॅ.सुमती क्षेत्रमाडे” ह्या नावाचा बोर्ड पाहात त्यांचे एकदातरी दर्शन घडावे म्हणून तिथेच रेंगाळत राहण्याची सवय आणि आवड जडली होती, ती ह्या फोटोच्या रूपाने थोडी पूर्ण झाली, ह्यासाठी लेखिका व संपादक दोघांचेही मनःपूर्वक आभार 🙏🌹

  2. डॉ.सुमती क्षेत्रमाडे या मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक. त्यांचे साहित्य हे आपल्यासाठी दीपस्तंभ आहे.

  3. डॉ. सुमती क्षेत्रमाडे या माझ्या कॉलेज जीवनातील आवडत्या लेखिका. या लेखात त्यांच्या साहित्याचा उत्तम आढावा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा