उद्या रविवार, २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने या रचनांद्वारे करू या गुरू वंदन…
– संपादक
१. गुरुपूजन
गुरुची गाऊ किती महती
पूजनी शिष्यगण हे रमती // धृपद//
गुरुवर्णना शब्द नसावे
भाव जाणुनि पदी नमावे
दुष्टातून ते सुष्ट घडावे
वंदिती घेऊन पंचारती //1//
समाज गुरु हे व्यास मुनीवर
जीवन व्रत संस्कृती प्रचार
निःस्वार्थ भाव तो वसे हृदयात
पूजण्या पुष्पांजली वाहती //2//
गुरुजीवनी लभ्य प्रेरणा
‘लघु’ ही ज्यांतून ‘गुरु’ बनावा
मार्गदर्शनी एकरुपता
पूजण्या कृतज्ञ मनी राहती //3//
ज्ञानसूर्य प्रेमाचा सागर
तसाच गुरु शांतीचा हिमाचल
गुरुपूजन ‘सत्याचे पूजन’
आचरुनी दावी गुरुभक्ति //4//
जन्मदात्री माता गुरु अग्रणी
दुजा गुरु तो अखंड जीवनी
गुरुकृपेने जन्म सार्थकी
जीवन पदकमली वाहती //5//
राष्ट्रध्वज हा असे तिरंगा
आम्ही मानतो गुरु ध्वज भगवा
देशप्रेम, कार्यावरी निष्ठा
नमिता संस्कारीत होती //6//
पूजनी शिष्यगण हे रमती
— रचना : स्वाती दामले.
२. गुरू महिमा
गुरू जागवीतो तव भान,
गुरू शांत करीतो मन,
गुरू दाखवी तुज आरसा,
दिलासा, स्व-स्वरूपाला जाण,
मनाची बाह्य रंगी बहू ओढ,
त्या, वळवी आंत सखोल,
लागता गुरूभक्तीची जोड,
सावरे, चित्त शांत, संधान,
तो अवतारी बघ आहे,
तो वाट दाखवी, पाहे,
संयम शिकवी, शंका चुकवी,
साधतो, भक्तांचे कल्याण…!!!
— रचना : हेमंत भिडे.
३. भाबडा भक्त
बोलून चालून
लिहूनी वाचूनी
होती चुका नित्य हातूनी
भाबडा मी भक्त
सुबुद्धी द्या सद्गुरूनाथा———-
कर्म धर्म करते
त्यात काय चुकते
शांतता न मनास मिळते
भाबडा मी भक्त
सुबुद्धी द्या सद्गुरूनाथा——-
मनी वावरे वासना
स्वैर धावते कल्पना
मन माझे आवरेना
भाबडा मी भक्त
सुबुद्धी द्या सद्गुरूनाथा—–
दर्शनाने अश्रू ढळती
विषयवासना दूर पळती
सद्गुरू चे चरण दिसती
भाबडा मी भक्त
सुबुद्धी द्या सद्गुरूनाथा——
माथा लवून लिन होवूनी
आशिर्वादाचे दान मागूनी
मांगल्य द्या जीवनी
भाबडा मी भक्त
सुबुद्धी द्या सद्गुरूनाथा——
— रचना : शुभदा डावरे-चिंधडे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800