आनंद
आमच्या घरासमोर “गजाची चाळ” होती. वास्तविक चाळ म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येते तशी ती चाळ नव्हती. एक मजली इमारत होती आणि वरच्या मजल्यावर गजा आणि दोन कुटुंबे आणि खालच्या मजल्यावर तीन कुटुंबे राहत होती. पण तरीही गल्लीत ती “गजाची चाळ” म्हणूनच संबोधल्या जात असे. गजा मालक म्हणून तो राहत असलेला घराचा भाग जरा ऐसपैस होता. वास्तविक गल्लीतल्या कुठल्याच घराला (आमच्याही) वास्तू कलेचे नियमबद्ध आराखडे नव्हतेच त्यावेळी. कुठेही कशाही लांब अरुंद खोल्या एकमेकांना जोडल्या की झाले घर. पण अशा घरातही अनेकांची जीवने फुलली हे महत्त्वाचे.
गजाच्या घरात त्याची आई आणि त्याच्या लांबच्या नात्यातील बहिण “शकू” राहायचे आणि येऊन जाऊन बरीच माणसं असायची तिथे. कधी कधी गजाचे वडीलही दिसायचे मात्र गजा आणि शकू या बहीण भावांच्या नात्याबद्दल मात्र बऱ्याच गूढात्मक चर्चा घडायच्या.
गजाकडे आम्हा मुलांचं फारसं जाणं-येणं नव्हतं, पण गजाच्या शेजारी राहणाऱ्या दिघ्यांच्या कुटुंबातला आनंद आमच्यात खेळायला यायचा. आनंद, दिवाकर, अरुणा आणि त्याचे आई वडील असा त्यांचा परिवार होता.
आनंदची आई भयंकर तापट होती आणि सदैव कातावलेली असायची. त्यामुळे आम्ही आनंदच्या घरी खेळायला कधीच जात नसू पण आनंद मात्र आमच्यात यायचा. आम्ही त्याला आंद्या म्हणायचो. पुढे तोच “आंद्या” “आनंद दिघे” नाव घेऊन शिवसेनेचा एक प्रमुख नेता म्हणून नावारूपास आला ते वेगळं. पण माझ्या मनातला “आनंद” मात्र त्यापूर्वीचा आहे.
बालवयात आम्हा साऱ्या मुलांना फक्त खेळणं माहीत होतं. भविष्याची चिंताच नव्हती. पुढे जाऊन कोण काय करेल, कसे नाव गाजवेल याचा विचारही मनात नव्हता आणि “आनंद” अशा रीतीने लोकनेता वगैरे होण्याइतपत मजल गाठेल असे तर स्वप्नातही वाटले नाही कारण साध्या साध्या खेळात सुद्धा तोच प्रथम आऊट व्हायचा आणि आऊट झाल्यावर कोणाच्यातरी घराच्या पायरीवर गालावर हात ठेवून, पाय जुळवून पुढचा खेळ पहात बसायचा तेव्हा तो अगदी “गरीब बिच्चारा” भासायचा.
आज हे लेखन करत असताना खूप आठवणी उचंबळत आहेत. “आनंदची” खूप आठवण येत आहे. पुन्हा लहान होऊन त्याच्याशी संवाद साधावासा वाटतोय. तो आता या जगातही नाही. मनात दाटलेल्या भावना पत्रातूनच व्यक्त कराव्यात का ? कदाचित पत्र लिहिताना क्षणभर तरी त्याच्याशी बोलल्यासारखे वाटेल म्हणून.
प्रिय आनंद,
स. न. वि. वि.
खरं म्हणजे मला, तुला पत्र लिहिताना “सनविवि” वगैरे ठरलेले मायने नव्हते घालायचे. कारण त्यामुळे आपल्या मैत्रीच्या नात्यात उगीचच औपचारिकपणा जाणवतो. आपल्या मैत्रीत आपलं निरागस,आनंदी, खेळकर बाल्य अशा पारंपरिक शब्दांनी उगीचच बेचव होतं. आणि मला ते नको आहे.
मी तुझा बायोपिक पाहिला. आवडला. तुझ्या भूमिकेतल्या त्या नटाने सुरेख अभिनयही केलाय. संहिता लेखन छान. तुझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर वास्तववादी प्रकाश पाडलाय. पण चित्रपट बघताना मला मात्र, ’टेंभी नाका, धोबी गल्ली ठाणे’ इथला अर्ध्या, खाकी चड्डीतला, मळकट पांढर्या शर्टातला मितभाषी, काहीसा शेमळट, भित्रा, गरीब स्वभावाचा पण एक चांगल्या मनाचा आनंद नव्हे आंद्या आठवत होता. जो माझा बालमित्र होता. तो मात्र मला या चित्रपटात सापडला नाही. आणि मग माझं मलाच हंसू आलं अन् वाटलं तो कसा सापडेल ? इथे आहे तो एक जनमानसातला प्रमुख राजकीय नेता आणि माझ्या मनातला आनंद होता तो माझ्याबरोबर, विटीदांडु खेळणारा, गोट्या, डबा ऐसपैस, थप्पा, लगोरी खेळणारा आनंद.. आईची रागाने मारलेली हाक ऐकली की खेळ अर्धवट सोडून पटकन घाबरत, धावत घरी जाणारा आनंद. लहान भाऊ, बहिणीला सांभाळणारा आनंद.
एकदा मी तुला विचारलं होतं “तू आईला इतका कां घाबरतोस ?”
तू एव्हढंच म्हणाला होतास, “मला तिला आनंदी ठेवायचे आहे..”
आनंद, तुझ्या नावात आनंद होता पण तू कुठेतरी अस्वस्थ, खिन्न होतास का ? लहानपणी कळत नव्हते रे या भावनांचे खेळ.
एक साधं गणित मी तुला सोडवून दिलं होतं आणि तुझी खिल्लीही उडवली होती.
“काय रे ! इतकं साधं गणित तुला जमलं नाही ? इतका कसा ढब्बु ?” तू वह्या पुस्तकं घेऊन फक्त निघून गेलास.
पण नंतर तू किती मोठी राजकीय गणितं सोडविलीस रे..
पुढच्या काळात तुझ्याविषयीच्या पेपरात येणार्या बातम्या, फोटो. लोकप्रियता वाचून मी थक्क व्हायची. अरे ! हाच का तो आनंद ? मी कधी विश्वासच ठेऊ शकले नाही.
मी माहेरी ठाण्याला असताना एक दोनदा तुला भेटलेही होते. पण तू घोळक्यात होता. माझा बालमित्र आनंद, तो हा नव्हता. वाईट वाटले मला.
पेपरात जेव्हां तुझ्या निधनाची बातमी वाचली, उलट सुलट चर्चाही वाचल्या. एका राजकीय नेत्याचे ते निधन होते. पण माझ्यासाठी फक्त माझ्या बालमित्राचे या जगात नसणे होते हे तुला कसे कळावे आणि त्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू होते.
चित्रपट बघून मी घरी आले. मैत्रीणीचा फोन आला.
“कसा वाटला मुव्ही ?”
“छानच”
अग ! आनंद आमच्या धोबी गल्लीत आमच्या घरासमोर रहायचा…
पण हे काही मी नाही सांगितले तिला.
कारण आपलं वेगळं नातं मी मनात जपलंय. उगीच एका राजकीय नेत्याशी असलेल्या नात्याचं मला मुळीच भांडवल करायचं नव्हतं आणि नाही. माझ्यासाठी फक्त ढब्बु आंद्या. कसं असतं ना लहानपण ? मुक्तपणे एकमेकांशी भांडणे, वाट्टेल ती नावे ठेवणे, टिंगलटवाळी करणे आणि तरीही मैत्रीच्या नात्यात कधीही न येणारी बाधा.. म्हणून का ते रम्य बालपण ?
पण आनंद मला मनापासून तुझा अभिमान आहे. तुझ्या बालवयातल्या प्रतिमेसकट.
तुझी
बालमैत्रीण.
माझं पत्र वाचून तुला नक्की काय वाटेल याचा विचार करत असताना मला आताही “गजाची चाळ” आठवते.
काही वर्षांपूर्वी बदललेल्या धोबी गल्लीत गेले होते तेव्हा “गजाच्या चाळीचा” चेहराच बदलला होता. त्या संपूर्ण इमारतीचं शिवसेनेच्या कार्यालयात रुपांतर झालं होतं. त्या कपाळावर गंध, दाढीधारी प्रतिमेत लपलेला आनंदचा चेहरा मी शोधत राहिले…..
क्रमश:
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
गजाची चाळीतील तुम्ही लिहिलेल्या, आठवणी वाचताना खेळकर, घाबरट, भित्रा, अभ्यासात ढ, आईचे मन जपणारी व्यक्ती म्हणजे आनंद दिघे (आंद्या) यावर विश्वास बसत नाही. कारण धर्मवीर आनंद दिघे हा चित्रपट नजरेसमोर येतो. Totally different.
पण तुम्ही लिहिले आहे की पुढे जाऊन आनंद दिघे हे मोठे राजकीयनेते झाले, खरंच पुढे जाऊन आपले मित्र/मैत्रीण काय करत असतील, ? कुठे भेटतील, ?असतील कि नसतील?परिस्थिती कोणाला कुठे नेऊन ठेवेन हे माहीत नसते. सर्वच आपल्या जबाबदाऱ्या मध्ये व्यस्त असतात. पत्र लेखन अतिशय सुंदर लिहिले आहे. भावस्पर्शी 👍👌👌
राधिकाताई खरंच बालपण किती निरागस असतं नाही. या लेखाने तुमची आदरणीय आनंद दिघे यांच्या बलापणाविषयी माहिती कळली. तुमचं शब्दांकन नेहमीप्रमाणे खूप छान आहे.
गजाच्या चाळीतील लहानपणीचा आद्या म्हणजे आनंद दिघे.
अप्रतिम व वाचनीय