नमस्कार मंडळी.
आज आपल्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे, कारण की आपल्या वेब पोर्टल ला आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या सर्व वाटचालीत लेखक, कवी यांच्या बरोबरच अतिशय महत्वाचा वाटा आहे, तो आपला. नाटक, चित्रपट, टिव्ही यांना प्रेक्षकांचा आणि पेपर, पुस्तके यांना वाचकांचा प्रतिसाद नसेल तर कितीही मेहनत केली तरी ती व्यर्थ जाते आणि म्हणुनच वाचक म्हणून आपला सतत मिळणारा प्रतिसाद या पोर्टल साठी, लेखक, कवी यांच्या साठी अनिवार्य आहे. आपला प्रतिसाद या पुढेही असाच मिळत राहो, ही मनःपूर्वक विनंती.
आता पाहू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया. विशेष म्हणजे, आपल्या परिवारात नव्यानेच सहभागी झालेल्या आश्लेषा गान यांच्या “आणि, आई आठवली” या पहिल्याच लेखाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. त्यांचे हार्दिक अभिनंदन.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक
आणि आई आठवली… या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया :
१. आई, आश्लेेषा आणि अक्षरे….
डॉक्टर आणि पत्रकार कधीही निवृत्त होत नाहीत म्हणतात. कारण, दोघांचेही काैशल्य अंगभूत असते. काही काळ त्यांनी त्यांच्या या कौशल्याचा उपयोग केला नाही म्हणून ते काही समूळ नष्ट होत नाही. योग्य वेळ आली की ते प्रकट होतेच. तत्वज्ञानाच्या थाटाचे वाटणारे हे असे काही आज सांगायचे कारण, आमची रिंकू आहे. सॉरी….आश्लेषा. कारण, रिंकू हे तिचे आमच्या मित्र वर्तुळातील उपनाव.
तर ही आश्लेषा २० – २२ वर्षांआधी नागपूर येथील दै. देशोन्नती, दै. नवभारत मध्ये उपसंपादक होती. मला ती पहिल्यांदा भेटली ती देशोन्नतीतच. छान लिहायची. विशेषत: हळवं लिहायची. तिही हळवीच होती… म्हणजे आहे अजूनही. तर, तिच्या शब्दांचे ते हळवे हिंदोळे अनुभवताना मन सैरभैर व्हायचं नुसतं. पण, पुढे आश्लेषा लग्न करून सासरी गेली आणि सदैव तिच्या दोन बोटांच्या मध्ये रेगांळणारी लेखणी तिच्याही नकळत अबोल झाली. अर्थात आश्लेषाने लेखणचा हा अबोला स्वेच्छेने आणि विशेष म्हणजे, आनंदाने स्वीकारला होता. त्यामुळे लेखणीलाही आश्लेषाबद्दल काही तक्रार नव्हती. दोन दशकांचा मोठा काळ लोटला. आश्लेषाने कुठे काही लिहिल्याचे व ते मी वाचल्याचे आठवत नाही. पण, आज अचानक एक लिंक आली व्हॉटसॲपवर. न्युज स्टोरी टुडे परिवाराची. त्यात एक लेख आहे…. अर्थातच हळवा आहे. अगदी आश्लेषा स्टाईल. तळाशी नाव वाचलं तर खरच तो आश्लेषाचा निघाला. आईवर छान लिहिलेय तिने. दोन दशकांनी का होईना… लेखणीशी तिचा अबोला थांबला हे बघून खूप आनंद झालाय. मी अजूनही शब्दांचा गणगोत म्हणूनच मिरवतोय म्हणून असेल कदाचित…. असो, पहिली आवृत्ती अजून छापखान्यात जायची आहे. शेजारी थमनेलचे ढिगारे पडलेत. पण, रिंकूचा….ओ सॉरी, आश्लेषाच्या या शब्दांच्या वाटेवरील पुनरागमनाने आषाढाचा आनंद द्विगुणीत केलाय. आषाढात ही चिंब सुरुवात झालीच आहे तर आश्लेषाच्या या शब्दसरी आता थांबू नयेत. त्या अखंड बरसत रहाव्या भावनांच्या शेत- शिवारात. या सिंचनातून शब्दांची नवी बाग उमलेल. त्या बागेतील नवनवीन शब्दफुले वाचकांच्या पदरात पडतील. तशी ती पडावी, पडत रहावी यासाठी… आश्लेषा व तिच्या लेखणीला अनेकानेक शुभेच्छा.
— शफी पठाण. वरिष्ठ उपसंपादक, लोकसत्ता, नागपूर
२. अरे खूपच छान लिहिले ग. अतिशय सुंदर लिखाण, साधी सोपी भाषा, वाचताना बोलत असल्याचा भास होतो.
— शीतल अहेर. खोपोली
३. अप्रतिम लेखन.अतिशय सुंदर शब्द रचना.
— सोनल पेदे. रायपूर
४. अतिशय सुंदर, आईने दिलेला प्रत्येक सल्ला असो किंवा केलेली सूचना असो आयुष्याच्या कठीण वळणावर खूप हिम्मत देऊन जाते. ती नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. लिखाण अतिशय छान.
— सीमा रंगभाल. पुणे
५. खरंच भूक नको पण शिदोरी असो… हे तर सगळ्याच गोष्टींबाबत आहे. छान वाटले तुझा लेख वाचून.
— भारती मोहन. नागपूर
६. छान लिहिलय, आश्लेषा.
देशोन्नती आणि आई दोघांचीही आठवण आली. फ्रीलांसर म्हणून लिहायला सुरुवात केली का ?
— रीना सिंग. नागपूर
७. सौ. गान यांचा लेख छान आहे… आईच्या लहानश्या शिकवणीचा अनुभव उत्तम मांडला आहे.. त्याला शिर्षक वेगळे असायला हवे होते असे मला वाटते.. प्रवासात अचानक आलेले ट्राफिक जाम चे संकट आणि त्यात आईने दिलेल्या खाऊ मुळे मात करता आली अशा अर्थाचे असायला हवे होते.. बाकी लेख उत्तम..
— आसावरी नितीन.
अभिनेत्री, निवेदिका, लेखिका, पुणे
८. गान मॅडम यांचा लेख अप्रतिम. हा लेख वाचून आठवण येते आईच्या आभाळ भरून प्रेमाची.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, ह. मु.इंग्लंड.
श्री मधुकर नीलेगावकर यांच्या “वारी पंढरीची” या सचित्र लेखाबद्दल प्राप्त प्रतिक्रिया….
९. खूप सुंदर लेख आणि कविता
— लिना कुलकर्णी. पुणे
१०. छान लेख आहे. वारीत असल्याची अनुभूती देतो. पांडुरंग हरी!
— श्रीहरी दाभाडे. पुणे
११. अतिशय उत्कृष्ट लेख! कौतुकास्पद आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन !
— अरविंद जगताप. सोलापूर
१२. याची देही याची डोळा वारी पंढरीची घडल्यासारखे वाटते.
— सुधीर. पुणे
१३. सुंदर लेख व कविता अतिशय सुंदर !
— अविनाश टाकळकर. छ. स़भाजीनगर
१४. खूप सुंदर वर्णन निलेगावकरजी.
— श्रीकांत देव. पुणे
१५. पंढरीची वारी हा आपला लेख वाचला. लेख अतिशय सुरेख व बारकाव्याने लिहिला आहे. त्यामध्ये सर्व धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक सामान्य जनता अपेक्षा, अडचणी व माणसांचा श्रीमंतीमुळे आलेला गर्वपणा तसेच, माणूस म्हणून जगताना त्या त्याचे होत असलेले खच्चीकरण यामुळे माणुसकी खूप कमी होत चालली आहे.
वारीच्या मार्गाने मिळणारे आध्यात्मिक व आत्मिक समाधान हेच खरे समाधान आहे. आपण अतिशय सुरेख लेख दिल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील लेखासाठी खूप शुभेच्छा !
— आपटेकाका. सातारा
१६. खूपच सुंदर लेखन ! अभिनंदन ! व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
— मुकुंद पळसोदकर. हैद्राबाद
१७. “वारी पंढरीची” सचित्र लेख वाचून खूप आनंद वाटला. आषाढी एकादशी निमित्त भूवैकुंठ पंढरीत असणारा भक्तांची मांदियाळीचे दृष्य विठ्ठलभक्तीचा अथांग सागर आहे. वातावरण संपुर्णतया विठ्ठलमय असते. मानवी जीवन सार्थकी लावायचे मुख्य सुक्षेत्र हे अवघे पंढरपूरच आहे. याचे प्रत्यंतर आपल्या लेखातून येते. सचित्र लेखनासाठी अभिनंदन !
— सुहास संगम. पुणे
१८. You are Amazing !
— सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार,
कमलेश सोमण. पुणे
१९. खूप छान ! लेख वाचून आनंद झाला.
— गोविंद जपे. पुणे
२०. खूप सुंदर ! “वारी पंढरीची” अप्रतिम लेख ! खूप छान !
— ज्योती लातूरकर. लातूर
राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण” भाग ७ या आत्मकथनमालेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
२१. अप्रतीम. मुलीचे लग्न या विषयाबद्दलचे विचार माननीय चिंतनीय आहेत वाचताना प्रत्यक्ष बेबीआत्या आणि नलूआत्या नजरेसमोर उभा राहिल्या.
— निवेदिता रिसबुड.
२२. राधिका… हा व याचा आधीचा दोन्ही भाग मला आवडले !!
यात केवळ लहानपणच्या आठवणीतल्या व्यक्तीच नाहीत तर त्यांच्याबरोबर तुझ्या भावविश्वात असलेले त्यांचे स्थान तू खूप चांगल्या रीतीने लिहिले आहेस.. या तुझ्या केवळ लहानपणच्या आठवणीच नाहीत तर हा तुझा मानसिक जडणघडणीचा आणि हळूहळू प्रगल्भ होत असलेल्या तुझ्या विचारांचा तो काळ होता असे मला वाटते.. त्यावेळच्या तुझ्या मनात उमटलेल्या त्यांच्या प्रतिमांना
तू आता भावनिक शब्द रूप दिले आहेस.. त्या व्यक्तींचा तुझ्या त्या वयातल्या जडणघडणीत केवळ आठवणीं पुरता नाही तर वैचारिक घडामोडींचाही पडलेला ठसा तू खूप छान लिहिला आहेस. नकळत मी मनातल्या मनात त्या सगळ्या व्यक्तींची व्यक्तिमत्व चितारली आहेत.. प्रत्यक्षात त्या एखाद्या वेळेस वेगळ्या असू शकतील पण तुझ्या शब्दातून त्या जशा माझ्या मनात उमटल्या तशा मी डोळ्यासमोर उभ्या केल्या…
खरं म्हणजे तुझ्या, माझ्या लहानपणीचा काळ हा साधारण तोच.. वयही तेच.. त्यामुळे नकळत माझ्या भोवतालच्या काही व्यक्ती सुद्धा मी त्यांच्याबरोबर जोडत गेले..
— सुचेता खेर. पुणे
२३. खरंय. त्या काळी घोड नवऱ्या, परित्यक्ता, बालविधवा, विधवा अशा प्रकारच्या असहाय स्त्रिया घरोघरी होत्या. काही घरांमध्ये त्यांना थोडा तरी मान असायचा तर काहींमध्ये काडीची किंमत नसायची. स्त्रीला मन, भावना असतात ही जाणीव दुर्मिळच.
— सुलभा गुप्ते.
२४. तुझ्या आयुष्यात लहानपणी अबोध असताना जी माणसे आली, आणि ज्यांनी मनात कायम घर केले ती आज तुझ्या प्रगल्भ मनाची आणि एकूणच तुझ्या जडणघडणाची प्रातिनिधिक माणसे कशी ठरली आहेत, हे या लेखातून अगदी स्पष्ट होते आणि तुझं मन किती संवेदनक्षम आहे याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही.
अप्रतीम लेखन !
— अरुणा मुल्हेरकर. मिशिगन अमेरिका
२५. माझी जडणघडण सदर एकदम मस्त. राधिका ताईचं लेखन अगदी त्या विश्वात घेऊन जातं.
— सौ प्रीती प्रवीण रोडे. अकोला
२६. घोडनवरी, प्रौढ कुमारिका हे शब्द मनात उद्विग्नता निर्माण करतात. त्यावेळच्या बालमनाने पाहिलेलं, ऐकलेलं यावर कित्ती सुंदर विवेचन केलय ताई तुम्ही.
— अस्मिता पंडीत. पालघर
२७. खूप छान ! बालपणी केलेले निरीक्षण , त्यातून केलेला मनाचा निश्चय ! मथुरे भगिनी, काकी ही सगळी मंडळी जशीच्या तशी डोळ्यासमोर आली.
फार सुरेख शब्द चित्र रेखाटन !
— सुमन शृंगारपुरे. पुणे
२८. जडण घडण खूप छान लेखन. मनःस्पर्शी, ओघवती भाषा. तुम्ही नीहारा प्रकाशनाच्या लेखिका म्हणून अभिमान वाटतो.
— स्नेहसुधा कुलकर्णी. संपादक : नीहारा प्रकाशन, पुणे
२९. जगण्याची बालभारती “आम्ही सिद्ध लेखिका” या नामवंत समुहाच्या माध्यमातून ओळखीच्या झालेल्या राधिकाताई. भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे मनात घर करून बसल्या आणि कथालेखिका म्हणून जास्तच भावल्या.
अलिकडेच त्यांचं ‘माझी जडणं घडण’ हे आत्मकथन करणारं इ- सदर वाचनात येऊ लागलं आहे…
त्यांचा जीवनप्रवास साध्या नेमक्या शब्दांत त्या कथन करत असल्याने हे सदर मनाचा ठाव घेते आहे …
त्या बालपणी ठाण्यातील ज्या धोबीगल्लीत वास्तव्यास होत्या त्या गल्लीचं अस्तित्व आजही त्यांच्या मनात तितकच ठळक असून त्या जगण्याविषयी लिहितांना ताई म्हणतात, ’घराच्या आत आणि पलिकडे’ जगाचा एक सुंदर बंध होता, एक रक्ताचा आणि एक सामाजिक. जगण्याबरोबर आपोआप येणाऱ्या बंधांचं हे छान शब्दवेधक वर्णन.
याच लेखात ताई म्हणतात, ’संस्कार म्हणजे आदर्श तत्वांचं एक भल मोठं गाठोडं’ ताईंनी ही सुलभ शब्दांत केलेली उकल त्यांच्या आत्मकथनाच्या वाचनाची ओढ आणखी तीव्र करते.
“धोबीगल्ली ही माझ्यासाठी बालभारती होती” या वाक्यातून बालभारतीचे तत्कालीन जगण्यातील मोल आणि धोबीगल्लीचं आयुष्यातील स्थान अचूकपणे सांगितलंय. शेवळाची भाजी खाणं हा एक सामुदायिक आनंद सोहळा होता हे वाक्य तर आजची पिढी नेमकी काय गमावते आहे याचेही सूचक आहे. बालपणी न.पा. च्या शाळेत शिक्षण घेताना ‘ढ’ हे अक्षर मला त्रासदायक वाटायचे म्हणून मी वडिलांना विचारले होते, “आपण आपले आडनाव बदलू शकतो का ?” असा मिश्किल प्रांजलपणा या कथनात आहे. त्यांच्या वर्गातील कलाकारकन्या रत्ना पेडणेकर ही एक मोठ्या कलाकाराची कन्या असुनही तिला काही कारणाने वर्गात शिक्षा झाली तरी तिच्या वडिलांनी शाळेत येऊन मास्तरांना काही विचारले नाही. हा प्रसंग कथन करताना शाळा ही शिक्षण आणि संस्कार यांची गंगोत्री होती हे ही छान पद्धतीने अधोरेखित केले आहे.
“मला मराठी भाषेने काय दिले” असे सांगताना ताई म्हणतात, ’मला मराठी भाषेने सुंदर बालपण दिले’ हे वाक्य मला खूप आवडले. कारण शिक्षण म्हंटले की इंग्रजीतूनच होते अशी ठाम समजूत असलेल्या आजच्या पालकांसाठी हे ठणठणीत अंजन आहे हे मात्र खरे. इतकी या वाक्याची ताकद आहे असे माझ्यातल्या मराठी भाषा प्रेमी व्यक्तीस वाटते.
या लेखमालेच्या ४ थ्या भागात ताई वनिता या त्यांच्या सहाध्यायी मुलीबद्दल लिहिताना म्हणतात, ’वनिताने माझ्या त्या संस्कारक्षम वयात विचारांचा एक “अमृत थेंब“ नकळत माझ्या प्रवाहात टाकला. या संयत लेखनातून ताईंची निरिक्षण शक्ती आणि जाणीवेनं अवतीभवतीच्या चांगल्या गोष्टी टिप कागदासारखं टिपणारं मन दिसतं. शिवाय आपलं आयुष्य सजविणाऱ्यांचं स्मरण सतत ठेवण्याची असोशीही निदर्शनास येते.
आपल्याला काय वाटतं आणि का वाटतं ते ठामपणे सांगता यायला हवे असे मांडताना त्या नकळत आपल्याला व पुं ची आठवण करून देतात कारण व पुं नी त्यांच्या एका पुस्तकात म्हटलंय, माणसाला चुकीची का होईना पण आपली अशी ठाम मतं असावीत.…
एकूणच सोपं आणि रसाळ असं हे आत्मकथन असून ते हवंहवंसं झालं आहे हे निश्चित… आणि म्हणून पुढील भाग वाचण्याची तितकीच उत्सुकता…
ताई, तुमच्या जीवनाची अशी रम्य सफर घडवून आणत आहात खूप आनंद असून या वाचन यात्रेत मला सामावून घेत आहात; यासाठी मन:पूर्वक आभार ….👏🏻
— ॲड. प्रार्थना सदावर्ते. पुणे
३०. नलू आत्या आणि बेबी आत्या यांचं लहानपणच्या निरागस भाव विश्वामुळे उलगडलेलं न कळालेलं प्रखर सत्य, तरुणपणी ठामपणे घडवलेल्या व्यक्तिमत्व, विकास आणि समाजाच्या जातीभेदाच्या रूढीला आणि परंपरेला विचारलेला प्रश्न हे सगळं लहानपणापासूनचा मनाचा प्रवास दाखवतो आणि शेवटी स्त्री क्षमता परिस्थितीत निश्चित बदल घडवू शकेल हा विचार मनाला पटतो.
नेहमीप्रमाणे मॅडम तुम्ही कथेतली व्यक्ती समोर उभी करतात सुंदर शब्दांकन.
— लता छापेकर. जळगाव
माध्यम वृत्तसेवा या लातूर येथील यू ट्यूब वाहिनीने नुकतीच माझी मुलाखत घेतली. ही मुलाखत पाहून प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
३१. देवेंद्र यांची मुलाखत फारच छान, मुद्देसूद ! माध्यमांची मुलतत्वे कायम आहेत हे त्यांचे विचार सद्य परिस्थितीत योग्य ! माध्यम क्षेत्र आता नवनवीन कल्पनातून वाचक/प्रेक्षक यांना आकर्षित करीत आहेत… देवेंद्रजींचे या मुलाखती बद्दल मन:पूर्वक अभिनंदन…
— सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
३२. खूप छान मुलाखत झाली. उदबोधक आहे. प्रवास अडचणीचा तरीही प्रेरणादायी आहे. अभिनंदन.
— श्रद्धा बेलसरे.
लेखिका, निवृत्त माहिती संचालक, पुणे
३३. मुलाखत बघून बरं वाटलं.
— विजया जोगळेकर-धुमाळे
निवृत्त दूरदर्शन निर्माती, मुंबई.
३४. आदरणीय श्री भुजबळ साहेब यांनी सेवानिवृत्ती नंतर आनंदी आणि क्रियाशील कसे रहावे याबद्दल लिहिणे आवश्यक वाटते. साहेब आपले अभिनंदन. मुलाखत छान झाली.
— डॉ गणेश मुळे.
माहिती उपसंचालक, कोकण विभाग, नवी मुंबई.
३५. माध्यमांचे स्वरूप बदलले तरी मूलतत्त्वे कायमच.. या मुलाखतीत छान मतं मांडलेत तुम्ही. मी अगदी सहमत आहे तुमच्या मतांशी.
— प्रा सौ सुनीता पाठक. छ. संभाजीनगर
३६. देवेन्द्रजी खूप छान व्यक्त झालात. तुमचा दूरदर्शन ते मावज पर्यंतचा प्रवास खाचखळग्यांचा असला तरी यशस्वीतेकडे नेणाराच ठरला हेच खरं.
— वीणा गावडे.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक, माहिती विभाग, मंत्रालय, मुंबई.
३७. देवेंद्र भुजबळ सर आपण अद्यापही एक्टिव्ह आहात माध्यमात राहून उत्तम माध्यम सेवा देत आहात लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व माध्यम तज्ञ गोपाळ कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत बोलकी आहे शुभेच्छा.
— रामचंद्र देठे.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. लातूर
३८. देवेंद्र जी, ज्या क्षेत्रात गेले तेथे निष्ठेने, जीव ओतून काम करण्याचा त्यांचा मुळ स्वभाव आहे असे गेल्या 40 वर्षांपासून
आमच्या दोस्तीत त्यांच्याबाबतीत मला आढळून आले आहे. ते सेवानिवृत्त झाले असले तरी माध्यम क्षेत्रात सक्रिय आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.
keep it up and go ahead भुजबळ साहेब.
— विजय पवार.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
३९. Devendra Bhujbalji, utkrusht mulakhat appreciated.
— Suresh Gokani. Retd Producer,
Doordarshan, Mumbai.
४०. अभिनंदन. मुलाखत पूर्ण पाहिली. माध्यम वृत्तसंस्था चांगले काम करीत आहे.
— प्रतिभा पिटके, अमरावती.
अन्य लेखनावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….
४१. आपल्या समुहाचा अभिमान, महाराष्ट्र राज्य निवृत्त माहिती संचालक आदरणीय देवेंद्र भुजबळ साहेब दररोज न विसरता न्युज स्टोरी टुडे समुहातील सर्वांनाच मिळत आहे, आभारी आहे.
— संदीप सातपुते. संगमनेर
४२. नमस्कार,
आपल्या आजचा पोर्टलचा अंक नेहमी प्रमाणे वाचनीय झाला आहे. विशेषत: हरहुन्नरी निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता मा.याकुब सईद यांच्या वरील लेख अप्रतिम. प्रसिध्दीच्या माध्यमात राहून सुध्दा मा. याकुबजी प्रसिद्धीपासून कोसो मैल दूर राहिले.. हे खरोखरच नवलच होय. अशा व्यक्तीमत्वाची माणसं आज इतिहास जमा झाल्यात जमा आहे.असो.. अशा या लोकोत्तर दूरदर्शनच्या अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या याकुबजीच्या समग्र जीवनाचा आढावा घेतला. आनंद झाला. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई.
४३. याकूब सईद यांची माहिती वाचली. त्यांचे कार्यक्रम, सिनेमे मनीं गूज करू लागले. छान, आमच्या ही शुभेच्छा.
मीराताईंनी प्रत्येक स्त्री च्या मनातील भावना च जणू शब्दबद्ध केल्या आहेत आवडले. त्या शेवट करतात एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
हरवेन मी हरपेन मी
तरी ही मला उमगेन मी.
“माझी जडण घडण” मधील दोन्ही आत्यांची वेदना आणि समाज यांचे विचार करायला लावणारे वर्णन मनाला भावले.
त्यांचे खालील प्रश्न पोट तिडकीने विचारले आहेत असे वाटते.
बेबीआत्याने खालच्या जातीतल्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं हे चुकलं का ? जातीधर्माचा इतका पगडा का असावा की तो गुन्हाच ठरावा ? ती असहाय्य होती म्हणून तिच्या हातून हे अविवेकी कृत्य घडले का ?
ती समाजाच्या दृष्टीने सुखी नसेलही पण तिने तिच्या आयुष्याशी केलेली तडजोड तिच्यासाठी समाधानकारक असेलही. यात जातीचा संबंध कुठे येतो ? जातीचा संबंध खरेच कोठे येतो ?
अरुणा ताईंची कविता म्हणजेच व्यथा आजच्या काळातील विदारक सत्य आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई.
४४. वाचकांच्या प्रतिक्रिया सार्वजनिक करणे हा प्रकार छान आहे. वाचकांनाही इतरांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद मिळतो.
— पुरुषोत्तम रामदासी. साहित्यिक
४५. याकूब साहेब हे ज्येष्ठ अधिकारी. मात्र खुर्चीचा गर्व न ठेवता, सहका-यांशी माणुसकीचे सुंदर चित्रण केले.
डॉ. सुमती क्षेत्रमाडे या मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक. त्यांचे साहित्य हे आपल्यासाठी दीपस्तंभ आहे. दिपाली वझे यांची व्यंगचित्रे आशयघन आहेत.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, ह. मु.इंग्लंड.
४६. अरुणाताई मुल्हेरकर यांची दिंडी वृत्तात लिहिलेली व्यथा ही कविता मनाला भिडणारी आहे. एक काळाचं वास्तव सांगणारी आहे. तसेच व्यथा उलगडत असताना त्यात एक प्रांजळ स्वीकृतीही जाणवते.
मा. याकूबजी सईद यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आदरपूर्वक प्रणाम !
देवेंद्रजी मा. याकूबजींवरचा लेख अतिशय ह्रुद्य आहे. लेखासोबतचे फोटो पाहताना प्रासंगिक जिव्हाळा, प्रेम, आदर अनुभवता आला. मा. याकूबजींचा परिचय प्रेरणादायी आहे.
— राधिका भांडारकर. पुणे
४७. अमेरिकेतील चित्रा मेहेंदळे यांनी श्री विठ्ठलाची रेखाटलेली सर्व चित्रे अतिशय सुंदर !त्यांचे मनापासून अभिनंदन..
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
४८. साहित्य वाचनाची गोडी निर्माण झाली, त्या वयापासून प्रचंड आवडत असलेली एकमेव लेखिका म्हणजे डाॅ. सुमती क्षेत्रमाडे ! आज खरोखरच कामात व्यस्त असूनही त्यांच्यावर लिहिलेला लेख वाचल्यावाचून राहवले नाही, आणि इतक्या आतुरतेने वाचल्यानंतर निराशाही झाली नाही. लेखिका संगीता कुलकर्णी ह्यांनी डाॅ. सुमती क्षेत्रमाडे ह्यांचा यथोचित परिचय करून दिलेला आहे. त्यांचे वैयक्तिक जीवनात, वैद्यकीय करिअर आणि साहित्यिक वाटचाल ह्यांचा सुंदर आढावा घेतला आहे. त्यामुळे ह्या इतक्या आवडत्या लेखिकेच्या कादंबऱ्यांमधून साकार झालेली काही पात्रे, काही प्रसंग ह्यांच्याविषयी मनात असलेले कुतूहल शमले. ते काय, कसे, वगैरे विषयांवर सविस्तर लिहायला गेले, तर माझाच स्वतःचा एक स्वतंत्र लेख तयार होईल, म्हणून तसे उल्लेख टाळून इतकेच लिहिते की लेखन क्षेत्रातील माझ्या ह्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या संगीता कुलकर्णी ह्यांचे आभार व अभिनंदन आणि माझ्या आजी, आई, व आमच्या नंतरच्याही पिढीतील आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या लाडक्या लेखिका सुमती क्षेत्रमाडे ह्यांना विनम्र अभिवादन.
सुमती क्षेत्रमाडे ह्यांचा फोटो लावलेला पाहून अधिकच आनंद झाला. लहानपणापासून दरवर्षी कोल्हापूर येथे अंबाबाईच्या देवळात जाताना महाद्वार रोडवर “डाॅ. सुमती क्षेत्रमाडे” ह्या नावाचा बोर्ड पाहात त्यांचे एकदातरी दर्शन घडावे म्हणून तिथेच रेंगाळत राहण्याची सवय आणि आवड जडली होती, ती ह्या फोटोच्या रूपाने थोडी पूर्ण झाली, ह्यासाठी लेखिका व संपादक दोघांचेही मनःपूर्वक आभार.
— सौ.मृदुला राजे. जमशेदपूर
४९. नूतन ची पालखी..त्यात विठ्ठल रखुमाई नामा झालेले विद्यार्थी सारे वाचून फोटो बघून आनंद झाला.
उभी वाटणी… आजच्या समाजाचे वास्तव चित्रण करते… पुढे असेच होणार असे दिसते आहे. एक वेगळा संदेश देणारी सहज सोप्या भाषेत लिहिलेली हृद्य कथा… त्यावरील चित्र.. भोला या बाल कलाकाराचे आहे न ?.. सुंदर
दीपालीजींचे रेखाटन स्तुत्य आहे.. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
विठ्ठल रचना वाचनीय.
— स्वाती वर्तक. मुंबई
५०. “पायरी” खुप छान. मृदुला राजे यांनी बाळकाकांचे व्यक्तिचित्र फार लिहीले आहे.
— शुभदा डावरे चिंधडे. कवयित्री, ठाणे
५१. सुनील चिटणीस यांचा “पायरी” हा लेख खूप आवडला.
शिवकालीन हिरोजी इंदुलकरांची आठवण ह्रद्य.
“मनुष्यरुपी भगवंत ज्याला सापडला तो कधीही पायरी चुकत नाही” हे पटले. मा. मृदुला राजे यांचे बाळ काका आवडले.
नव्वदाव्या वाढदिवसानिमीत्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !
— राधिका भांडारकर. पुणे
५२. गुरू पौर्णिमा… सर्वच रचना खूप सुंदर.
— अरुणा गर्जे. नांदेड
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800