लाडके विद्यार्थी योजना
कुलगुरू आपल्या दालनात फायली चाळत होते. अर्धा दिवस उलटून गेला, तरी कुणी निवेदन द्यायला आले नाही, मोर्चा घेऊन आले नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. हे रोज घडले नाही तर कुलगुरूंना चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.
तितक्यात सचिवाने दहा बारा विद्यार्थी आल्याचे सांगितले. नियमा प्रमाणे सुरक्षा गार्ड आधी आत आले. त्यांनी माहिती दिली. मुलांना फक्त निवेदन द्यायचे आहे. तसाही बाहेर आरडाओरडा ऐकू येत नव्हता. त्यामुळे कुलगुरू बिनधास्त होते. त्यांनी मुलांना परवानगी दिली. तसा घोळका आत आला. दोघे तिघे उपरणे घातलेले.. कुठल्या तरी पक्षाच्या विद्यार्थी सेनेचे स्वयं घोषित नेते.
“बोला काय काम काढलं ? कसली मागणी ?”
“निवेदन आहे सर लहानसे. सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा लाडक्या योजना सुरू केल्या आहेत. आमचे म्हणणे एव्हढेच आहे की, यालाच जोडून “लाडके विद्यार्थी” अशी योजना सुरू करण्यात यावी.”
“अरे व्वा ! छान कल्पना आहे. पण सरकारने करायचं काय ?”
“काही जास्त नाही सर. विद्यार्थ्याच्या हिताचे निर्णय घ्यायचे. त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या ?”
“म्हणजे नेमके काय करायचे ?” कुलगुरूंनी गुगली प्रश्न टाकला.
“सर, अनेक विद्यार्थी फेल होतात. त्यांना काही विषय समजत नाहीत. जड जातात. त्यांना सवलत द्यायची. पुढच्या वर्गात बसू द्यायचे. हजेरी नसली तरी परीक्षेला बसू द्यायचे. फी कमी करायची. हॉस्टेल मध्ये नोकरी लागे पर्यंत, म्हणजे सरकारी घर मिळे पर्यंत राहू द्यायचे. मेस मध्ये जेवू द्यायचे. सोपे पेपर काढायचे. परीक्षेची भीती वाटते सर सगळ्याच मुलांना. मुलं आत्महत्या करतात मग ताण सहन झाला नाही की !”
“अरे वा ! छानच कल्पना आहे की. मला देखील हे सुचलं नाही इतके दिवस. आपण असे करू, परीक्षाच बंद करू. विद्यापीठाचे लाखो, करोडो रुपये खर्च होतात परीक्षा घेण्यात.. पेपर काढा, ते तपासा, निकाल लावा यात प्राध्यापकांचा वेळही वाया जातो. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. कारण आपल्या निकालावर कुणी विश्वास ठेवत नाही. प्रत्येक कंपनी पुन्हा वेगळी परीक्षा घेते. पुढील शिक्षण घ्यायचे तर पुन्हा प्रवेश परीक्षा द्या. मग त्या प्रवेश परीक्षांचा घोळ, पेपर लीक होणे, निकाल चुकीचे लागणे, वरचा नंबर येण्यासाठी लाच देणे, जुगाड करणे.. तुम्हाला, तुमच्या पालकांना नसता त्रास. शिवाय सगळ्यांच्या वेळेचा अपव्यय. त्यापेक्षा आपण परीक्षा विभागच बंद करू.. चार वर्षे झाली की कोर्स पूर्ण केला असे सर्टिफिकेट देऊन टाकू. तुम्हालाही ताण नको. आम्हालाही ताण नको. शिवाय त्यामुळे सर्वाचा वेळ वाचेल. प्राध्यापक त्या वेळात संशोधन करतील. त्यामुळे देशाची प्रगती होईल. मुख्य म्हणजे लाखो रुपये वाचतील. ते पैसे आपल्याला, म्हणजे विद्यापीठाला, म्हणजे सरकारला लाडके विद्यार्थी योजने साठी सहज वळते करता येतील ! त्यासाठी बजेट मध्ये वेगळी तरतूद करावी लागणार नाही. आता परीक्षाच नाही म्हंटले की विद्यार्थ्याना ताण नाही. आत्महत्या नाही. सगळेच प्रश्न एकाच दणक्यात सुटतील. मी हे सहज रिकमेंड करतो पुढील कारवाई साठी.!”
कुलगुरू इतक्या सहजपणे हे सगळे मान्य करतील असे त्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना वाटले नव्हते. त्यांनी नारे लावले.. विजय असो.. लाडके विद्यार्थी झालेच पाहिजे !.. वगैरे..
मुलांनी निवेदन देताना फोटो काढले. नेते पुढे पुढे झाले.. अन् नारे देत निघून गेले..
पाचच मिनिटांत त्यातले दोन नेते पुन्हा परत आले. यावेळी ते चक्क कुलगुरूंच्या पाया पडले.. म्हणाले, “सर माफ करा.. तुम्ही काहीच ॲक्शन वगैरे घेऊ नका. आम्हाला वरचे नेते सांगतात ते आम्ही करतो. उद्या फक्त फोटो सह बातम्या यायला हव्यात आम्हाला.. तुम्ही परीक्षा विभाग बंद करू नका सर. उलट कडक धोरण ठेवा आहे त्यापेक्षा. आपल्या विद्यापीठाचे नाव झाले पाहिजे. ऱ्यांक वाढली पाहिजे. तुम्हीच ते करू शकता.”
कुलगुरू ओठातल्या ओठात हसले. कुलगुरू सोबत सेल्फी घेऊन नेते हसत निघून गेले. कुलगुरूंनी निवेदन फाईल करण्या साठी कुलसचिवा कडे पाठवून दिले !
एक तरी मोर्चा आल्याने कुलगुरूंना समाधान वाटले. आता लंच ब्रेक घ्यायला हरकत नव्हती !
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
प्रसिद्धीसाठी काहीही हाच आजच्या काळातील परवलीचा विचार बनला आहे.
या नकारात्मक तत्वावर केलेले सुरेख भाष्य म्हणजे हा लेख.