Friday, November 22, 2024
Homeसाहित्यकारगिल विजयदिन : २ कविता

कारगिल विजयदिन : २ कविता

१. कारगिल विजय

थंडगार दूतांनी आणिल्या वार्ता प्रलयाच्या
थरकापली की मने ऐकूनी कथा घुसखोरांच्या

धुमसणारा बर्फ पेटला अग्निचा वर्षाव करी
रौद्र होऊनि रुद्र नाचतो तांडव भयकारी

झेलीत वादळ थंड हिमाचे नजरा रोखूनी रक्षक ते
मुसंडी मारीत घुसला शत्रू ओकित आगीन गोळे ते

निधडी छाती घेऊन आमुचे जवान सज्ज जाहले
उद् घोष भारतभूचा करूनी मार्गी प्रस्थान ठेवियले

धडधडू लागल्या तोफा आणि हवाईहल्ले शत्रूवरी
तानाजीला अनुसरुनी ते करिती चढाई कड्यांवरी

अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज गनीम होता जरी
‘गनिमी कावा’ महाराष्ट्राचा पडला गनिमांना भारी

‘टायगर हिल’चा कब्जा करिता शत्रू आला जेरीस
मुजोर भाषा,शिरजोरी फुकाची तरी न गेली विलयास

कितीक वाहिली शिरकमले पदी स्थंडील अजूनही धगधगते
कारगिल,द्रास,बटालिक क्षेत्री विजयगाथा दुमदुमते

उध्दटासि होऊनि उध्दट,खटासही व्हावे खट
धडा शिकविण्या आक्रमकांना शासनानेही व्हावे धीट

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले. बदलापूर

२. आठवण बलिदानाची

सुवर्ण अक्षरांनी
इतिहासाची पाने फडफडली
ऑपरेशन विजयाची
ज्योत आसमंती झळकली

पराकाष्ठा झाली प्रयत्नांची
परिसीमा गाठली त्यागाची
झेप सर्वोच्च बलिदानाची
उंचावली मान तिरंग्याची

उमटले शहारे तनामनांवर
जवानांच्या शौर्याचे
रुजले क्षण धैर्याचे
आठवणींच्या मनपटलावर

हुंदके भारतवासियांचे
थबकले ओठात
हुंकार बोलके झाले
शहिदांच्या गौरवात

२६ जुलै अजरामर झाला
कारगिल स्मारकावर कोरला गेला
कृतज्ञतेने भारावून
स्मरणांच्या ज्योती उजळू लागल्या

नतमस्तक होऊ, शरण जाऊ
थोडे तरी उतराई होऊन
श्रद्धांजली वाहू

— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.

— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. दोन्ही कविता छान, अप्रतिम वाटल्या.नमन या देशाला आणि देश रक्षकाला.🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments