आगळे-वेगळे 💘
नकळत आम्हीही प्रेम सरोवरात पडलो. पण डोळे उघडे ठेवून, पोहण्याची हिम्मत बांधून मारलेली प्रेम छलांग होती ती.
प्रेम आंधळं असतं, प्रेमात सर्व क्षम्य असतं. परंतु ते डोळस असावं. प्रत्येकाच्या मतानूसार, प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. जसे, प्रेम म्हणजे सौंदर्य-सुख, बरे-वाईट विचार नसलेला मोहपाश. आंतरिक मनाची प्रेम-व्याख्या वेगळी असते. सौंदर्यापेक्षा जिथे स्वभाव गुणांची पारख होते व त्यात प्रेमाची ज्योत फुलते, ते असते वैचारिक खरे-खुरे प्रेम.
आठवीपासून, प्रत्येक वर्षी सहामाही नंतर, दिवाळी सुट्टीत गावातून मी मुंबईला काकांच्या घरी, वडाळा येथे येत असे. जेमतेम पंधरा दिवस मुंबईचा आनंद मी घेत असे. काकांच्या सोबतीने काम करणारे, त्यांचे मित्र दोन गल्ल्या सोडून, त्यांची पत्नी व सहा मुले, असे हे कुटुंब राहत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासू व क्रिकेट वेडा होता. वयाने माझ्यापेक्षा लहान होता. त्याचे काकांच्या घरी येणे-जाणे होते. थोडक्यात, चांगला घरोबा होता.
काकांच्या घरचे वातावरण अभ्यासक होते. हेच वातावरण नेमके त्या मुलाला खूप आवडत असे. काकांचा मुलगा- भाऊ, चौकस बुद्धिमत्तेचा. अनेक विषय चाळणे व त्याचा मन लावून अभ्यास करणे, ही त्याची अभ्यासक वृत्ती होती. माझा मामे भाऊ, महाविद्यालयात शिक्षण घेत होता. चिकित्सक वृत्तीमुळे तो मुलगा, ह्या वातावरणात चांगला रुळला होता. फक्त जेवणापुरतं घरी जाणे व शाळेत जाणे. उर्वरीत पूर्ण वेळ इथेच अभ्यास करत असे. सुट्टीचा रविवार आला की, मनमुराद क्रिकेट खेळण्यात पूर्ण दिवस, तो मुलगा मैदानात घालवत असे. दरवर्षी काकांकडे आल्यानंतर, मला अभ्यासाविषयी, सर्वांची बरीच मदत होत असे.
त्यावेळी गावाकडे कोणतेही क्लासेस नव्हते. दहावीच्या वर्षी, मी सहामाही नंतर अपेक्षित संच मुंबईला घेतले व त्याच आधारावर, दहावीच्या वर्गात घवघवीत यश मिळवले होते.
दर वर्षाच्या भेटीतून, आमची चांगली ओळख झाली होती. माझ्या भावांच्या बरोबरीत, तोही आमच्यातील मजा-मस्ती व गप्पांमध्ये मिसळून जात असे. ओळखीच्या टप्प्यातून पुढे सरकत ह्या मुलाशी माझी, चांगली मैत्री झाली होती. अभ्यासावरील गप्पा, पुस्तकांचे संचलन व वाचन, क्रिकेट मधील माहिती तर कधी डीबेट्स होत असत. त्याच्यातील नम्रपणा, मला खूप आवडत असे. साधी राहणीमान, मोठ्या व्यक्तीशी आदराने वागणे व अभ्यासक वृत्ती. अश्या गुणांमुळे, माझ्या भावांच्या मनात, त्याची उत्तम प्रतिमा तयार झाली होती. दिसण्यात तसा, वर्णाने गव्हाळ, अंगकाठी भक्कम बांध्याची, रेखीव चेहरा, चाल मात्र डोळ्यात भरण्यासारखी, मनमिळाऊपणा, निश्चयीपणा, रागीट पण स्वाभिमानी. असे व्यक्तिमत्व असलेला, त्याचे नाव “महेंद्र भाबल“.
या अवधीत महेंद्रचे दहावीचे वर्ष होते. परीक्षेच्या अगोदर, त्याला भयावह आजाराने गाठले. तेव्हा मात्र माझ्या जीवाची घालमेल होऊ लागली होती. नकळत मनातून अस्वस्थ वाटू लागले होते. पण हे असं का वाटे ? त्याची सोबत, त्याचे बोलणे, त्याचे रोज दिसणे, मला हवेहवेसे वाटू लागले होते. कदाचित त्याच्याही मनी, याच भावना होत असतील का ? त्याने काही खाल्ले असेल ना ? औषधं वेळेवर घेतली असतील ना ? अशा गोष्टींची मनी हुरहूर लागून राहत असे. मला त्याच्या बद्दल असे वाटणे, म्हणजे नक्की काय होते ? मनात प्रश्नांचा तांडव होत होता. पण उत्तर काही मला सापडत नव्हते.
अशक्त शरीर व मनाने भांबावलेल्या स्थितीत, त्याने बोर्डाची परीक्षा दिली होती. निकालात टक्केवारी घसरणार याची त्याला खंत वाटत होती. तरीही तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. शिक्षणाच्या अनेक वाटा असतात, हे त्यावेळी आम्हाला ठाऊकच नव्हते. महाविद्यालय म्हटले की फक्त तीन शाखा ! हेच डोक्यात होते.
अपूर्ण ज्ञानामुळे, कुवत असूनही, (शिक्षण कष्टाची) मोठी चूक माझ्याकडून झाली होती. माझ्याच सिद्धार्थ महाविद्यालयात, त्याला प्रवेश मिळवून देण्यास मीच पुढाकार घेतला होता. म्हणूनच अपुरी माहिती, नुकसानीस कारणीभूत ठरते.
माझ्या मागोमाग, त्याचे अकरावीचे वर्ष चालू असतानाच महेंद्रच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. त्याच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला. तेव्हा मी पुढच्या वर्गासाठी एस.आय.डब्लू.एस. महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
सुदैवाने, त्याच वर्षी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून, माझ्या भावाने नोकरीचा अर्ज भरण्यास मला प्रोत्साहीत केले होते. महिन्याभरातच मला “बॉम्बे टेलिफोन”चा, नोकरी करीता कॉल आला होता.
सन १९८१-८२ हे वर्ष, माझ्या भाग्योदयाचे वर्ष होते. परीक्षा संपता- संपताच इंटरव्यू झाला. लगेचच मला ट्रेनिंगला, मलबारहिल एक्सचेंज, वाळकेश्वर येथे पाठविण्यात आले होते. तेथील “म्हातारीचा बूट” व “हँगिंग गार्डन” पाहण्यासारखा आहे. अनेक रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला बगीचा खूपच मनमोहन वाटतो. त्या बागेत वेगवेगळ्या वेली, कमानीवर तर काही प्राण्यांच्या आकारावर लटकत सोडलेल्या आहेत. म्हणूनच त्या बागेला “हँगिंग गार्डन” असे नाव दिले असावे. दुपारी जेवण झाल्यानंतर, माझ्या नवीन मैत्रिणी, वंदना, भारती, पुष्पा, कीर्ती अश्या बऱ्याच जणी, ह्या बगीचात फेरफटका मारत असू. त्यामुळे तनामनावरील क्षीण निघून, ताजेतवाने वाटत असे. पुढील लेक्चर्स ऐकण्यास एक स्फूर्ती मिळत असे.
ट्रेनिंग संपून वॉड-बी एक्सचेंजला रुजू झाले नि लगेचच दुसऱ्या दिवसा पासून, डबल-नाईट शिफ्ट लागली. इथूनच शिफ्ट ड्यूटयांची मला ओळख झाली. तीन महिन्यांनी मी, प्रभादेवी एक्सचेंजला रुजू झाले. “नवीन एक्स्चेंज” म्हणून त्याचे ओपनिंग आमच्या सारख्या ऑपरेटर कर्मचारी वर्गाने, मोठ्या उत्साहात “स्पेशल सर्विस” सेवेतील कामांना सुरुवात केली होती. “प्रभादेवी इमारत” आमची शान होती.
आपल्या समाजात मुलगा आणि मुलगी सतत एकत्र दिसू लागले, की त्याची चर्चा होऊ लागते. पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाहण्याची दृष्टी वेगळी येते आणि तेच घडले होते. हळूहळू आमच्याही घरी ते वारे वाहू लागले होते. ह्याच दृष्यातून आम्हाला खूप उपदेश ऐकावे लागले होते. अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळे अर्थातच माझी रवानगी गावी करण्यात आली. तीन-चार महिने, माझी रजा वाया गेली. मला ऑफिस-लेटर मिळाले होते. त्यावेळी महेंद्र कडून पहिले प्रेमपत्र गावी आले होते. पण त्यात फक्त माझ्या नोकरीबद्दल लिहिले होते. “अशीच तू तिथे राहिलीस, तर ही नोकरी तुला गमवावी लागेल.” त्याच्या अतिदक्ष विचारांची ओळख मला इथे मिळाली होती.
सगळ्यांच्या विनवण्या करून मी मुंबईला, माझी बहिण बेबीकडे राहायला आले, आणि मी पुन्हा कामावर रुजू झाले. आता आम्ही दोघेही दूर दूर राहत होतो. पण मन मात्र एकमेकांकडे धाव घेत होते. त्यावेळी मोबाईल हे साधन नव्हते. कामावर गेल्यावर, त्याच्या घराच्या जवळच त्याच्या टेलर मित्राचे दुकान होते, त्या दुकानाच्या टेलिफोन वर मी फोन करत असे, आणि मग आम्ही भेटण्याचे ठिकाण व वेळ ठरवून घेत असू. आमचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे, वडाळा ब्रिजवरील बस-स्टॉप व त्यानंतर पुढचे ठिकाण म्हणजे माटुंगा जिमखाना कठडा. कामावरून सुटल्यावर आम्ही दोघं निवांत एक- दोन तास या कठड्यावर बसून स्वप्नांची रांगोळी रंगवत असू. माटुंगा जिमखाना, हे त्याचे क्रिकेट सरावाचे आवडते स्थान होते. कधीकधी ऑफिसला दांडी मारून पूर्णवेळ सोबत मिळावी म्हणून, आम्ही वडाळा ते ऑपेरा हाऊस, असा बस मधून प्रवास करत असू.
एकमेकांचा सहवास मिळावा, म्हणून क्वचितच भूक जाणवली तर, आम्ही विसावा हॉटेल, दादर येथे जात असू. तेव्हाचा एक प्रसंग ! विसावा हॉटेलच्या वरच्या मजल्यावर, एका कोपऱ्यातील टेबलावर आम्ही बसलो होतो. (कुणी ओळखीतील व्यक्ती आम्हाला पाहू नये. हा हेतू असे) मेनू कार्ड आले. वाचताना पदार्थाच्या किंमती वरून प्रथम नजर जात होती. कमी दराचा एक पदार्थ आम्हाला दिसला. पुढचा शब्द डोसा होता, हे खावून आपली भूक भागेल, असे वाटले. झाले ! केलेली ऑर्डर आली. तो पदार्थ पाहून, आम्ही संभ्रमात पडलो होतो. अर्धे टेबल, त्या रिकाम्या पेपर डोश्याने व्यापले होते. खूपच खजिल झालो होतो. बाहेरील जगाचे, आमच्यात असलेले अपूर्ण ज्ञान, आम्हाला शिकवण देत होते.
असाच एक मजेशीर किस्सा आमच्या सोबत घडला होता. त्या दिवशी महेंद्रला, चटपटीत खाण्याची इच्छा झाली होती. ग्रँटरोडच्या दिल्ली दरबार हॉटेलमधे गेलो होतो. नियमानुसार दर वाचले, नि मटण- सूप मागवले. एका बाऊलमधून, त्याने आणलेले रंगीत पाणी, चमच्याने वर खाली केले, पण त्यात मटण तुकडा एकही सापडला नाही. वेटरला विचारता कळले की, हा फक्त मटणचा रस असतो. त्यावेळी सुद्धा आम्ही अवाक झालो होतो. वेटरने आमच्या मनातील भावना ओळखल्या असाव्यात, ती डिश रद्द करून, त्याचे बिल न लावता, आम्हाला मटण मसाला डिश दिली होती. आम्हाला समजून घेणाऱ्या अशाही व्यक्ती, आमच्या आयुष्यात आल्या होत्या.
पण कधी पैशाची उधळण केली नाही. पैसा हात राखूनच खर्च करण्याचा नियम करत आलो. कारण कॉलेज शिक्षण घेता- घेता महेंद्र, सी.ए.कडे पार्ट टाइम जॉब करत होता. त्यावेळी त्याचा पगार फक्त दोनशे पन्नास रुपये होता. त्यामुळे पैशाची किंमत काय असते ? हा धडा आम्ही दोघांनी इथेच घेतला.
क्रिकेट म्हणजे त्याचा जीव की प्राण. दिवसभरात उपाशी राहूनही कित्येक सामने तो खेळत असे. त्यात मलाही भेटण्याची उत्सुकता असे. काही वर्षातच मला लग्नासाठी स्थळे येऊ लागली. काही ना काही कारण देऊन मी टाळण्याचा प्रयत्न करू लागले. पण हे असं कुठवर चालणार ? शेवटी मी माझा प्रस्ताव ह्याच्या समोर ठेवला. त्यावेळी मला मिळालेले उत्तर असे होते, “मी अजून माझ्या पायावर उभा नाही. माझे शेवटचे वर्ष पूर्ण व्हायचे आहे. तेव्हा पुढे जाऊन आपण काय करू शकतो? तू एखादं स्थळ पसंत करून, लग्न कर.” पण माझ्या मनाला, ही गोष्ट काही पटली नाही. एकात मन गुंतून, दुसऱ्याशी विवाह. अशक्य !! मला सुखी आयुष्य लाभावं, अशी त्याची त्यागी स्वभावाची चाहूल मला लागली होती.
सहा वर्षाच्या प्रेम-सफरला पूर्ण विराम घेण्यासाठी, अखेर शेवटच्या निर्णयावर येऊन पोहोचलो. काही होवो, जिद्द आणि हिंमत दोघांनीही मनाशी बांधली. आपण रंगवलेल्या स्वप्नांची पुर्ती नक्कीच होईल. विश्वासाची साखळी मजबूत ठेवली तर आपण, आपल्या नव्या आयुष्याची उभारणी सफल करू.
दोन्ही कुटुंबांची मने तोडून आम्ही (दोघेही या गुन्ह्यास अपराधी) शेवटी कोणताही, कुणाचाही विचार न करता, साऱ्यांची मने दुखावून, दिनांक २१ जानेवारी १९८८ मध्ये आम्ही, कोळकेश्वर मंदीर, नायगाव येथे विवाहबद्ध झालो.
आमच्या प्रेम विवाहास, जर विरोध नसता, तर ही वेळ आली नसती. पण आता पुढे गेल्यानंतर जाणवलं, की प्रेमाने फक्त दोन व्यक्ती जुळत नसतात, तर दोन कुटुंबे सुद्धा जोडली जात असतात. आमचं दुर्दैव ! आम्हाला ते लाभलं नाही. पण आमचा संसार आम्ही एका कपापासून सुरू केला. उशीरा का होईना ! सर्व नातीगोती, मित्रपरिवार दोन्ही कुटुंबे एकत्र आणण्यास, आमच्या यशस्वी प्रेमविवाहाने आम्हास बळ दिले होते.
मित्रांनो ! या सुखमय संसाराच्या यशाची किल्ली आहे, दोघांमधले सुख-दु:खी एकमेव प्रेम आणि मजबूत विश्वासाची अखंड साखळी. अर्थातच, एकमेकांनी एकमेकांसाठी, तयार केलेले, आयुष्य-सोबतीचे सुरक्षा कवच होय !

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800
धन्यवाद !! तुमचा उत्तम अभिप्राय माझ्या लेखनाची ताकद आहे.🙏🙏
सौ. वर्षा भाबल आपण आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलावर प्रेम केले आणि दोघांनीही मनाशी जिद्द आणि हिंमत बांधून दोघांच्याही घरून विरोध असताना ईश्वर साक्षीने प्रेमाविवाह केला. कोणतीही गोष्ट न लपवता आपण आपल्या प्रेम प्रवासाचे दिल खुलास वर्णन केले कारण त्या प्रेमात पावित्र्य होते. माझी खात्री आहे लग्नाच्या 33 वर्षानंतरही आपले प्रेम चिरतरुण असेलच त्याबद्दल कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. असेच वर्षानुवर्षे तुम्हा उभयतांमध्ये प्रेम वृद्धिंगत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
🙏 एम. बी. आरोटे