‘अंदाज तुमचे अन हाल आमचे !’
हवामान खात्याच्या सर्व तज्ज्ञ मंडळींना आणि त्यांचे अंदाज मनोभावे ऐकणाऱ्या आपण सर्वांना माझा साष्टांग प्रणिपात ! हवालदिल करणाऱ्या या हवामान विभागाला आम्ही नुसते विचारले, “हाल कैसा है हवामान का ?” तर आज वेगळंच बोलले हो, “क्या खयाल है आपका ? “कारण ? ऐका (म्हणजे वाचा !) आमच्या वेळी हे असं नव्हतं बरं कां ! एक पावश्या पक्षी म्हणे सांगायचा पाऊस कधी येणार. जास्तच काव्यगत न्याय हवा असेल तर आभाळाकडे बघत कुठेतरी हलकीशी घनगर्जना ऐकली की मोर तुफान नाचायचा ! तेवढ्यात बघे जमा झाल्यावर त्यांनी कितीही वन्स मोअर दिलेत तरी फोटोला नकार देत एखाद्या मूडी कलाकारासारखा याचा मूडच जायचा.
मंडळी, या जुनाट कल्पनांना छेद देत जगातील हवामानतज्ज्ञांनी असे तंत्रज्ञान विकसित केलय म्हणे की, दर मिनिटाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ह्युमिडिटी, वाऱ्यांची दिशा, वेग इत्यादींचे मूल्यमापन करीत तासागणिक पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय.
बरे एक नव्हे तर अनेक प्रायव्हेट एजन्सीनी यात उडी टाकत्या झाल्यात आणि वेधशाळा ऍक्टिव्ह मोड मध्ये आल्यात. या सर्वांचे ऍव्हरेज काढावे तर नेमका अंदाज येईल असे काहींचे अंदाज सपशेल चुकले.
गेला बाजार शेती कामे, दुकानदारी, फेरीवाल्यांचा बिझिनेस या अशा ठिकाणी तर ‘गोंधळात गोंधळ’ होऊन नुकसानीचे आकडे बघितल्यावर डोळ्यांसमोर चक्क ऊन असतांना अंधारी यायला लागली अन दिवसा-ढवळ्या ‘शुक्र तारा मंद वारा’ हे फील यायला लागले. इथवर गोष्टी पोचल्या.
आता कालचीच मुंबईची गोष्ट! शासन, महानगरपालिका इत्यादी मान्यवर संस्थांनी वेधशाळेचे अप टू डेट अहवाल मागवीत वायुगतीने ऑर्डर दिल्या. त्या त्याच स्पीडने शाळांत अन कॉलेजमध्ये पोचल्या. दुपारी पोरांचे पार्सल घरी आणता आणता बसवाल्यांची अन पालकांची दमछाक झाली. पिल्लांना घरट्यात ठेवता ठेवता पाऊस ओसरला. तिकडे पुण्यात (पुणे येथे स्थित) वेधशाळेने अचूक वेध साधत, हलका ते माध्यम पाऊस येईल असे अंदाज वर्तवले. हा पाऊस कसा लब्बाड हो ! चक्क पुण्याच्या संस्थेचा अपमान करायला गेला ! असा बरसला धो-धो की ज्याचे नांव ते ! धरणे ओसंडून वाहत होती, घराघरात एकात्मतेचा इशारा देत पाणी घुसले. पामर नागरिकांनी काय गुन्हा केला हो ? फक्त पावसाचा अंदाज ऐकला.
आताशी ना सगळ्यांना काठावर पास व्हायचे वेध लागलेत. म्हणूनच हा पाऊस उनाड विद्यार्थ्यांसारखा वागतोय. वेधशाळेतील मास्तरांचे कां ऐकत नाही कुणास ठाऊक ! कालचे सोडा, कारण कालचा विचार करणे काळाचा अपव्यय आहे ! सगळीकडे काल पावसाचा डॅशिंग डिस्को डान्स बघून सर्व गणमान्य सरकारी संस्थांनी अधिक कसोशीने अभ्यास करीत धडा आत्मसात केला. काल संध्याकाळी अति तत्परतेने आमच्या ठाण्यात, पुण्यात (मुंबईत नव्हे) आणि इतर भागात आज शाळा कॉलेज बंद ठेवलेत. आता हद्द झाली या खोडसाळ पावसाची. आज पहाटेपासून कुठे लपलाय कुणास ठाऊक. कदाचित त्याला पण रेस्ट घ्यायची असेल. पण आमची परत तक्रार आहेच, मान्यवर संस्थांचे आदेश न पाळण्याची याने शपथ घेतली की काय ? या शंकेला वाव आहे, कारण हे सर्व पहाटे घडले. पोरांच्या विविध परीक्षा पुढे ढकलल्याने ते जाम वैतागलेत. त्यांचे वीकएन्डचे प्लॅन या पावसामुळे पार पाण्यात वाहून गेलेत की !
मला तर वाटतंय या पावसाला टीन एज सिन्ड्रोमची लागण झालीय ! ते कसे, वडीलधाऱ्यांनी सांगितल्यावर नेमके त्याच्या उलट वागतात. आता एक प्रयोग करण्याविषयी माझा अनाहूत सल्ला. वेधशाळांनी त्यांचा अंदाज काढावा अन त्याच्या उलट अहवाल शासनास अन जनतेला सुपूर्द करावा. पण एक शंका (आहेच). कधी नव्हे ती पावसाला या गनिमी काव्याची खबर लागली अन त्याने आपली ‘निळी छत्री’ उलटी धरली तर ? त्यापेक्षा ‘आलिया पावसाशी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान’ ! पोरांकडून बरेच शिकण्यासारखे आहे. पाऊस येवो का न येवो ‘शाळा नसणे’ या एका गोष्टीचा आनंद घेणाऱ्या बाळ गोप गोपिकांच्या खेळाचा कधीच खेळखंडोबा होत नाही.
मैत्रांनो, गमतीचा भाग संपला बरं कां !
लेखाच्या शेवटी, कित्येक वादळवाऱ्यांच्या सखोल आणि अचूक अंदाजाने लाखो नागरिकांचे प्राण वाचवल्याबद्दल सर्व हवामान तज्ज्ञ मंडळींचे मनापासून आभार ! तसेच विशेष आभार, भर पावसात नाले, रस्ते तसेच गटारांची सफाई अविरतपणे करणाऱ्या महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे आणि पूरग्रस्त भागात स्वतःच्या प्राणांची बाजी लावत हजारो नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या एन डी आर एफ च्या वीर जवानांचे !
धन्यवाद !
— लेखन : डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अभिनंदन 💐👍🏻👏👏👏 खूपच छान 👌🏻👍🏻🌹 मस्तच लिहिले 👌🏻👌🏻👌🏻 फारच आवडले.