माझ्या वयाच्या अडतिसाव्या वर्षी मला माझ्या कार्यालयातील ‘अधिकारी‘ पदाचे प्रमोशन मिळाले व त्या प्रित्यर्थ मला माझ्या यजमानांनी ‘मारूती गाडी‘ भेट दिली.
मला आनंद झाला पण, एकीकडे प्रमोशन म्हणजे जबाबदारी. नवीन ठिकाण, नविन कर्मचारी. मुलीपण लहान, त्यांच्या परीक्षा, घरातील जबाबदारी असे अनेक प्रश्न डोकावत होते.
मी जरी दहा वर्षांपूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स काढले असले तरी आता मला गाडीचे ए,बी,सी (ए-अॅक्सलेटर, बी-ब्रेक, आणि सी-क्लच !) ही आठवत नव्हते.
‘तू रोज तुझी गाडी घेऊन जा, ड्रायव्हर थोडे दिवस शिकवेल. मग तू तुझी स्वतः घेऊन जात जा’ मिस्टरांनी सांगीतले.
उत्साह, भीती, जबाबदारी, वेळेचे बंधन सगळे हातात हात घेऊन उभे होते.
एक दोन दिवस ड्रायव्हरने गाडी शिकवली. तिसऱ्या दिवशी मी चालवायला घेतली. जेमतेम सोसायटीतून गाडी बाहेर काढली. हायवेतला ट्रॅफिक बघितला आणि लगेच सीटची अदला बदल केली.
असे एकदोन दिवस होत नाही तर,…
चौथ्या दिवशी ड्रायव्हर ‘आज येणार नाही’ चा निरोप आला.
अरे बापरे ! ब्रम्हांड आठवलं. सगळे देव आठवले. चेंबूंर ते वडाळा गाडी मी एकटीने चालवायची ! परमेश्वराच्या धावा करत चेबूंरहून गाडी काढली. सुमननगरच्या सिग्नल पर्यंत आली. सिग्नल लागला. गाडी थांबवली. आजूबाजूचा ट्रॅफिक, हाॅर्नचा आवाज, तीन रस्ते एकत्र, माणसांची रस्ते ओलांडायची घाई, चार पाच कडक युनिफॉर्म मधले हवालदार बघून मला घाम फुटला. समोर ‘ग्रीन सिग्नल’ बघून गाडी गीयरला टाकण्यात गोंधळ झाला. गाडी थोडी चालवेपर्यंत तीन रस्त्यात अगदी मधोमध गाडी ठप्प ! खिडकीतून हात बाहेर काढून मागच्या गाड्यांना थांबा म्हणे पर्यंत मागची गाडी माझ्या गाडीवर आदळली.
मागच्या गाडीचे हेडलाईटस तर माझ्या गाडीचे बॅकलाईट्स व बम्पर तुटले. मी खूपच घाबरले. मी मागच्या गाडीला काही बोलणार तेवढ्यात तोच मला ‘साॅरी साॅरी’ करत निघून गेला. कदाचित त्याचा ड्रायव्हिंगचा पहिला दिवस असावा. माझी शंभर टक्के चूक असताना तो मला साॅरी म्हणत गेला. मला वाईट वाटले. मी नर्व्हस झाले.
आता अगदी शांत होत अगदी गंभीरपणे हळूहळू गाडी चालवत चालवत (न पळवता) एकदाची ऑफीसमध्ये आणली. पार्क केली. कशातच लक्ष लागेना.
घाबरत घाबरतच मिस्टरांना फोन केला. घडलेला प्रसंग सांगीतला. मिस्टरांचा मूड बहुदा चागंला होता. ठीक आहे गं असं होतं कधी कधी. संध्याकाळी गाडी रिपेअर करू या.
काळजी घे, काळजी करू नको म्हणाले.
वा ! बिलकूल न ओरडता, आश्चर्य वाटले.
संध्याकाळी सगळे देव आठवत सर्व देवांचा धावा घेत घेत गाडी धावायला, नाही नाही चालवायला काढली. फक्त पुढे बघायचे, लेन बदलायची नाही.
सिग्नल, हवालदार, माणसांची वर्दळ बघत बघत अगदी अगदी हळूहळू घाई न करता ‘मना’ला व ‘मारूती’ला शिस्तीत घरी आणली.
गाडीची चावी मिस्टरांना देत, बस नको ती गाडी, नको ते ड्रायव्हिंग, मला जमणार नाही म्हणत शरणागत झाली.
घरच्यांनी मला वेड्यात काढले .
रोज गाडी चालवलीस की ‘परफेक्ट’ होशील म्हणत मला आत्मविश्वास दिला. आता वीस वर्षे झाली मी रोज गाडी चालवते.
विशेष म्हणजे आता वेगवेगळया कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्या मी आनंदाने चालवते. आता माझी ‘कार’ सफर ‘सूहाना’ सफर असते.
अशी माझी ही “कार”कीर्द आहे. आपल्याला कशी वाटली, ते नक्की कळवा.

– लेखन : पूर्णिमा शेंडे
– संपादन : अलका भुजबळ 9869484800.