नवी मुंबईतील पर्यावरण कार्यकर्ते, नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक, पत्रकार बी एन कुमार यांना पर्यावरण श्रेणी अंतर्गत नुकतेच ‘सारस्वत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
‘शब्दयुद्ध, आतंक के विरुध्द’ (दहशतवादाविरुद्धचे शब्दांचे युद्ध) या मालिके अंतर्गत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेलापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्थेच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
हे वार्षिक पुरस्कार देणाऱ्या श्रुती संवाद साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष अरविंद शर्मा ‘राही’, या वेळी बोलताना म्हणाले की, पर्यावरणावरील हल्ला हा दहशतवादी हल्ल्यापेक्षा कमी गंभीर नाही. त्यामुळे सारस्वत पुरस्कारांसाठी पर्यावरण हा गंभीर विषय म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय साहित्य पुरस्कार समितीने घेतला आहे. सारस्वत हा शब्द शिक्षणाची देवी सरस्वतीपासून बनला आहे.
नवी मुंबईसाठी फ्लेमिंगो सिटी टॅग मिळवण्याच्या मोहिमेत बी एन कुमार आणि त्यांच्या नॅटकनेक्ट संस्थेचा मोलाचा वाटा आहे असे सांगून त्यांनी मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील खारफुटी, पाणथळ जागा आणि टेकड्यांचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता आणि अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारी वाढवण्यापासून बचाव करण्यासाठी कार्यकर्त्याचे कौतुक केले.
हा पुरस्कार स्वीकारताना बी एन कुमार म्हणाले की, मी हा पुरस्कार सर्व सहकारी, पर्यावरण कार्यकर्त्यांना त्यांच्या निःस्वार्थ लढ्यासाठी समर्पित करतो.
मित्र मंडळीत, जवळच्या लोकांमध्ये प्रेमाने बीएनके म्हणून ओळखले जाणारे बी एन कुमार हे ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. ते लष्करी कुटुंबात वाढल्यामुळे बाल पणापासुनच सेवा, शिस्त, वचनबद्धता आणि निष्पक्षता हे गुण त्यांच्या अंगी बानल्या गेले.
उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबादचे माजी विद्यार्थी असलेल्या कुमार यांनी आणीबाणीच्या अत्यंत कठीण काळात पत्रकारिता सुरू केली. हैदराबादमधील इंडियन एक्सप्रेस, द डेली न्यूज आणि द स्कायलाइनमध्ये त्यांनी काम केल्यानंतर ते मुंबई मध्ये १९७७ साली आले आणि उपसंपादक फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात रुजू झाले. त्यांच्या जिज्ञासूपणामुळे त्यांना डेस्क जॉब सोडून युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएनआय) मध्ये वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस सर्व प्रथम बातम्या देणारी वृत्त संस्था म्हणून यू एन आय ची ख्याती होती.
पुढे बी एन कुमार पत्रकारितेमधून देशात जनसंपर्क संस्थेचा पाया घालणाऱ्या O&M या जनसंपर्क संस्थेत आले. (आता Ogilvy PR) पण नंतर ते इंडियन एक्स्प्रेस, मिड-डे आणि बिझनेस इंडिया या वृत्तपत्रांसाठी काम करू लागले. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया आणि संडे, ऑनलूकर, सूर्या इंडिया आणि द वीक या मासिकांसाठी हि भरपूर लेखन केले आहे.
जनसंपर्क क्षेत्रात कुमार यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स इन्फोकॉम, कॅपिटल इमेजेस, बीहाइव्ह कम्युनिकेशन आणि कॉन्सेप्ट या कंपन्यांसाठी काम केले.
बीएनके सध्या बिझन्यूजकनेक्ट, द इमेज न्यूज कनेक्ट, द सिटी न्यूज, नेट कनेक्ट फाउंडेशन( स्वयंसेवी संस्था ), द कनेक्ट टिव्ही ही यू ट्यूब वाहिनी या संस्थांशी संबधित आहेत. या बरोबरच ते कॉर्पोरेट जगतासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, विविध विद्यापीठात पत्रकारिता, जनसंपर्क या विषयावर व्याख्याने देत असतात.
नॅटकनेक्ट फाऊंडेशन ही संस्था पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या प्रमुख कामगिरीमध्ये पुढील बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.
१) नवी मुंबईला फ्लेमिंगो शहर म्हणून नाव मिळवून देणे.
२) श्री एकविरा आई प्रतिष्ठानच्या सहकार्याने पासिक टेकड्यांचे उत्खनन करून त्या नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी यशस्वी मोहीम राबविणे. या मोहिमेमुळे आता सरकारने उत्खनन परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
३) दोन्ही संस्थांनी नवी मुंबईतील खारफुटी आणि पाणथळ जागा वाचवण्यासाठी विशेषत: उरण तालुक्यात अनेक मोहिमा राबवल्या.
४) अलीकडेच डीपीएस फ्लेमिंगो सरोवराचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मोहिमेचे नेतृत्व केले. आर्द्र प्रदेश कोरडे पडल्यामुळे अनेक फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने हे फ्लेमिंगो डेस्टिनेशन म्हणून जतन करण्याचे मार्ग सुचवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
५) नॅटकनेक्ट फाउंडेशनद्वारे चालवलेल्या तीन मोहिमांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे :
डीपीएस फ्लेमिंगो लेक येथे फ्लेमिंगोचा मृत्यू : एनजीटी प्रमुख खंडपीठाने नॅट कनेक्ट मोहिमेवर आधारित इंडियन एक्सप्रेसच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे. आता हे प्रकरण पुण्यातील पश्चिम विभागीय खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे.
६) रहिवासी पासिक टेकडी तोडणे: महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने मिड-डे न्यूज पेपरमधील वृत्ताची स्वतःहून दखल घेऊन सिडकोला कायदा राबविणे सक्तीचे केले आहे.
७) भूस्खलन प्रवण बेलापूर टेकडीवरील बेकायदा मंदिरांची मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे.या प्रकरणाची आता सुनावणी सुरू आहे.
८) उलवे किनाऱ्यावरील बालाजी मंदिरासाठी भूखंड वाटप करताना पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॅटकनेक्टने राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे . तसेच उच्च भरतीच्या रेषेवर साक्सा बीचवर समुद्राची भिंत बांधण्यासही आव्हान दिले आहे.
९) विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी जागृती मोहीम.
पुरस्कार :
बी एन कुमार यांच्या पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करणाऱ्या या संस्थेने आता पर्यंत ६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. टेकड्या, पाणथळ जागा आणि खारफुटी जतन करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक मोहिमेबद्दल त्यांना अलीकडेच पर्यावरण श्रेणी अंतर्गत सारस्वत पुरस्कार देण्यात आला. तर पीपल्स मिशन या स्वयंसेवी संस्थेने ‘क्रांतिकारक कॉम्रेड शिव वर्मा मीडिया पुरस्कार २०२२-२३’ या पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन केले आहे.
पत्रकारिता, जनसंपर्क आणि पर्यावरणवादी या क्षेत्रातील योगदानासाठी ३० पुरस्कार मिळविलेले बी एन कुमार हे तरुणांसाठी एक आदर्श आहेत.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कुमार सरांचे कार्य युवकांसाठी मार्गदर्शक आहे.