“वाचनवाटा”
जवळपास साठाहून अधिक पुस्तकांच्या वाचनात मी ब-याच जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादांचे परीक्षण देवेंद्रजी भुजबळ यांच्या सौजन्याने ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टलवर सादर केले आहे. त्यावर अनेक वाचकांनी चांगले अभिप्राय देखील दिलेले आहेत.
आज इंग्रजी पुस्तकांचा शोध घेतांना मला सकाळ प्रकाशनचे जागतिक अभिजात साहित्यावरील ‘वाचनवाटा’ हे पुस्तक हाती आले. ‘सकाळ अँग्रोवन’चे संपादक संचालक श्री आदिनाथ चव्हाण यांनी आपल्या नियतकालिकेत लिहिलेल्या ‘मला भावलेलं पुस्तक’ या स्तंभलेखनाचं ‘वाचनवाटा’ हे संग्राह्य पुस्तक ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील आहे.
प्रस्तुत पुस्तकातून आदिनाथ चव्हाण यांनी वाचकांना जागतिक साहित्य विश्वातील एकेक अनमोल नक्षत्रासारख्या ३८ पुस्तकांची निरखून पाहण्याची रीत दाखविली आहे.
इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, आणि मानसशास्त्र या क्षेत्रांमध्ये वाचकांनी अभ्यासाच्या दृष्टीने विषय समजून घ्यावा ही कळकळ घेऊन त्यांनी या पुस्तकात लिओ टोलेस्टाॅय, हेन्री डेव्हिड थोरो, खलिल जिब्रान, ऑस्कर वाईल्ड,अर्नेस्ट हेमिंग्वे, जाॅर्ज ऑरवेल, बर्ट्रांड रसेल, गॅब्रिअल गार्सिया, मार्केझ, सिग्मंड फ्राॅइड, सिमोन द बोव्हूआर आदी महानुभावांच्या अनुभव व विचारविश्वाचं प्रतिबिंब असलेल्या महान साहित्य कृतीची, ‘वाचनवाटा’त एक उत्तम सफर घडविली आहे.
या वाचन सफरीत विश्व वाड्मयातील इंग्रजी पुस्तकांचा मराठीतील अनेक प्रथितयश लेखकांनी मराठीत अनुवाद केलेल्या ३८ पुस्तकांचा समावेश असून श्री आदिनाथ चव्हाण यांनी या अजरामर कृतीचं रसग्रहणात्मक सार लिहिले आहे. माणूस, त्याचं मन, जीवन, त्याचे जगतांनाचे संघर्ष, त्याची प्रेमभावना व त्यातून घडणारं दिव्य वाचकाला भिडवतात. निसर्गाचं सौंदर्य व गुढता दाखवितात. जगातील अभिजात साहित्य, त्याची महत्ता व समकालीनता जाणून देत वाचकाला अंतर्मुख करतात. अलंकारिकता टाळणारी साधी प्रवाही भाषा, मनात घर करणारी चपखल शब्दयोजना, पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते हे या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य मानले पाहिजे.
आदिनाथ यांनी निवडलेल्या अडतीस पुस्तकांना पाच गटात विभागलं आहे.माणूस व माणूस पण जाणून घेणारी ‘दो लफ्जों की हैं दिलं की कहानी’ या पहिल्या भागात दहा पुस्तकांचा समावेश केला आहे.तर माणसांच्या वाट्याला येणारे जीवन व संघर्ष दर्शविणारे “जिंदगी इक सफर है सुहाना” या दुसऱ्या भागात आठ पुस्तकांचा समावेश आहे. तिस-या भागात ” कभी किसी को मुक्कमल जहाँ नहीं मिला” या शीर्षकाखाली नऊ पुस्तके असून चौथ्या भागात “तोरा मन दर्पण कहलाए” मध्ये सात पुस्तकांचा तर पाचव्या भागात “निसर्ग राजा ऐक सांगतो” या शीर्षकाखाली चार पुस्तकांचा समावेश केला आहे. यातून वाचकाला समृद्ध करणारा साहित्यानुभव मिळतो.
सर्व अडतीस पुस्तकांना सुरेख, सुंदर, छान शैलीत शिर्षिके दिली असून पुस्तकाच्या फोटोसह,मुळ पुस्तकाचे नाव, मुळ लेखक व अनुवादाचे नाव प्रस्तुत केले आहे. ते केवळ पुस्तक परिचय करून देत नाही तर लेखकाची माहिती, त्याची घडण, पुस्तकामागील पार्श्वभूमी, पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व व त्याची समकालीनता हे सारं काही हळूहळू उलगडत नेतात. बहिणाबाई, ग.दि. माडगूळकर, सुरेश भट, साहिरलुधियानवी व मिर्झा गालिब यांच्या काव्याचा स्पर्श करून वाचकांची अभिजात साहित्याशी जवळीक निर्माण करतात. या साहित्याचा आपल्याशी कोणतं नातं लागतं ? त्यातून आपण काय घ्यावं? हे संयमी भाषेत हळुवारपणे सांगत जातात. क्षुद्र व हिंसक वृत्तीचा धिक्कार करताना, त्या मागील कार्यकारणभाव सौम्यपणे व्यक्त करतात.
‘वाचनवाटा’ पुस्तकातील केवळ दोन तीन पुस्तकांचा परामर्ष मी विस्तारभयापोटी दोनतीन वाक्यात घेत आहे. “Man’s Search For Meaning” या व्हिक्टर फ्रॅंकल लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद डॉ विजया बापट यांनी ‘अर्थाच्या शोधात’ या नावाने केला आहे.त्यात म्हटलं आहे की, माणसानं आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. अन्यथा मांजा तुटलेल्या पतंगासारखी अवस्था होऊ शकते.असे लक्षावधी भरकटलेले पतंग आपल्या आजूबाजूच्या अवकाशात तरंगताना दिसतील. आपल्या पतंगाचं काय करायचं हे मात्र आपल्यालाच ठरवता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या हाती दोरी देऊन स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी नाकारणाऱ्या बांडगुळांची कमतरता या भूतलावर नाही.
‘For Whom The Bell Tolls’ या पुस्तकाचे मूळ लेखक नोबेल सन्मानित अर्नेस्ट हेमिंग्वेचं ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाखाली दि.बा.मोकाशी यांनी अनुवादित केले आहे.मानवी जीवनात कितीही अनिश्चितता असली तरी प्रेम अमर असतं. हृदयाच्या लेखातून ते कुणी खुडून काढू शकत नाही. किंबहुना जगण्याची उर्मी म्हणजे प्रेम, जगण्याची ऊर्जा म्हणजे प्रेम! असे म्हटलं आहे. याच लेखकाचं ‘The Old Man And The Sea’ या पुस्तकाचं पु.ल.देशपांडे यांनी ‘एका कोळीयाने’ या नावाने अनुवाद केला आहे.माणूस जात तशी चिवट. माणसाला उध्वस्त करता येईल एखाद्या वेळी, पण त्याला पराभूत करणं कठीण! जिद्द, चिकाटी आणि विजिगीषू वृतीचं अनोखे दर्शन घडविणारी कादंबरी म्हणून तिला जगभरातल्या साहित्य रसिकांनी डोक्यावर घेतलं ! हे वाचतांना मला कुसुमाग्रजांची कोलंबसाचं गर्व गीत कविता आठवली. त्यातल्या शेवटच्या ओळी आहेत..
“नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली |
निर्मितो नव क्षितिजे पुढती ||
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती |
कथा या खुळ्या सागराला…… Il
‘”अनंत अमुची धेय्यासक्ती अनंत अन् आशा”|
किनारा तुला पामराला”||
मानवी अस्मितेची विजय पताका सतत फडकवत ठेवण्याची प्रेरणा त्या ओळीत दिसते.समुहमनाच्या नेणिवेत घर करून राहणा-या, मानवी समाजाला उत्तुंग स्वप्ने पाहण्याची अन् ती स्वप्ने वास्तवात आणण्याची क्षमता बहाल करणा-या ओळी आहेत हे ‘एका कोळीयाने’ वाचून क्षणभर कुसुमाग्रजही आठवले.
आदिनाथ चव्हाण यांनी वाचकांना जागतिक अभिजात साहित्यविश्वातील ऐक अनमोल ठेवा एखाद्या नक्षत्रा सारखा ‘वाचनवाटा’ रूपाने दिला आहे.
वाचकांना विश्वासात घेत नवनवीन विषयांकडे नेण्याचं कौशल्य दाखवून दिले आहे. पर्यावरण अभ्यासक ,लेखक अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनाला विराट करणारी ही विचारांची वैश्विकता भावली तर पुस्तक व वाचकांमध्ये अडचण असणारे ‘पडदे’ दूर होत जातील. तेव्हा तुकोबा, ज्ञानोबा ते विनोबा आदी प्रभृती काय व कां म्हणाल्या हे उमजत जाईल.उत्तम वाचनाची सवय जडलेल्यांच्या वाचन वाटांवर प्रकाश टाकणारा हा खरोखरच मोठ्ठा खजिना आहे असेही मला या पुस्तकाच्या वाचनाचा आनंद घेतांना निश्चितपणे वाटले, यात तीळमात्र शंका नाही.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वाचनवाटा हे मराठी साहित्यातील दिशादर्शक मानदंड.