Friday, December 27, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ५४

साहित्य तारका : ५४

मराठी साहित्यात स्वातंत्र्योत्तर काळात ज्या कवयित्रींनी आपला वेगळा ठसा उमटवला त्यात सरिता पदकी यांचे नाव अग्रभागी आहे.कविता, ललित लेखन, बालसाहित्य, नाटक, कथा असे साहित्याचे निरनिराळे आकृतिबंध लीलया हाताळणाऱ्या सरिता पदकी पूर्वाश्रमीच्या शांता कुलकर्णी यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला. त्यांचे शिक्षण , पदव्युत्तर शिक्षण (एमए संस्कृत) पुण्यात झाले. काही काळ डेक्कन कॉलेज येथे कोश विभागात, फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्यापन, अर्थविज्ञानवर्धिनी, भारतीय शिक्षणशास्त्र संस्था अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केले तसेच त्या ‘रानवारा’ या मुलांच्या मासिकाच्या सल्लागार होत्या आणि पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संस्थापक सदस्य होत्या.

सरिता पदकी यांनी आरंभी कविता आणि कथा लिहिल्या. मराठी साहित्यात स्वातंत्र्योत्तर काळात आपला वेगळा ठसा उमटवणा-या सरिता पदकी यांनी केवळ कविताच नव्हे तर ललित लेखन आणि बालसाहित्याच्या क्षेत्रात ही केलेली कामगिरी उठून दिसणारी आहे.  शांता शेळके, पद्मा गोळे, संजीवनी मराठे यांच्या जातकुळीच्या सरिताबाईंच्या कवितेचे त्या काळात वाचकांनी अतिशय मनापासून स्वागत केले होते.

सरिता पदकी यांनी कविता नेहमीच आपल्या हृदयाशी बाळगली आणि तिच्याशी सतत संवादी राहण्याचा प्रयत्न केला. साहित्यातील अनेक आकृतिबंध वेगवेगळ्या पद्धतींनी हाताळण्याची त्यांची क्षमता अतिशय निराळी होती. त्यामुळे नाटकापासून ते ललित साहित्यापर्यंत अनेक साहित्य प्रकारांत त्या रममाण होऊ शकल्या. शब्दांचे अवडंबर न माजवता त्यांच्याशी लडिवाळपणे खेळत आपले मनोगत या सगळ्या प्रकारांतून व्यक्त करण्यासाठी सरिताबाईंनी आपले आयुष्य खर्ची घातले.त्यांनी विविध प्रकार हाताळले असले तरी त्या रमल्या मात्र कवितांमध्ये, बालवाङ्ममय, कथा, कविता, नाटक, अनुवाद असे लेखन करणाऱ्या पदकी यांनी मुलांसाठी कथा, कादंबऱ्या आणि कविता लिहिल्या.

बालसाहित्यातील त्यांचे वेगळेपण तर सहजपणे लक्षात येणारे होते. गुटर्र गूं गुटर्र गूं’, “झुळूक” आणि “नाच पोरी नाच”’ हे त्यांच्या बालकवितांचे संग्रह आणि ‘जंमत टंपूटिल्लूची’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.‘किशोर’ या मासिकात त्यांनी केलेले लेखन सत्तरच्या दशकात अतिशय लोकप्रिय झाले होते. त्यांच्या लेखनात मुलांचे भावविश्व साकारताना परिसर, निसर्ग, दैनंदिन जीवन यांचे दर्शन घडते.”डरांव डरांव”’ या बालगीतातील, ‘आभाळ वाजलं धडामधूम, वारा सुटला सूं, सूं सूं वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख’ यांसारख्या ओळी असो की, ‘घाटातील वाट’ या कवितेतील ‘घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ, निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती’ या ओळी आठवताना आजही गंमत वाटते. या ओळी सरिता पदकी यांच्या ‘बालभारती’तील कवितेच्या होत्या हे आठवलं तरी त्यांनी आपलं बालपण कसं समृद्ध केलं हे जाणवल्याशिवाय राहणार नाही.

१९६० नंतरच्या कालखंडात सरिता पदकी यांचे “लगनगांधार’, ( हा त्यांचा अखेरचा कवितासंग्रह ठरला.) ” अंगणात माझ्या’ आणि ‘चैत्रपुष्प’ हे काव्यसंग्रह जसे वाचकांच्या स्मरणात राहिले तसेच ‘बारा रामाचं देऊळ’ आणि ‘घुम्मट’ हे दोन कथासंग्रहही वाचकांच्या स्मरणात राहिले. तर “बाधा’, ‘खून पाहावा करून’ आणि ‘सीता’ ही त्यांची तीन नाटके वैशिष्टय़पूर्ण मानली जातात.

अनुवादाच्या क्षेत्रातील त्यांचे कामही तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे… करोलिना मारिया डी जीझस यांच्या ‘चाइल्ड ऑफ द डार्क’ या ब्राझीलमधील झोपडपट्टीत राहाणाऱ्या निग्रो स्त्रीच्या या आत्मनिवेदनाचा “काळोखाची लेक’’ या नावाने सरिताबाईंनी केलेला अनुवाद परिणामकारक ठरला.या पुस्तकाचे मी लिहिलेले परिक्षण पेपरमध्ये प्रसिद्ध झाले आहे .तसेच युजीन ओनीलच्या नाटकाचा अनुवाद ‘पांथस्थ’, वेस्टिंग हाऊसच्या चरित्राचा अनुवाद ‘संशोधक जादूगार’, ‘सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर’ (हा जपानी भाषेतील काव्याचा अनुवाद) हे त्यांचे अनुवाद अतिशय गाजले.आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन हा ग्रंथ त्यांनी संपादित केला होता.. तर “कांचनसंध्या’ जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह.

नाटय़लेखनातील त्यांचे वेगळेपणही त्यांच्या ‘सीता’ या नाटकातून दिसून आले.. त्यांनी अनेक साहित्य प्रकारांत केलेला विहार आत्मविश्वासाचा आणि सर्जनाचा होता..
कोथरूड साहित्य संमेलन यांचे त्यांनी अध्यक्षपद भूषिवले.

सरिताबाईना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात राज्य पुरस्कार: ’बाधा’, गुटर्र गु गुटर्र गु’, ” नाच पोरी नाच’, ’बारा रामांचं देऊळ’, चैत-पुष्प.

केंद्रीय पुरस्कार : ’जंमत टंपूटिल्लूची’
अनुवाद पुरस्कार — “काळोखाची लेख’
बालवाङ्मयसाठी शिरोळे, तसेच मालतीबाई दांडेकर पुरस्कार, पुणे नगर वाचनालयातर्फे सत्कार…
पुण्याच्या साहित्य संमेलनात त्यांना “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सरिता पदकी यांचे पती मंगेश पदकी हे ही साहित्यातील दर्जेदार नाव.”सत्यकथा”’चे लेखक म्हणून नाव मिळवलेले मंगेश पदकी हे अर्थशास्त्राच्या क्षेत्रातही दबदबा असलेले नाव.जीवन व्यवहाराप्रमाणेच साहित्याच्या प्रांतातही या दाम्पत्याने एकमेकांना अतिशय सुरेख साथ दिली. ३ जानेवारी २०१५ रोजी सरिता पदकी यांचे निधन झाले.

सरिताबाईंच्या निधनाने मराठी साहित्यातील मंद तेवणारी पणती विझली. कविता, ललित लेखन, बालसाहित्य, नाटक, कथा असे साहित्याचे निरनिराळे आकृतिबंध लीलया हाताळणाऱ्या सरिता पदकी यांची ‘एक्झिट’ वाचकांना निश्चितच चुटपूट लावणारी आहे.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९