Wednesday, February 5, 2025
Homeलेखईजिप्त मध्ये योग !

ईजिप्त मध्ये योग !

“ईजिप्तने, मिस्र ने एक कॉम्पीटिशन ऑर्गैनाईज किया और वहाँ पर जो आयकोनिक सेंटर्स हैं, वहाँ पर जो बेस्ट योगा के फोटोज या व्हिडिओ निकालेगा उसको ॲवॉर्ड दिया जायेगा । जो तस्वीरें मैंने देखी कि मिस्र के बेटे और बेटियाँ योग की मुद्रायें कर रही है, टुरीजम के लिये इतना आकर्षण पैदा कर रही हैं।”
हे शब्द आहेत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे. त्यांनी २१ जून २०२४ रोजी श्रीनगर येथे भरलेल्या आंतर्राष्ट्रीय योग दिनी केलेल्या भाषणातील !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांचे शब्द सुरुवातीलाच मुद्दाम उद्धृत करण्याचे कारण असे की इथे त्यांनी फक्त ईजिप्त देशाचा उल्लेख आवर्जून केला आहे. तसेच येथील आयकोनिक सेंटर्स समोरच्या योग मुद्राच्या फोटोंनीही प्रधानमंत्री अत्यंत प्रभावित झालेले दिसून येते.
ह्या नंतर आपल्या ३० जूनच्या ‘मन की बात’ भाषणांतही त्यांनी Yoga At Iconic Places in Egypt चा पुन्हा आवर्जून उल्लेख केला आहे. श्री. मोदींकडून दोनदा उल्लेख होणे ही विशेष बाब आहे.

भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी युनो मध्ये आंतर्राष्ट्रीय योग दिनाची २१ जून २०१४ रोजी संकल्पना मांडली आणि थोड्याच दिवसात जगातील अनेक राष्ट्रांनी ती अंमलात आणली. दिवसेंदिवस योगाचे फायदे कळू लागल्यामुळे आता तर लोकांनी ही कल्पना अक्षरशः शिरोधार्थ मानली आहे. जून महिना उजाडताच सगळ्यांचे डोळे २१ जूनकडे लागतात आणि आधीपासूनच योगदिन ठिकठिकाणी साजरा होण्यास सुरुवात होते. काही ठिकाणी मात्र जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यास जनतेला सोईस्कर पडावे म्हणून दिवस ठरवले जातात. कॅलेंडरचे पान भरून जाते.

यंदा मी ईजिप्तमध्ये आलेली असल्याने हा सोहळा, हो सोहळाच याचि देही पाहण्याचे भाग्य मला लाभले. माझा मुलगा अजित गुप्ते भारताचा ईजिप्त येथील राजदूत म्हणून नियुक्त असून कैरो येथे स्थित आहे. मे महिन्यापासून रोजच योगदिनाचा उल्लेख होत होता . कारण मोठ्या प्रमाणावर आयोजन आणि तयारी. ५ जून रोजी सर्वप्रथम राजदूतांच्या इंडिया हाऊसच्या प्रशस्त लॉनवर, नाईल नदीच्या काठावर ‘Curtain Raiser’ नावाने पहिला योगासनांचा कार्यक्रम झाला.

झाडांना फुगे लावून सजवलेले लॉन, पाणी शिंपडून थंडावा निर्माण केलेला, प्रत्येकाला योगाची मॅट आणि पाण्याची बाटली अशी जय्यत तयारी होती. बरोब्बर नियोजित वेळेवर सर्व उत्साही लोक मोठ्या संख्येने लॉनवर उपस्थित झाले. राजदूत श्री.अजित गुप्ते ह्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. छोटेसे भाषण दिले व कार्यक्रम सुरु झाला. मंचावर तीन तरुणी निरनिराळ्या आसनांचे सांघिक प्रदर्शन करत होत्या. निवेदिका आसनाचे नाव व फायदे सांगत होती. एकंदर सुमारे एक तास कार्यक्रम झाला. भारतीय दूतावासाचे लोक तसेच स्थानिक ईजिप्शियन नागरिक इथे प्रचंड उन्हाळा असूनही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पडदा उघडला आणि जागोजाग सुरु झाले योगाचे कार्यक्रम !

आतापर्यंत लक्झोर, हुरघाडा, अलेक्झांड्रिया, मिनिया, आणि ईस्मालिया ह्या प्रमुख ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. मुख्य कार्यक्रम २१ जून रोजी कैरो येथे एका गार्डन मध्ये झाले. आवर्जून सांगावेसे वाटते की प्रत्येक ठिकाणी राजदूत श्री. अजित गुप्ते जातीने हजर असत. प्रसंगी ६ तासांचा प्रवास करून ते स्वतः हजर राहिले. त्यामुळे उपस्थितांची संख्या वाढली. कैरो मध्ये सुमारे ६०० लोक उपस्थित होते. अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, स्त्रिया, पुरुष आवर्जून आल्या. श्री. गुप्ते अलेक्झांड्रियाचा कारने तीन तास जाणे, तीन तास येणे असा प्रवास करून उपस्थित राहिले.

विविध ठिकाणी कार्यक्रम मोठया कल्पकतेने आयोजित केले गेले. उदा : १ ) नाईल नदीच्या तीरावर २ ) बीचवर 3 ) सुप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांच्या पार्श्वभूमीवर.

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे योगदिनाचा भाग म्हणून कैरोमधील “मौलाना आझाद सेंटर फॉर इंडियन कल्चर” तर्फे जवळपासच्या ऐतिहासिक ठिकाणांच्या पार्श्वभूमी वर योगासने व त्यांचे फोटो अशी प्रतियोगिता भारतीय दूतावासातर्फे आयोजित केली होती. (Yoga At Iconic Places) या प्रतियागितेस प्रचंड प्रतिसाद मिळाला . त्यानंतर एका कार्यक्रमात या फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात येऊन बक्षिसे देण्यात आली. स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वहात होता. कारण आता कैरोच नाही तर इतरत्रही योग दिवस साजरा होत आहे व भाग घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे.

याशिवाय भारतीय सांस्कृतिक केंद्राने अल् नसर क्लब आणि गेझिरा स्पोर्टिंग क्लब ह्यांच्या सहकार्याने वजन व्यवस्थापन, सुदृढ मणका आणि तणावमुक्ति या विषयांवर विशेष योग शिबिरे आयोजित केली होती.

ईजिप्तमध्ये वर्षभर चाललेल्या विविध योग कार्यक्रमांचा सुमारे २० हजार नागरिकांनी फायदा घेतला. ईजिप्तचे अरब प्रजासत्ताक सरकार, युवा आणि क्रीडा मंत्रालय आणि प्रशासनाचा ठाम पाठिंबा मिळाला. योग कार्यक्रमामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि सहभागाने आरोग्य आणि आनंदी संस्कृतीचा प्रसार करण्याची संयुक्त बांधिलकी अधोरेखित होते. एका योग अभ्यासकाने टिप्पणी केली आहे की, “दक्षिण ईजिप्तमधून उत्तरेकडे वाहणाऱ्या नाईल नदी प्रमाणे योगाचा प्रसार होत आहे.”

हा वृत्तांत लिहितांना मला अभिमान वाटतो की हे आयोजन माझा मुलगा श्री .अजित गुप्ते याने केले.

सुलभा गुप्ते

— लेखन : सुलभा गुप्ते. कैरो, ईजिप्त
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800                                    

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी