गौरी देशपांडे
मराठी साहित्याला स्त्री लेखिकांची मोठी परंपरा लाभली आहे. ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक ह्यांच्यापासून ते अगदी आजच्या लेखिकांपर्यंत असंख्य स्त्रियांनी निरनिराळ्या पातळीवरून स्त्री आयुष्याच चित्र वाचकांपुढे उभं केलं. ह्या सगळ्या प्रभावळीत गौरी देशपांडे यांनी केलेल्या लिखाणाचं वेगळेपण हे विशेष आहे.
विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात मोठे योगदान असलेल्या व चौकटीबाहेर लिहिणार्या मराठीत कथा, कांदबरीकार म्हणून परिचित असलेल्या ख्यातनाम लेखिका गौरी देशपांडे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. त्या अहिल्यादेवी शाळेत शिकल्या. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि फर्ग्युसन महविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन केले.
इंग्रजी वाङ्मयात एम.ए. पीएच.डी. प्राप्त केली. ‘”दि इमेज ऑफ द सेन्ट इन मॉडर्न इंग्लिश लिटरेचर”’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांनी ” इलस्ट्रेटेड वीकली”’ मध्ये संपादन खात्यात काम केले.
प्रसिद्ध लेखिका संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री दिनकर धोंडो कर्वे उर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. इंग्रजी व मराठीतील लेखिका जाई निंबकर या त्यांच्या थोरल्या भगिनी तर प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ‘समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका.
गौरी देशपांडे ज्या काळात लिहीत होत्या तो काळ स्त्रीमुक्तीच्या चर्चेला सुरुवात होण्याचा काळ होता. “Beetween Births” या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने गौरी देशपांडे यांचा लेखनप्रवास सुरू झाला. १९७० साली ‘कावळा चिमणीची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाली तर १९७४ मध्ये ‘”कारावासातून पत्रे”’ ही पहिली लघुकादंबरी लिहिली. १९७५ ते १९८४ या काळात त्यांनी “अरेबिअन नाइट्स”’च्या सोळा खंडांच्या अनुवादाचे काम हातावेगळे केले.त्यांचे ‘एकेक पान गळावया’ “आहे हे असं आहे’ हे कथासंग्रह, ‘तेरुओ’ आणि ‘काही दूरपर्यंत’ ‘निरगाठी’ आणि ‘चंद्रिके ग, सांरिके !’ , ‘दुस्तर हा घाट’ आणि ‘थांग’ ह्या लघुकादंबर्या तर ‘मुक्काम’ (या पुस्तकाचे मी लिहिलेले परिक्षण पेपरमध्ये प्रसिद्ध झालेले आहे)
‘गोफ’ ‘उत्खनन’ ह्या कादंबर्या आणि ‘विंचुर्णीचे धडे’ हे आत्मकथनपर पुस्तक प्रसिद्ध. तराळ अंतराळ’ (शंकरराव खरात), ‘अस्वस्थ दशकाची डायरी”, ‘महानिर्वाण’, ‘माता द्रौपदी या पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले. तसेच त्यांनी ‘द पोझिशन ऑफ वुमन इन इंडिया’ ही पुस्तिकाही लिहिली.दिवाळी अंकांमधून लिहिलेल्या काही छोटेखानी ‘लोक’कथाही लक्षणीय आहेत.त्याचं सर्व साहित्य इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. त्यांचे इंग्रजीतील कविता संग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या प्रकाशित कार्यात इंग्रजीतील कवितांचे तीन खंड देखील समाविष्ट आहेत.बिटवीन बर्थ्स (1968), लॉस्ट लव्ह (1970),आणि बियॉन्ड द स्लॉटरहाउस (1972).
गौरी देशपांडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके:
१. गौरी मनातली, २००५
२. कथा गौरीची, २००८
३. महर्षी ते गौरी
४. स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल १९९९
या पुस्तकात महर्षी धोंडो केशव कर्वे, र. धों कर्वे आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री-विषयक कार्याचा मंगला आठल्येकर यांनी आलेख मांडला आहे.
कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले…
त्यांच्या लेखनात मुक्त विचारांचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं.. त्यांचे लेखन स्त्रीवादी असण्यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी होतं त्याबरोबरच वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा ह्याबद्दलचे विचार ही त्यांच्या लेखनात आपल्याला दिसतात.
गौरी देशपांडे यांच्या कथा–कादंबर्यांत स्वतंत्र, मुक्त, प्रगल्भ स्त्रीची अनेक रूपे आढळतात. स्त्रीवादी दृष्टिकोणातून स्त्रियांचे अनेक प्रश्न व जाणिवा यांची अभिव्यक्ती, पुरुषसत्ताक व्यवस्था व पुरुषी मानसिकता यांची उपरोधपूर्ण टिंगलटवाळी, करिअरला प्राधान्य देणार्या स्त्रीच्या समस्या व व्यथा यांचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या स्त्रीवादी साहित्याची ठळक वैशिष्ट्ये होत तसेच लघुकादंबऱ्या प्रबोधनाच्या मुल्यांचा पुरस्कार करतात.यांच्या सगळ्या पुस्तकातून आपल्या मनात अंधुक स्वरूपात असलेले असे अनेक प्रश्न ठळक होतात व वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, अनुभवांच्या वेगवेगळ्या वळणांवर हे प्रश्नही बदलत जातात आणि आपल्याला अस्वस्थ करत राहतात…
पाउस आला मोथा” त्यांच्या या एका लघुकथेचे प्रतिमा जोशी दिग्दर्शित आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या “आम्ही दोघी ” या मराठी चित्रपटात रूपांतरित करण्यात आली. ही कथा दोन स्त्रियांच्या (एक आई-मुलगी जोडी) आणि पसरलेल्या नातेसंबंधांवर एक आकर्षक चित्रण आहे..
गौरी देशपांडे यांच्या साहित्याबद्दल जी चर्चा झाली ती मात्र त्यांनी रंगवलेल्या देशीविदेशी प्रियकरांबद्दल आणि नायिकेच्या
शरीरसंबंधांबद्दल.गौरी यांच्या लेखनात ह्या शरीरसंबंधांबद्दल धीट भाष्य आहे. ह्या धीटपणामुळे गौरी यांच्यावर ‘बंडखोर लेखिका’ हा शिक्का मारला गेला. ह्या सगळ्या वर्णनातून गौरी यांनी स्त्रियांच्या मानसिक आंदोलनांबद्दल आणि त्यांच्या लैंगिकतेबद्दल जे भाष्य केलं होतं त्याकडे मात्र दुर्लक्ष झालं.
मराठीतील एक महत्त्वाचा साहित्यिक आवाज ज्यांनी भाषेतील स्त्रियांच्या लेखनात महत्त्वपूर्ण योगदान दिले
अशा या प्रतिभावान लेखिकेचे १ मार्च २००३ रोजी निधन झाले.
स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणाऱ्या कोणत्याही आधुनिक मराठी साहित्य प्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. तो एक अपरिहार्य टप्पा असतो असंच त्यांच लेखनकर्तृत्व आहे.
— लेखन: संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
साहित्यकारक हा अतिशय उत्तम उपक्रम! आवडती लेखिका गौरी देशपांडेविषयी फार महत्त्वाची आणि वेगळी माहिती मिळाली.