आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला अध्यात्मिक व वैज्ञानिक अधिष्ठान आहे. पावसाळ्यात सर्प, नाग जमिनीखाली आश्रय घेतात. त्यांच्या घरांना (बिळांना), पिल्लांना धक्का लागू नये म्हणून नांगरणी न करता त्यांना अभय देण्याचा हा प्रयत्न असतो, हे वैज्ञानिक कारण. तर कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी आपली संस्कृती घेत असते, हे अध्यात्मिक कारण. त्यासाठी नागपंचमीला नागोबाला पूजण्याची प्रथा चालू केली गेली असावी.
या दिवशी प्रतीकात्मक चिरणे, कापणे, भाजणे न करता स्वयंपाक करताना नागोबाची प्रतीकात्मक पूजा करतात. कोल्हापूरला मातीचे नाग मिळतात. माझी आई दोन नाग आणून पूजा करायची. पुरणाचे दिंडे करून नैवेद्य दाखवायची.
चल ग सये, चल ग सये..
वारुळाला वारुळाला..
नागोबाला पूजायाला पूजायाला…
असे गात स्त्रिया खेडेगावात वारुळाला जाऊंन नागोबा पूजतात. त्याला भाऊ मानून उपास पण करतात.
मी रांगोळीचे नाग काढून पूजा करते. निसर्गातील जीवासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि घरी कोणतेही अरिष्ट येऊ नये या साठी प्रार्थना करण्याचा हा एक प्रयत्न.
पण यावर्षी मी पेपर वर नाग काढून पूजा केली. रांगोळी नंतर साफ करायला त्रास होतो म्हणून वेगळी कल्पना.
एक आठवण येथे सांगावी वाटते….
मी मूळची कोल्हापूरची. नागपंचमीला एकदा सांगली जवळील बत्तीस शिराळा गावी नागपंचमीचा उत्सव पाहायला गेले होते. उत्सुकता होती, कारण तेथे १००/१५० नाग एकत्र पूजले जायचे. या उत्सवाची आधीच तयारी केली जायची. नाग साप पकडणारे तरुण मडके व काठी घेऊन तेथे यायचे व जवळपास १००/१५० नाग साप पकडायचे. त्यांचा तेथे व्यवस्थित सांभाळ करून नागपंचमीला सर्वांची एकत्र पूजा करून त्यांची गावातून मिरवणूक काढली जायची.
त्या नंतर त्यांना परत जंगलात सोडले जायचे. पण काही वर्षापासून प्राणी प्रेमी संघटनांनी ही प्रथा अघोरी आहे त्यावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका High court मध्ये दाखल केली. त्यानंतर नागपंचमीचा बत्तीस शिराळा येथील उत्सव बंद झाला. कालाय तस्मै नमः
नागपंचमीला माहेरवाशिणीला माहेरी आणण्याची पद्धत आहे. याचा नाग पूजेशी काहीही संबंध नसतो. तर पूर्वीच्या काळी मनात आले की माहेरी जायला मिळायचे नाही. मग सणाच्या निमित्ताने तिला माहेरी यायला मिळायचे. मैत्रिणी बरोबर गाणी गात झोपाळ्यावर बसून आनंद लुटत काही काळ सासुरवासा पासून मुक्त राहायच्या. या संबंधी मला एक भावपूर्ण गाणे आठवते
फांद्यावरी बांधियले मुलींनी हिंदोळे…
पंचमी चा सण आला डोळे माझे झाले ओले..
काळा प्रमाणे सर्व संकल्पना बदलल्या. काही कालबाह्य पण झाल्या. तरी सुद्धा त्यामागील उद्देश लक्षात घेऊन आपण जरी प्रतिकात्मक नाग पूजा नाही केली तरी मनोभावे नमस्कार करून श्रावणातील या प्रथेप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करायला काय हरकत आहे.
— लेखन : मृदुला चिटणीस. नवी मुंबई
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800