॥ टाळी ॥
कुठल्याही चवली, पावली, अधेली, रुपयाच्या मोबदल्याची अपेक्षा न करता निव्वळ टाळ्यांच्या मोबदल्यात कविता सादर करणारे बरेच कवी मी पाहिले आहेत. अन कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून काही भरघोस मिशीवाले, काही सफाचट तर काही डोईवर केसांचं जंजाळ, काही टकलू गोटम गोल अशा नामांकितांना आवतण दिले तर बिदागी किती देणार ? हा ओठातून सहजी बाहेर पडणारा प्रश्न विचारणारे काही भली भक्कम किंमत वसूल करणारे महाभागही मी पाहिले आहेत. त्यावेळी संयोजकांना त्यांच्या सो कॉल्ड विनोदावर नाईलाजाने टाळ्या पिटण्याची वेळ येते त्यावेळी त्या टाळ्यांचा कडकडाट होतच नाही पण, पैशाचा हिशोब टाळीटाळीतून मोजला जातो अन निराशाच पदरी पडते.
काही काही कार्यक्रम खरं तर आपसुकच टाळ्या मिळवतात अन काही टाळ्यांविनाच पार पडतात. आपण टी व्ही वर असे “हवा येऊन जाऊ द्या” सारखे कार्यक्रम पहाताना लक्षात येते की फक्त सहभागी कलाकार वा त्यांचे मित्र कलाकार खुमासदार हसत, अंगविक्षेप करत टाळ्यांनी दाद देतात.परंतु इकडे घरी बसून पहाणारे प्रेक्षक मात्र यात कायसा विनोद होता ? म्हणून टाळी न वाजवताच कसेनुसे होतात. चालायचंच विनोदी हवा खरंच यथायोग्य वहायला लागली की टाळ्या कधीतरी मिळतीलच.
कधी कधी वा बऱ्याचदा सुद्धा मैफिलीमधे टाळ्या वाजवणारा एखाद दुसरा टाळूवरचे लोणी खाणारा सापडतोच सापडतो. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्याला टाळता येत नाही ही अगतिकता असते. टवाळी करणाऱ्यांना टाळ्यांचा गजर करता येत नाही असं का बरं म्हणतात ? माहीत नाही, परंतु टाळीचा आवाज ऐकल्याबरोबर सदरेवर हजर होणारा हुजऱ्या बऱ्याच जणांच्या दरबारात असतो, आजही हजर आहे.
टाळ्या मिळवणे हे काही तस्से सोप्पे काम नाही, तेथे पाहिजे जातीचे. अंगी तसे कसब असल्याशिवाय रसिक टाळ्या वाजवून दाद देत नाहीत, मग काय जांभयांवर जांभया येतात. त्यातही मग टाळाटाळ करणारा एखादा सजग भान असलेला प्रेक्षक जोराजोरात टाळ्या वाजवून आता बास करा की ते पुराण, आमचं टाळकं फिरायची वेळ आलेय असं टाळ्यांनीच सुचित करून अति अवास्तव बडबड करणाऱ्या वक्त्याची गोची करून टाकतो, आपण अनेकदा याचि देहा याचि डोळा अशा टाळ्यांचा अनुभव घेतलेला असतोच की. टाळ वाजवा, झांजा पिटा, ताटे वाजवा, घंटा वाजवा असे काही टाळीसदृष्य विनोदी प्रकार आपल्या अवतार पुरुषाने करायला लावले होते त्याचा अनुभव अजून चांगला स्मरणात आहे. म्हणजेच आपले टाळके अजून व्यवस्थित टिकून आहे, हे टाळूवरती टिच्चून सांगावेसे वाटते.
कुटाळक्या करणारेही अनेक असतात. ते अगदी नको त्या ठिकाणी टाळ्याच टाळ्या वाजवतात अन इतर जनांच्या फुग्याला टाचणी लाउन रंगाचा बेरंग करतात. टाळ म्हणजे प्रतिक. हे कशाचं द्योतक असावं बरं हे ? कधी कधी हा प्रश्न काही जणांच्या मनाला छळतो, मी मात्र अशा मंडळींना प्रकर्षाने टाळायचाच प्रयत्न करतो उगा टाहो फोडायची वेळ येऊच नये ना !
तुम्हांला माहित आहे का ? आपल्या काही गड किल्यांवर घुमटाखाली टाळी वाजवली की ती तीन चार किलोमीटर दूरवर ऐकू जायची, त्या टाळीचा प्रतिध्वनी बराच काळ निनादत राहतो, हे नवलच नाही का ? काय अप्रतिम कला असावी ना ती. अत्यंत सुंदररित्या टाळ कुटणारा माणुस उत्तमपणे टाळी वाजवू शकतो का ? हा ही एक प्रश्न पडतोच. रात्र काळी घागर काळी यमुना जळी हो काळी उमा, हे ऐकताच नव्वदीच्या गृहस्ताने मनमुराद टाळी वाजवलेली मी अनुभवली आहे.
टाळी वाजवण्याचे अनेक प्रकार आहेत, इतर वाजवयतात आपण वाजवत नाही, वरिष्ठ काय म्हणतील ही एक भीती ! आता तर काही लयास पावले आहेत, काही टाळायचे म्हटले तरी टाळता येत नाहीत. तृतियपंथी जेंव्हा जेंव्हा भर गर्दीच्या चौकाचौकात एका वेगळ्याच स्टाईलने वेगळ्याच झटक्यात अशी काही टाळी वाजवतात अन अंगविक्षेप करतात ना की आपण पटकन जितक्या दूर जाता येईल तितक्या दूर जाण्याचा प्रयत्न करतो, नको नकोशी वाटणारी ती टाळी.
पहा नं टाळीचं साम्राज्य आपल्या आडनावापर्यंत पोचलंच आहे, टाकळे, पाकळे, उकळे, चाकळे, ठाकळे अशी टाळीसदृष्य अनेक आडनावे असतात, एक जोरदार टाळी वाजवा ना ! बरं, पत्ता माहित नसताना सुद्धा जबाबदारी नांवाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतं, कितीही टाळायचं ठरवलं तरी न टाळता येण्यासारखं टाळी वाजवूनच त्या जबाबदारीचा स्विकार करावा लागतोच ना ?
टाळ्याटाळ्यांची शिदोरी शिगोशिग भरून ठेवलेले काही टाळकरी आपल्या सहवासात असतात, आपल्या कठीण दुःखद प्रसंगात आलेल्या अडीअडचणीत आपल्याला न टाळता आपली साथ संगत करतात, हरवून गेलेल्या क्षणाक्षणांना पुन्हा सुंदर करतात, अशा लाभलेल्या मित्रांसाठी नक्कीच टाळ्यांचा कडकडाट करावा, आनंदाने टाळी वाजवावी त्यांना प्रतिसाद द्यावा. ……..
टाळी म्हणजे डाव्या अन उजव्या हातांचा योग्य पद्धतीने होणारा आघात अन त्यातून निर्माण होणारा, आनंद प्रसवणारा हवा हवासा ध्वनी म्हणजे टाळी. किती आनंदघनासम आनंद कंपने सामावली असतील हो अशा या एका टाळीत, हो की नाही !
मग द्या टाळी….
— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मस्तच लेख…दिली टाळी…
मस्त मनापासून वाजवली टाळी..