भारत सरकारच्या कोईम्बतूर येथील सलिम अली सेंटर फॉर अर्णाथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री येथे बहुधा महाराष्ट्रातील एकमेव वन्यजीव संशोधक डॉक्टर विद्याधर अटकोरे यांची नुकतीच वैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाली आहे.
या सेंटरमध्ये वन्यजीवन तसेच पक्षीशास्त्र या विषयांमध्ये एम एस सी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतील. वाचू या त्यांची प्रेरककथा….
डॉक्टर विद्याधर अटकोरे यांनी नांदेड येथील नागसेन हायस्कूलमधून दहावी तर सायन्स कॉलेजमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीनंतर त्यांनी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून वनशास्त्र या विषयामध्ये पदवी मिळविली. पुढचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी वन्य जीव शास्त्र, देहरादून या संस्थेत त्यांचा भारतामध्ये सहावा तर मागासवर्गीयांमध्ये पहिला नंबर आला होता. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना भारतीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने फेलोशिप प्रदान केली होती.
त्यानंतर मुंबई येथे त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून एक वर्षभर काम केले. पुढे पीएचडी पूर्ण करण्यासाठी त्यांना अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, बेंगलोर या संस्थेत प्रवेश मिळविला.
विद्याधर यांनी त्यांच्या संशोधनादरम्यान कर्नाटक आणि गोवा या राज्यातील नद्यांच्या जलचरांच्या विविधतेवर संशोधन केले . त्यांच्या पीएचडीचा प्रबंध त्यांनी मणिपाल युनिव्हर्सिटी, कर्नाटक मध्ये दाखल केला. 2017 मध्ये पीएचडी पदवी मिळवून त्यांनी लगेचच पोस्ट डॉक्टरल रिसर्च करण्यासाठी अरुणाचल प्रदेश मधील रंगा नदी वर आपले संशोधन सुरू केले. रंगा नदी हायड्रो पॉवर प्रोजेक्टचा परिणाम रंगा नदीतील विविध जलचरांवर कसा होतो यावर त्यांनी दोन वर्ष संशोधन केले.
अशोका संस्थेत असताना, डॉक्टर विद्याधर यांनी प्रामुख्याने चीन, दक्षिण कोरिया, नॉर्वे, इंग्लंड, आणि अमेरिका येथे झालेल्या विविध परिषदांमध्ये सहभाग घेवून आपले संशोधन सादर केले. तसेच वेगवेगळ्या वैज्ञानिकांशी संवाद साधून असेच प्रकल्प भारतामध्ये कसे करता येतील याबद्दल चर्चा केली.
डॉ विद्याधर यांना जगप्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर ब्यारी नून, योईचिरो कानो, ख्रिस्तोफर मेयर ह्यांनी मार्गदर्शन केले. कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी तेथील पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातील नद्यांमधील संकटग्रस्त जलचर ह्या विषयावर मार्गदर्शन केले.
वर्ल्ड फिशरीज काँग्रेसच्या २०१६ मध्ये झालेल्या परिषदेत त्यांना आपलं संशोधन मांडण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेमध्ये जगातून संशोधक आले होते.
डॉक्टर विद्याधर यांनी सह्याद्री घाटांतील नद्यांमधील असलेल्या माशांच्या विविधतेवर मानवी हस्तक्षेपामुळे कसा ऱ्हास होतो आणि त्यावर काय उपाय करता येतील याबद्दल आपले संशोधन मांडले.
डॉक्टर विद्याधर यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे विद्यार्थ्यांना बीएससी तर नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स येथे एम एस सी वाइल्डलाइफ बायोलॉजी हा विषय शिकविला. यूनिवर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्स बंगलोर मध्ये पीएचडी फॉरेस्ट आणि इन्व्हायर्नमेंटल सायन्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
परदेशी अनेक आकर्षक संधी उपलब्ध असतानाही तिकडे न जाता वडील, जेष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांचा देशसेवेचा वसा पुढे चालविणाऱ्या डॉ विद्याधर अटकोरे यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ 9869484800.
पुत्र लाभावा असा तर माणूस बनावा डॉ. अटकोरे यांच्या सारखा. भुजबळ सरांचे अचूक टिपण खरोखरच सुंदर!
पुत्र लाभावा असा तर माणूस बनावा डॉ. अटकोरे यांच्या सारखा. भुजबळ सरांचे अचूक टिपण खरोखरच सुंदर!
श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांनी, वन्यजीव संशोधक डॉक्टर विद्याधर अटकोरे यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन खूपच छान प्रकारे मांडले त्या बद्दल त्यांना धन्यवाद 🙏