आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशव कुमार यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी केशव विनायक अत्रे व अन्नपूर्णा केशव अत्रे यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सासवड येथे झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर काही वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) पूर्ण केले.
आज, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपण जाणून घेऊ या….
१) विडंबनकार अत्रे – अत्रे हे जन्मतःच नकला करणारे, विडंबनाचा वारसा त्यांना उपजतच होता. विडंबन म्हणजे विसंगतीचा शोध आहे़ असे अत्रे म्हणत. अत्रे यांनी विडंबनाची प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यांच्यामुळेच विडंबनाला स्वतंत्र साहित्य प्रकारचा दर्जा प्राप्त झाला. उपजत विनोदबुद्धी असल्याशिवाय आणि त्याला प्रतिभेची जोड असल्याशिवाय विडंबन साधत नाही.
कवी केशवसूत आपल्या ‘आम्ही कोण’ या कवितेत म्हणतात, “आम्हाला वगळा गत:प्रभ होतील तारांगणे” यावर अत्रे यांनी विडंबन केले, “आम्हांला वगळा गत:प्रभ होतील साप्ताहिकें, आम्हांला वगळा खलास सगळी होतील वा मासिकें”
अत्रे यांची विडंबन काव्य खुप लोकप्रिय ठरली आहेत.
२) गीतकार अत्रे – सध्या कविता लिहिणारे चित्रपटांकडे वळले आणि चित्रपटगीते लिहू लागले. ‘ब्रम्हचारी’ मधील “यमुना जळी खेळू खेळ कन्हया का” तसेच प्रेमवीर चित्रपटातील “घ्या हो घ्या हो, कुणी माझी फुलें ताजी” इत्यादी लोकप्रिय चित्रपटगीतांनी अत्रे यांना गीतकार बनवले.
३) नाटककार अत्रे – नाट्य क्षेत्रात अत्रे राम गणेश गडकरी यांना गुरू मानत असत. ‘साष्टांग नमस्कार’ हे अत्रे यांचे पहिले नाटक १० मे १९३३ रोजी रंगभूमीवर आलं. यानंतर गुरुदक्षिणा, वीरवचन, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, उद्याचा संसार, लग्नाची बेडी, जग काय म्हणेल ?, पाणीग्रहण, मी उभा आहे़, पराचा कावळा, वंदे भारतम्, कवडीचुंबक, वसंत सेना, एकाच प्याला, तो मी नव्हेच !, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो इत्यादी १९ नाटके अत्रे यांनी लिहिली.
अत्रे यांच्या नाटकांवर टीका करणारे प्रा. माधव काशिनाथ देशपांडे यांच्यासह अनेकांनी कबूल केले आहे़ की “क्षीण होत असलेल्या मराठी रंगभूमीचा मृत्यु अत्रे यांच्यामुळे टळला.”
४) चित्रपट निर्माते अत्रे – दादासाहेब तोरणे हे अत्रे यांचे चित्रपट क्षेत्रातील खरे गुरू. त्यांनी चित्रपट क्षेत्रातील तंत्र अत्रे यांना शिकवले. धर्मवीर, ब्रम्हचारी , ब्रँडींची बाटली, अर्धांगी, लपंडाव, पायाची दासी, पायाची दासी, वसंत सेना, मोरूची मावशी, श्यामची आई, महात्मा फुले ह्या चित्रपटांची निर्मिती करून सुध्दा अत्रे यांना फारसा आर्थिक फायदा झाला नाही. ‘श्यामची आई’ हया चित्रपटाला सर्वात सन्मानाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले. तोपर्यंत मराठीतील कोणत्याही चित्रपटाला हे यश प्राप्त झाले नव्हते. त्यानंतर ‘महात्मा फुले’ या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे रौप्य पदक मिळाले.
५) आदर्श शिक्षक – आचार्य अत्रे यांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून केली.अत्रे बी.ए. बी.टी. टी.डी. लंडन झाले. वीस वर्षात ते नावाजलेले शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. शिक्षण व्यवसायात मी काढलेली वीस वर्ष माझ्या आयुष्यातील अतीव आनंदाचा आणि समाधानाचा काळ होता असे अत्रे यांनी लिहून ठेवले आहे़.
६) राजकारणी अत्रे – पुणे पालिकेत अत्रे नगरसेवक म्हणून निवडून आले. “रे मार्केट” चे “महात्मा फुले मार्केट” अत्रे यांनीच केले. कालांतराने अत्रे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झाले.
७) हजरजबाबी वक्ते अत्रे – असे म्हणतात दहा हजारात एकच चांगला वक्ता निर्माण होतो. आचार्य अत्रे यापैकी एक होत. इतर वक्ते आणि आचार्य अत्रे यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे ते हजरजबाबी होते. काय बोलायचं ते त्यांनी ठरवलेले असायचे परंतु कार्यक्रमात त्यांच्या आधीच्या वक्त्यांनी अत्रे यांची टिंगल अथवा टीका केली की अत्रे त्याला जशास तसे उत्तर देत व उपस्थितांची दाद घेत असत. महाराष्ट्र भूमीशी निष्ठा, भाषा वैभव, संत आणि शाहीर दोघांच्याही परंपरेत न्हाऊन निघालेले त्यांचे जीवन आणि त्यास वाड्मयीन महात्मतेची अपूर्व जोड यामुळे अत्रे यांचे व्याख्यान म्हणजे पर्वणी असे.
८) झुंजार पत्रकार – नवयुग मुळे अत्रे पत्रकार म्हणून उदयास आले व मराठामुळे त्यांच्यातील धाडसी संपादक सर्वांना दिसला. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अत्रे यांनी मंगल आणि अमंगल दोन्ही भाषांची शक्तिमान अस्त्रे हाती धरून आचार्य अत्रे यांनी हा लढा यशस्वी करण्यास हातभार लावला.
साहित्यातील नाटक, कथा संग्रह, कादंबरी, काव्य, ललित लेखन, चरित्र लेखन इत्यादी सर्व क्षेत्रांत विपुल लेखन करून साहित्य क्षेत्रांसह सर्व क्षेत्रांत दबदबा निर्माण करणारे आचार्य अत्रे यांच्या बाबत निष्कर्ष काढायचा झाल्यास त्यांच्याच शब्दांतच म्हणायला हवे की गेल्या दहा हजार वर्षात अशी व्यक्ती झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षात होणार नाही.
आचार्य अत्रे यांच्या मध्ये असलेल्या पैलूंपैकी अनेक पैलूं ज्यांच्या मध्ये होते अशा माधव गडकरी यांनी प्रकाशित केलेले “अष्टपैलू आचार्य अत्रे” हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे व शक्य असेल तर संग्रही ठेवावे असे आहे.
असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व १३ जून १९६९ रोजी अनंतात विलीन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.
— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
एकच प्याला हे नाटक अत्रे यांचे नाही.राम गणेश गडकरी यांनी लिहिले आहे