डिजिटल भारत साकारताना…!
भारतीय स्वातंत्र्याला आज 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आजवरची देशाची वाटचाल बघताना स्पष्टपणे जाणवतं की, देशाने सर्वच क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी केलेली आहे. वाघांचा आणि नागांचा देश अशी स्वातंत्र्यापूर्वी असणारी ओळख बदलत आर्थिक बाबतीत ‘मेड इन इंडिया’ चा वाघ जगाला धडकी भरेल अशी डरकाळी देत आहे.
कोणत्याही देशाच्या विकासाचा निर्देशांक तेथील वित्तीय स्थिती दर्शवतो. 2004 पासून 2024 पर्यंत या 20 वर्षाच्या कालावधीत शेअर बाजाराचा निर्देशांक 8 हजाराहून 80 हजारांची मजल गाठून आता पुढील वाटचालीसाठी तयार आहे. जागतिक स्तरावर स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यावेळी अर्थकारणात गणतीमध्ये नसणारा आपला भारत देश आज जगातली शक्तीशाली अशी 5 व्या क्रमांकाची अर्थसत्ता बनलाय याचा सर्वांनाच अभिमान असला पाहिजे.
गेला 77 वर्षांमधील घटनांचा आढावा घेताना आपणास स्पष्टपणे जाणवतं की आपण केवळ वित्तीय प्रगती केलेली नाही तर जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी लोकशाही असणारा देश म्हणून आपली ओळख जपली आहे. कोणतेही क्षेत्र बघितले तर त्यात भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. आज अंतराळ संशोधन क्षेत्र असो की माहिती तंत्रज्ञान सर्वच ठिकाणी भारतीयांनी आपला ठसा कायम ठेवला आहे.
21 नोव्हेंबर 1963 रोजी आपल्या देशाने पहिले ‘रॉकेट लॉन्च’ केले होते आणि गंमत म्हणजे हे रॉकेट लॉन्चपॅड पर्यंत वाहून नेण्यासाठी सायकलचा वापर झाला होता. त्या काळी रशिया आणि अमेरिकेने यात खूप मोठी आघाडी घेतली होती.
आज अंतराळ संशोधनात देशाने इतकी मोठी आघाडी घेतली आहे की सर्व विकसित देश त्यांचे उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी भारताची मदत घेत आहेत. हॉलीवूडच्या ‘ग्रॅव्हीटी’ चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षा कमी खर्चात भारताने मंगळयान यशस्वी करून दाखवले आणि नंतरच्या काळात जे इतरांना जमले नाही ते करून दाखवत चंद्राच्या दुस-या बाजूला यान यशस्वीरित्या उतरविलं.
देशात गेला दशकात स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता यावर भर देण्यात आला आहे आणि यामुळे आता संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रात देशाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. याचा दुहेरी फायदा आपणास दिसत आहे. यात आपल्याच देशात उत्पादन होत आहे सोबतच बाहेरील देशांकडून साहित्य खरेदीसाठी लागणारे परकीय चलन देखील मोठ्या प्रमाणावर आपण वाचवत आहोत.
जगाने आपला देशाची आणखी अधिक दखल घेतली ती आपल्या पर्यावरण सुधारणांची. एका बाजूला कार्बन उत्सर्जनाचा धोका वाढला असल्याने जगात सर्वत्रच ऋतूचक्र बदलत आहे आणि नैसर्गिक आपत्तीच्या रुपात त्याचे परिणाम आपण बघत आहोत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘ग्रीन एनर्जी’ अर्थात पर्यावरण अनुकूल ऊर्जा निर्मितीवर आपल्या देशाने लक्ष केंद्रीत केले आहे. 11 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला देशात 87.21 गिगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्यात यश मिळालेले आहे. यात घरा-घरावर ऊर्जा निर्मितीची संख्या वाढत आहे. याच साठी प्रधानमंत्री सूर्यघर सारखी अनोखी योजना सुरू करून 1 कोटी घरांवर सौरऊर्जा निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. आजपर्यंत घरावर वीज निर्मिती अंतर्गत 13.4 गिगावॅट उर्जा निर्मितीचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे हे येथे उल्लेखनीय आहे.
केवळ सौर ऊर्जा निर्मिती करून इंधन वापर कमी होणार नाही याचा विचार करून ईलेक्ट्रीकवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यास देखील प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. अजमितीस देशात 28 लाख 30 हजार 565 इलेक्ट्रीक वाहने (दि. 8 ऑगस्ट 2024 पर्यंत) रस्त्यावर धावत आहेत. या माध्यमातून जिवाश्म इंधनाचा वापर कमी होण्यासोबत मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण रोखण्यात देखील यश आपण मिळवले आहे.
नव्या युगातला नवा भारत घडवताना आपन जुन्यापासून नव्याकडे असा प्रवास करताना काही बाबी ठळक जाणवतात आपण 5-G तंत्रज्ञान आणि वाय-फाय चा वापर करण्यात समृद्ध आणि संपन्न देशांच्या बरोबरीत आहोत. भारतातील प्रत्येक ग्रामपंचायत ब्रॉड बॅन्डव्दारे जोडणी असो की युनिफाईड पेमेंट इन्टरफेस अर्थात युपीआय च्या वापरत जगालाही आपण लीड करीत आहोत. केवळ डिजिटल युग म्हणून चालणार नाही तर खऱ्या अर्थानं डिजिटल भारत आपण साकारला आहे. आणि ही तर केवळ सुरुवात आहे.
— लेखन : प्रशांत विजया अनंत दैठणकर.
जिल्हा माहिती अधिकारी, बीड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डिजिटल भारत साकारताना,हा माहितीपूर्ण आणि भारतीय म्हणून अभिमान वाटावा असा सुरेख लेख. एकेकाळी वन्य पशू आणि घातक प्राणी यांचा मागासलेला देश स्वातंत्र्यानंतर आज जगातली पाचवी महासत्ता बनत आहे हा तपशीलवार आढावा घेणारा लेख निस्चितच सुरेख.