“मी शिल्पा…
चंद्रपूर ते केमॅन आयलंड्स” या शिल्पा तगलपल्लेवार गंपावार लिखित, देवेंद्र भुजबळ संपादित आणि न्यूज स्टोरी टुडे तर्फे प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच नागपूर येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ लेखक – चित्रपट दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे देत आहे. शिल्पा यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
आदरणीय आणि माननीय व्यासपीठ, आणि माझे समस्त नागपूरकर गाववाले… मला आज शिल्पा प्रमाणेच, आपल्या माहेरी आल्या सारखे वाटते आहे ! आणि काल शिल्पाच्या घरी तिचा पाहुणचार स्वीकारताना एक आणखीन प्रदीर्घ ऋणानुबंधनाचा धागा उलगडला, आणि तो म्हणजे, तिचा आणि माझा चंद्रपूर बद्दल एक भावनिक संबंध ! म्हणजे, चंद्रपूर मध्ये त्या काळी अस्तिवात असलेले जयंत टॉकीज ! आणि त्याचे मालक श्री.मामीडवार, यांची मुलं, नागपुरात शिक्षणासाठी आली ती, माझ्या काचिपुरा, रामदास पेठमधील माझ्या घरात सख्ये शेजारी !
तर, ह्याच तुमच्या माझ्या नागपुरात माझ्या लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या कालगुणांची बीज रोवल्या गेली आणि ती सुद्धा साक्षात मास्तर, म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर हयांच्या आशीर्वादाने आणि बंगाली अससोसिएशन यांच्या सानिध्यात त्यानी निर्मिलेल्या आणि मी अनुवादीत केलेल्या ‘नाव नाही नाटकाला’ ह्या नाटकामुळे ! ज्यात मला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते ! पण तेथून पुढला ४५ वर्षांचा प्रवास सांगण्याचा मोह मी आवरता घेतोय, जरी शिल्पा प्रमाणे देवेंद्रजी नीं शिल्पा प्रमाणे माझ्यावर सुद्धा पुस्तक प्रकाशित करावे, हा मोह होऊन सुद्धा ! असो..
तर, आपले नागपूर म्हणजे, कला गुणांची ‘नर्सरी’ आहे ! म्हणजे त्याची ‘रोपे’, इथल्या पेक्षा, बाहेरच अधिक बहरतात ! आणि त्यातीलच एक पार सातासुमुद्रा पलीकडे जाऊन रुजलेले एक बीज म्हणजे आजची उत्सव मूर्ती – शिल्पा ! शिल्पा… स्त्रीच्या आयुष्याचा स्व कर्तृत्वाने निर्माण केलेला ‘समृद्धी’ मार्ग..!- केमॅन बेट -६० हजार लोकसंख्या, १२० पेक्षाही जास्त देशातील नागरिक, त्यातील १५०० भारतीय -ह्यात कुठल्याही जात, भाषा, पंथ, धर्म, रंग ह्याचा उल्लेख नाही – आपण देशाबाहेर पडल्यावर अधिक ‘भारतीय’ होतो का ? असा प्रश्न आपल्यापैकी शिल्पा प्रमाणे जे परदेश भ्रमण करतात त्यांना पडतो !
शिल्पाला, ज्याला आंग्नल भाषेत ‘Homesik’ होणे म्हणतात, ते नाही, कारण फक्त देशच नाही तर जे जे जगण्यासाठी आयुष्यात आले, त्याला तिने आपलेसे करून घेणे, हा तिचा मूळ स्वभाव गुण आहे, जो तिच्यातील कलासक्त स्वभावाची ओळख आहे. – शिल्पकार त्याला भावलेल्या आकाराचे ‘शिल्प’ घडवितो, पण काही कलाकार ‘स्व- शिल्प’ घडवितात, ज्याला इंग्रजीत ‘Self Portrait’ म्हणतात, पण ते घडविण्यासासाठी, स्वतःवर, स्व कर्तृत्वावर प्रेम, श्रद्धा , आत्मविश्वास, आणि पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा लागते, त्या मुळे ‘शिल्पा’ ही तिच्या जीवनाची ‘शिल्पकार” आहे, हे तिचे पुस्तक वाचताना पदोपदी जाणविते.
पान २१ वर ती लिहिते –‘वयाच्या १५ व्या वर्षी पासून मी माझा खर्च स्वतःच्या कमाविलेल्या पैश्यातून करायची ! आजकालच्या जमान्यात, पालकांच्या पैश्यातून ‘ Pocket mony’ मिळणाऱ्या पिढीला, शिल्पाचा आदर्श, म्हणून हे पुस्तक विकत घेऊन वाचायला द्यावे, अशी शिफारस मी करेन ! शिल्पाच्या लिखाणात, कुठंही ‘अहं भाव’ नाही, उलट आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, भेटलेल्या सन्मित्रांन बाबत, कमालीची ‘कृतगन्य भावना आहे. शिल्पाने तिच्या जीवनातील सकारात्मकता कशी जपली, वृध्दींगत केली, त्याचा कानमंत्र, तिच्याच शब्दात, पान २३ वर ‘अपयशातून शिकवण मिळते, आणि प्रयत्नातून ‘सफलता’ ! तिच्या जीवनातील संघर्षाची वाटचाल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक ‘घेणे’ आणि ‘वाचणे’ ही well Deserved दाद’ आपण तिचे पुस्तक विकत घेऊन तिला देऊया !
शिल्पाने तिच्या आयुष्यात, त्या काळात तिचे पती संदीप ह्यांनी जे तिला जे विस्तीर्ण आकाश केमॅन च्या रूपाने उपलब्ध करून दिले, त्या अवकाशात शिल्पाने घेतलेली ‘गरुडझेप’ म्हणजे हे पुस्तक ! तिचे पुस्तक वाचतांना मला त्या काळी नागपुरात माझ्याच नात्यात असणाऱ्या एका गृहस्थाची आठवण येते ! त्त्यांच्याशी गप्पा मारतांना, विशेषत: भूगोल, देश विशेष, इत्यादी, तर त्यांना, त्या देशाची इतमंभूत माहिती असायची !, म्हणजे, जर आपण त्त्यांच्या समोर ‘केमॅन’ देश असे म्हटले की, ‘अरे केमॅन ना ? माहिती आहे मला …. जगातील सर्वात श्रीमंत बेट.. माझी भाची राहते तिथे… शिल्पा तिचे नाव… असे सांगून, फक्त पुस्तकातील नकाशावर बोट फिरवून सारे जग हिंडणारे हे गृहस्थ, नागपुरातील त्याचे ‘शंकर नगर’ सोडून फारसे बाहेर पडले नाहीत ! म्हणजे मी जर त्यांना ह्या काळात, काय बे, चलतो का अंबाझरी तलावाकडे ? मी ऐकलंय नितीन साहेबांनी ते काय डाँसिन्ग musical fountain केले आहेत.. तर त्याचे उत्तर – ‘कश्याला जायच रे पोट्या झक मारायला तिथं ? काय हाय तिथं बे ? तू मुंबईला सुमुद्रावर तरी जातो का भैताडा ?’
थोडक्यात, ह्या वरून तुम्हाला, शिल्पाच्या चंद्रपूर ते केमॅन आयलंड ह्या प्रवासाची महती पटावी !
आणि सरते शेवटी, ह्या पुस्तकाचे संपादक माझे सन्मित्र देवेंद्र भुजबळ आणि प्रकशिका त्त्यांच्या सुविद्य पत्नी अलका ह्याच्या बाबत आज आपण साऱ्यांनी टाळ्या वाजविल्याच पाहिजे ! कारण एकदा पुस्तक प्रकाशित झाल्यावर लेखकांशी ‘टाळाटाळ’ करणाऱ्या प्रकाशकांपैकी ते नव्हेत ! आणि ह्याचे प्रत्यंतर आपणास, हे पुस्तक हाताळतांना नक्की येईल, इतके सुबक, देखणे पुस्तक त्यानीं निर्मिले आहे !
सहसा लेखक आपले अपत्य, पुस्तक रूपात यावे म्हणून, प्रकाशका कडे खेट्या घालतो त्या उलट, यांच्या कडे प्रकाशित झालेल्या बहुतांशी पुस्तक ह्या दोघानी लेखकांकडून चक्क लिहून घेतली आहेत !
आणि त्या मुळे माझ्यासाठी हा दुग्ध शर्करा योग आहे, की एका पुस्तकाच्या प्रकाशनात, एकाच वेळी एक उत्कटपणे लिहिणारी लेखिका आणि तितक्याच आपुलकीने ते संपादित संपादक, प्रकाशिका मला भेटावेत आणि त्या साठी मला अत्यन्त अगत्याने आमंत्रित करणाऱ्या देवेंद्र, अलका आणि शिल्पाचे आभार मानून आणि ह्या पुस्तकाच्या यशाबाबत सुयश चिंतून आपण हे पुस्तक विकत घेऊन आमचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती करतो.
मी चित्रपट पटकथाकार, दिग्दर्शक आणि निर्माता असल्याने शिल्पाचे संघर्षमय जीवन आणि तिच्या कलासक्त आयुष्यवर, आजकाल ‘Bio pic’ चित्रपटांची चलती असल्याने, तो चित्रपट करण्याची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे हे नम्रपणे निवेदन करून, इथेच ‘इति भाषण सीमा’ म्हणत आपली रजा घेतो.
— लेखन : प्रदीप दीक्षित.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800