दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जून महिन्यात शाळा सुरू झाली. काही दिवसांनी मी ज्या वर्गाची क्लास टीचर होते त्या वर्गातील विद्यार्थिनींनी माझ्यासोबत एक ग्रुप फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांना समजावले की आपण ग्रुप फोटो वर्षाच्या शेवटी काढतो. परंतु त्यांनी आग्रह केल्यावर मी त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो काढला आणि हळूहळू मी ते विसरूनही गेले.
काही दिवसानंतर माझा वाढदिवस आला. नेहमीप्रमाणे मी वर्गात प्रवेश केला. ‘हॅपी बर्थ डे टू यू’ च्या जल्लोषात माझे स्वागत झाले. आज विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याचे कारण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर असे कळले की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यासाठी एक भेटवस्तू आणली होती. विद्यार्थिनींनी मला काय गिफ्ट आणलं असेल हे ओळखायला सांगितले. मी त्यांना वस्तूरुपी भेटवस्तू स्वीकारणार नाही असे सांगितले. परंतु त्यांचे नाराज झालेले चेहरे पाहून मी काही दोन-तीन वस्तूंची नावे सांगितली.
पण जेव्हा मी गिफ्ट पॅक उघडले तेव्हा मला असे दिसले की यापेक्षा मोठे गिफ्ट काहीही असू शकत नाही. मन भरून आले, डोळे पाणावले आणि मी त्या गिफ्ट कडे पहातच राहिले. ते सरप्राईज गिफ्ट होते, मी काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत काढलेल्या ग्रुप फोटोची “फोटो फ्रेम”.
या प्रसंगावरून पुन्हा एकदा शिक्षक-विद्यार्थी नात्यांचा महिमा जो प्राचीन काळापासून चालत आलेला आहे त्यावर थोडे विचार मंथन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात आई-वडिलां इतकाच काही वेळा थोडा जास्त विश्वास असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असतात. आपल्या आवडत्या शिक्षिकांना आनंद देण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे कल्पकता पूर्वनियोजन, नेतृत्व गुण, एकता, सर्वसमावेशकता हे गुण दिसून आले.
थोडा वेळ अंतर्मुख होऊन विचार केल्यावर असे वाटले की काही वर्षांपूर्वी उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून स्वीकारलेली नोकरी “शिक्षणाचा वसा” कधी बनली हे कळलेच नाही. नकळत आपण विद्यार्थिनींच्या मनामध्ये प्रेम, आदर आणि विश्वासाचे ऋणानुबंध निर्माण केले याबद्दल धन्यता वाटली.
मागील काही वर्षातल्या विद्यार्थिनी आठवत असताना अनेक चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. ‘मला तुम्हाला बोलायचे आहे फोन करू का ?’ असे मेसेज करणाऱ्या माजी विद्यार्थिनी, ‘तुमच्यात मला माझी आई दिसते’ असे म्हणत मदर्स डे ला शुभेच्छा देणाऱ्या विद्यार्थिनी, ‘तुमच्यामुळेच माझ्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थिनी, ‘तुमच्यामुळेच मला अवघड वाटणाऱ्या विषयांमध्येही आवड निर्माण झाली’, अशा विविध प्रतिक्रिया देणाऱ्या अनेक विद्यार्थिनी आहेत.
शाळेतून पास होऊन गेल्यानंतरही शहरात आणि शहराच्या बाहेर कोठेही भेटल्या तर आपुलकीने ‘आमच्या मॅडम’ म्हणून जवळ येऊन बोलणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. विविध क्षेत्रांमध्ये, विविध देशांमध्ये कार्यरत असलेल्या अशा अनेक विद्यार्थिनी आहेत की ज्यांनी शाळेशी, शाळेतील शिक्षिकांशी असलेले आपले नाते जपलेले आहे.
‘मॅडम, काल तुम्ही शाळेत आलाच नाहीत, आम्हाला करमले नाही’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थिनी, ‘आज तुमची तब्येत ठीक वाटत नाही आम्ही सेल्फ स्टडी करतो’, ‘काय झाले आज नाराज दिसत आहात’ असे विचारणाऱ्या विद्यार्थिनी, कधी रागवलेच तर थोड्या वेळाने जवळ येऊन बिलगून ‘सॉरी मॅडम’ म्हणणाऱ्या विद्यार्थिनी, ‘आम्ही मोठे झालो ना की आम्ही तुम्हाला वर्ल्डटूरला घेऊन जाणार’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थिनी, तास संपला की हळूच वर्गाच्या बाहेर येऊन आपल्या अडचणी सांगणाऱ्या विद्यार्थिनी, रागवण्याचा अंदाज दिसला की लडिवाळपणे बोलून मन बदलायला लावणाऱ्या विद्यार्थिनी, हे आणि असे अनेक शिक्षिकांच्या चेहऱ्यावरील भाव टिपणाऱ्या अनेक विद्यार्थीनी आहेत.
शिक्षकांवर असे प्रेम करणारे विद्यार्थी लाभणे हे शिक्षकांचे भाग्यच असते.प्राचीन काळी गुरुला जे महत्त्व होते ते आजही कायम आहे. इतर कोणत्याही व्यवसायिक नात्यांपेक्षा शिक्षक – विद्यार्थी नाते हे आयुष्यभर टिकणारे असते. म्हणूनच संत नामदेवांच्या अभंगात थोडासा बदल करून मला असे म्हणावेसे वाटते —
“जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणोनीया आम्ही शिक्षक जाहलो”.
आज ती फोटो फ्रेम माझ्या डोळ्यासमोर आली आणि मनात जे विचार आले ते मी लिहून काढले. नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा, दुसऱ्याला आनंद देण्यातला आनंद आणि शिक्षकांबद्दल असणारा आदर, प्रेम, विश्वास असे विद्यार्थिनींचे चेहरे सतत माझ्या डोळ्यासमोर राहो, हीच खरी “ऋणानुबंधांची गुरुदक्षिणा” आहे. माझ्या सर्व विद्यार्थिनींना आभाळाला गवसणी घालणारे यश प्राप्त होवो तसेच त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
— लेखन : श्रीमती ज्योती भातीकरे-वांगे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Really very nice mam heart touching
Really great very true and touchy
Thank you 🙏
“तुमच्याच मला माझी आई दिसते” ही एका विद्यार्थीनीची प्रतिक्रिया ज्योती भातीकरे- वांगे यांच्या कार्याची पावती आहे.संवेदनशील शब्दांतला सुरेख लेख.
Thank you 🙏
मनस्वी अभिनंदन ज्योती , विद्यार्थीनींचे आपण ‘ रोल मॉडल ‘ झालात याचा अंतःकरणापासून आनंद. हे अनुभवाचे बोल . आपल्या पुढील लेखन प्रपंचास आणि शिक्षकी प्रवासास भरभरून शुभेच्छा…. प्रो. ( डॉ. ) सतीश यादव
Thank you so much sir 🙏
Heart tóuching…
Thank you dear 🙏
खूप छान 👌
एका शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणजे काय असतात हे कळले आणि हा लेख वाचून मलाही माझे काही शिक्षक आठवले.
Thank you 🙏
Thank you
Really great,very true and touchy
Thank you so much 🙏
Really great