जगात १९५ देश असून लोकशाही, हुकूमशाही, धर्मशाही, राजेशाही, साम्यवादी, समाजवादी, लष्करशाही अशा विविध शासन व्यवस्था आहेत. पुन्हा या देशांचे विकसित, विकसनशील आणि अविकसित देश असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या पैकी लोकशाही शासन व्यवस्थेतच लोकांना आपली मते, विचार, आशा आकांक्षा, तक्रारी मांडण्याची संधी मिळते. यामुळे लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेल्या भारतासारख्या देशात लोकांच्या मतांवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करू शकणाऱ्या माध्यमांची भूमिका पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत महत्वाची ठरते,असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते “पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत माध्यमांची भूमिका” या विषयावर बोलत होते.
माध्यमांचा जनमानसावर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे या माध्यमांच्या माध्यमातून तसेच वेळप्रसंगी लोकांशी, विशेषतः ज्या पायाभूत सुविधांची उदा. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ उभारणी करताना लोक जिथे थेट बाधित होणार असतील तिथे यथायोग्य जनजागरण झाले पाहिजे. माध्यमांना, लोकांना विश्वासात घेऊन सदरचे प्रकल्प कसे लोकहिताचे आहे, हे पटवून देऊन लोकांचा सहभाग निर्माण करणे आवश्यक आहे. अशा प्रकल्पाबाबत लोकांचा विश्वास निर्माण झाल्यास विरोध राहणार नाही. परंतु देश हिताच्या दृष्टीने आवश्यक अशा काही प्रकल्पात राजकारण येते आणि अनेक प्रकल्प बारगळले जातात. असे प्रकल्प सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे, लोकांशी संवाद साधला तर अडथळे येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, एखाद्या प्रकल्पाबाबत लोक बाधित होत असतील, त्याला विरोध होत असेल तर अशावेळी लोकांची भूमिका, लोकांची मते लक्षात घेणे आवश्यक आहे. लोकांच्या विरोधामुळे अनेक एस ई झेड प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. जैतापूरचा प्रकल्प लोकांच्या विरोधामुळे उभा राहू शकला नाही. यासाठी लोकांची मानसिकता निर्माण करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते, असेही ते म्हणाले.
आपणास बऱ्याच देशांमध्ये जाण्याची संधी मिळाल्याचे सांगत जे विकसित देश आहेत तेथील लोकांचे देशप्रेम आणि देशनिष्ठा ही प्रथम क्रमांकावर असते त्यामुळे त्या देशांचा जलद विकास झाल्याचे दिसून येते. भारताचे २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्रात २४ टक्के तर सेवा क्षेत्रात ७० टक्के वाढ होण्याची गरज असून या वाढीसाठी जलद गतीने प्रथम पायाभूत सुविधांची निर्मिती होणे गरजेचे आहे, या कडे त्यांनी लक्ष वेधले.
आपल्याकडे कायदे आणि नियम मोडण्यात अनेकांना धन्यता वाटते, असे सांगून श्री भुजबळ म्हणाले की, यामुळे वाहतुकीची शिस्त, नियम पाळले जात नाही. त्यामुळे रस्त्यावरचे अपघात हे भारतात मृत्यूचे एक नंबर चे कारण बनले आहे. देशातील कायदे, नियम हे आपल्या हितासाठीच आहेत, ही भावना लोकांमध्ये रुजली पाहिजे. परदेशात मात्र तेथील लोक कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करतात, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. या सर्व बाबतीत राष्ट्रहिताच्या, सहमतीच्या बाबी असतील त्या माध्यमांनी प्रामुख्याने केल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘पायाभूत प्रकल्प आणि ग्रामीण विकास’ यावर बोलताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. दिलीप पांढरीपट्टे म्हणाले की, मी उप जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त असताना
जो विकसित महाराष्ट्र दिसला, त्यात पायाभूत प्रकल्प मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. पण अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार आणि शिक्षण या बाबी सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये मोडतात. त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या या गरजा पूर्ण झाल्या तरच पायाभूत सुविधांचा लोकांना उपयोग होईल. रोजगारात महाराष्ट्र मागे आहे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा आपण निर्माण केल्या, असे सांगून प्रत्येक गाव आणि शहर जोडण्यासाठी अथवा या दोहोतील अंतर कमी करण्यासाठी रस्ते हे महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांचे महत्व सांगताना ते म्हणाले की, रस्ते असतील तर मुले शाळेत जातील, रस्ता नसेल तर शाळेत शिक्षक येणार नाहीत, डॉक्टर दवाखाण्यात जाणार नाहीत, रस्त्यांमुळे शहरे आणि खेडी जोडली जातात. असे असले तरी महाराष्ट्रात रस्त्यांचे नेटवर्क बऱ्यापैकी असल्याचे डॉ. पांढरीपट्टे यांनी सांगितले.
दैनिक देशोन्नतीचे संपादक तथा कृषितज्ञ श्री प्रकाश पोहरे या वेळी बोलताना म्हणाले की, मुळात भारतासारख्या विकसनशील देशांत कुठले पायाभूत प्रकल्प खरोखरच आवश्यक आहे, याचा साधक बाधक विचार करून प्रकल्प हाती घेतले पाहिजे. अशा प्रकल्पामुळे लोकांना सुविधा मिळण्याऐवजी त्यांची अडचण तर होत नाही ना ? हे सरकारने पाहिले पाहिजे.
“पायाभूत सुविधा: चौफेर प्रगती” या चर्चासत्राच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड म्हणाले की, देशाचा विकास साधावयाचा असेल तर आधी पायाभूत प्रकल्पांची उभारणी केली पाहिजे. अमेरिका, जर्मनी, जपान, चीन, दक्षिण कोरिया यासारख्या देशात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या देशांचा विकास झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी म्हणाले होते की, रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून रस्ते चांगले नाहीत.
महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा वर्षात पाच लाख कोटी रुपये किमतीचे ५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे गायकवाड यांनी सांगून जोपर्यंत रस्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचत नाहीत, ग्रामीण भागाशी जोडले जात नाहीत तोपर्यंत विकास होणार नाही. म्हणून राज्याचा विकास करावयाचा असेल तर पायाभूत सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या ६२५ किलोमीटरच्या समृध्दी एक्स्प्रेस वे चे काम पूर्ण झाले असून नजीकच्या काळात या रस्त्याची ८०० किलोमीटरची निर्मिती पूर्ण होईल, असे सांगून अशा रस्ते विकास कामांच्या बाबतीत लोकांच्या ज्या गैरसमजुती आहेत, जो विरोध होतो तो होऊ नये यासाठी माध्यमांनी काम केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. समृद्धी महामार्गावरून आजपर्यंत १ कोटी २४ लाख वाहनांनी प्रवास केल्याचे सांगून त्यापैकी १२७ वाहनांना अपघात झाला. त्यात २१८ लोक मृत्युमखी पडले. मात्र हे अपघात का झाले, याची कारणे शोधून काढण्यात येत आहेत. अनेक वाहनांनी सुरक्षित प्रवास केल्याचे सांगत लोकांनी स्वतःची आणि आपल्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही गायकवाड यांनी यावेळी केले. अभियांत्रिकीदृष्ट्या हा महामार्ग सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
या चर्चासत्राचे सुंदर सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार श्री नरेंद्र वाबळे यांनी केले.
या चर्चा सत्रात प्रश्नोत्तरे देखील झाली. चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
हे संपूर्ण चर्चासत्र आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
चौफेर प्रगतीचा संकल्प या चर्चासत्राद्वारे डॉक्टर देवेंद्र भुजबळ डॉक्टर दिलीप पांढरी पट्टे कृषी तज्ञ श्री प्रकाश पवार अनिल गायकवाड यांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि भारत हा 2047 महासत्ता होण्यासाठी प्रगती करेल याविषयीचे छान असे मत मांडले अशा चर्चा सत्रांची आज खूप गरज आहे. नुसत्या चर्चा नाही तर त्याच्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आपण पाहतो रस्त्याचे काम कुठे ना कुठे सतत चालू असते पण ते किती दिवस टिकते याविषयी विचारसरणी गरजेचे आहे रस्ता जेव्हा बनवले जातात तेव्हा त्याच्या कॉलिटी कडेही लक्ष असले पाहिजे. अशा पद्धतीने जर कार्य झाले तर भारत एक दिवस खरंच सुंदर देश बनेल. आजचा नोकरदार वर्ग ज्याप्रमाणे इन्कम टॅक्स भरतो त्याप्रमाणे त्याला कोणतेही सुविधा मिळत नाही. पुढील काळात याचाही विचार झाला पाहिजे.
पायाभूत प्रकल्प या संबंधीच्या माहितीपूर्ण चर्चासत्रात देवेंद्र भुजबळ यांनी मांडलेले विचार समतोल आणि देशाच्या विकासासाठी साहाय्यक आहेत.
मतस्वातंत्र्य हे लोकशाहीतले सामान्य नागरिकांचे साधन असते. माध्यमांनी विकासात त्यासंबंधी जनजागरण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.