आजकाल रोबाॅट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेवर बरेच वाचनात, ऐकण्यात येतेय. हे असे “यांत्रिक” जीवन कसे वाटेल ? असा सहजच एक विचार मनात आला. पोटाची भूकच नसेल तर पैशाची जरूरीच वाटणार नाही. माणसाच्या “गरजा” कमी होतील. भावनाच नसतील तर एकमेकांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा, त्यामुळे आपसातले बिघडलेले संबंध, हे सगळेच थांबेल. असो…
माणसाची पुढची उच्च स्थिती म्हणजे “देववत” होणे. असे आपल्या संस्कृतीत म्हणतात. दोन्हीच्या मधली अवस्था यांत्रिक माणूस असेल का ? असा विचार मनांत आला. यांत्रिक माणूस घडवून आपण स्वतःला श्रेष्ठ मानायचे का ?
आपण ज्याला “देव” मानतो त्याच्या पेक्षा फार मोठ्ठी शक्ती हे सगळे जग, अंतराळ चालवते हे तर मान्य करावेच लागेल. प्रत्येक अणू-रेणू त्यातूनच निर्माण होतो व त्यातच लोप होतो. कर्ता, करविता हि “नियतीच” आहे. मग कोणीच स्वतःला श्रेष्ठ वा कनिष्ठ समजू नये. अगदी देवाने सुद्धा. या निष्कर्षावर माझे मन स्थिरावले.
ते मी माझ्या पुढील कवितेत उतरवले आहे.
“श्रेष्ठ-कनिष्ठ”
कशाला दिलेस देवा,
पोट, भूक माणसाला
अथक श्रम करतो
खळगी ती भरायला ||१||
नको होतेस द्यायला
मन-भावना आम्हाला
गुंतागुंतीत रे त्यांच्या
अडकवतो स्वतःला ||२||
वाचा, वाणी नको वाटे
खोटे शब्द खेळायला
इतर प्राण्यांच्या सवे
सोप्पे होते जगायला ||३||
बुद्धि, वाणी, दूरदृष्टी
देऊनी तू आम्हाला
सर्वश्रेष्ठ प्राणिमात्र
घडविसी मानवाला ||४||
प्रज्ञावंत जे म्हणती
देव त्यांनीच निर्मिला
देवाहून सर्वश्रेष्ठ
मानती ते स्वतःला ||५||
ऐकूनी माझे मनोगत
घडवूनी रोबाॅटाला
बुद्धिमंत शास्त्रज्ञ ते
करती का मात तुला ? ||६||
नसते तहान, भूक
ना मन-भावना त्याला
आदेशाने तो वागतो
गर्व त्याचा मानवाला ||७||
बटणे दाबूनी तज्ज्ञ
चालवती रोबाॅटाला
प्राण ओतून तू देवा
“जीव” देशी माणसाला ||८||
मानवा शिवाय जैसा
नाही अर्थ रोबाॅटाला
तू आता नाही राहीला
एक त्राता मानवाला ||९||
कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ ?
ना पात्र अभिमानाला
ना कर्ता, ना करविता
सर्वच फोल वाटे मला ||१०||
अशाश्वत आहे सारे
अक्षय कालचक्राला
सर्वच होते विलीन
अंतराळी नियंत्याला ||११||
— लेखन आणि रचना : लिना फाटक, इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वृंदा, वर्षा, सर्वांनाच माझे मनापासून आभार. लिना फाटक
तुझ्या प्रतिभेला आणि कल्पनाशक्तीला अनेक सलाम !
खूप छान कविता!
वृंदा जोशी
अभिप्रायाबद्दल शितल व सुधीर यांना माझे मनापासून आभार.
कविता छान वाटली 👌👌
अत्याधुनिक काव्य वाचलं.
तुझ्यातील कवयित्री खरच *प्रतिभा* प्रतिभावान आहे.
लीन काकू अर्थपूर्ण कविता!
लीना काकू कविता अर्थपूर्ण!