भाग २
एबरडीनला पोहोचायला उशीर झाला होता म्हणून, दुसऱ्या दिवशी आम्ही एबरडीन शहरातल्याच प्रसिद्ध डुनाॅटर कॅसलला जाण्याचा बेत केला.
कॅसल म्हणजे किल्ला किंवा किल्लेवजा मोठा वाडा. आपल्याकडं डोंगरावर आणि जमिनीवरही असे मोठे वाडे पूर्वी बांधले जात. काहींना गढी असंही म्हणत. यात राजघराण्यातील किंवा सरंजामदार अशा उच्च लोकांची कुटुंबं रहात असत. काही ठिकाणी अशा गढ्या आकाराने मोठ्या असत, तर काही ठिकाणी त्या लहान असत. मोठया गढ्यांच्या आसपास त्यात रहाणाऱ्या उच्च लोकांच्याकडं कामं करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी इतरही सर्वसामान्य लोक रहात. असे किल्ले/ गढ्या म्हणजे वस्ती किंवा छोटंसं गावच असे. या वस्तीतील लोकांच्या मूलभूत भौतिक गरजा आणि बाह्य शक्तींपासून त्यांचं रक्षण करणं एवढंच त्यातील उच्च लोकांची जबाबदारी असे आणि हे केल्याबद्दल ही सामान्य माणसं अशा मोठ्या लोकांची आयुष्यभर कृतज्ञ रहात. त्यांच्यासाठी अगदी सर्वस्वाचा त्याग आणि प्राणार्पण करणंही सर्वसामान्य माणसांना भूषण वाटे.
ही, जगात सर्वत्र दिसून येणारी प्रवृत्ती असे. युरोप खंडातील समाजही याला अपवाद नसे.
अशा कॅसलमधून राहणाऱ्या उच्च कुटुंबांमध्ये हेवेदावे किंवा दुष्मनीही असे. याचे पडसाद त्यांच्यातील लहानमोठ्या लढायांत होत. याच्या झळा अंतिमत: अशा उच्च कुटुंबातील लोकांना बसत. पण अशा परिस्थितीत त्यांच्यात तह ही होत असत, ज्यात पराभूत पक्षाकडून धन किंवा त्या काळात मौल्यवान चीजवस्तु घेतल्या जात. तथापि अशा लढायांचा फटका यात चिरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसांना अधिक बसे. त्यांची गणनाच बाजारबुणगे अशी होई. त्यांचं जगणं हे मोठ्या लोकांची कृपाच असे. पाचोळ्यासारखं अनिश्चित जीणं त्यांच्या नशिबीत असे.
हजारो वर्षांपूर्वीचे ते कॅसल स्काॅटलंडचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून सुंदर पध्दतीनं जपून ठेवला आहे. आम्ही ते पहायला गेलो तर तिथल्या नाॅर्थ सीमध्ये सर्व बाजूला समुद्राच्या विशाल पाण्याच्या पार्श्वभूमीवर ताशीव खडकावर ऐटीत उभे असलेले ते कॅसल पहायला जगातील हजारो पर्यटक आले होते. आकाशात सिगल नावाचे समुद्रपक्षी इकडून तिकडं भराऱ्या घेत होते. कॅसलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला त-हेत-हेची सुंदर फुलं पर्यटकांना आकर्षित करत होती. एक अतिविशाल निसर्गरम्य चित्र आकाशाच्या भव्य कॅनव्हासवर उठून दिसत होते. सगळीकड आनंद आणि उत्सुकता भरून राहिली होती.
त्या कॅसलचे विविध अंगांनी मी फोटो घेतले.
कॅसलविषयी जी माहिती वाचली, ऐकली, समजली त्यावरून समजलं की, हजारो वर्षांपासून अनेक ऐतिहासिक गुपितं यामध्ये दडलेली आहेत. अनेक चांगल्या वाईट घडामोडी इथं घडल्या आहेत. अनेक राजे, राण्या, धर्मगुरू यांच्या विजयाच्या आणि पराभवाच्या कहाण्या या वास्तूने पाहिल्या आहेत. आज ते इतिहासाच्या पानांतून वाचायला मिळतं.
ही वास्तु अतिशय सुंदर पध्दतीनं जतन करून ठेवली असली तरीही, ही वास्तु खूप प्राचीन असल्याने, याचे कोसळलेले बुरुज, पडक्या भिंती, जुन्या पध्दतीची प्रवेशद्वारं पाहून, या वास्तुशी प्रत्यक्ष आणि दुरान्वयानेही संबंधित ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्ति जशा मनाच्या डोळ्यांत दिसू लागल्या,तसेच या वास्तुच्या उभारणीत आणि इतिहासात नोंद झालेल्या, त्या उच्च लोकांच्या आनंदाच्या पायात जी सर्वसामान्य माणसं गाडली गेली किंवा ज्यांनी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनाची आहुती दिली असेल, तरीही कुठलीच नोंद नसलेली अनामिक आणि लपलेली माणसंही मला दिसू लागली.
समाप्त.
— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800