“कृषी विकासात दूरदर्शनचा सहभाग”
दूरचित्रवाणी अर्थात टेलिव्हिजन ,ज्याचे आजचे लोकप्रिय नाव दूरदर्शन झाले आहे, त्याचा शोध जॉन लॉगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकाने २५ मार्च १९२५ रोजी लावला. त्या नंतर जवळपास ३५ वर्षांनी म्हणजेच १५ सप्टें. १९५९ रोजी भारतात दूरदर्शन चे दिल्ली येथे पहिले केंद्र सुरू झाले. त्यामुळे भारतात १५ सप्टेंबर हा दूरदर्शनचा स्थापनादिन म्हणून साजरा करण्यात येतो. दूरदर्शनने देशाच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. या निमित्ताने “कृषी विकासात दूरदर्शनचा सहभाग” या विषयावर दूरदर्शन चे निवृत्त उप महासंचालक श्री शिवाजी फुलसुंदर यांच्या स्वानुभवावर आधारीत अभ्यासपूर्ण लेखाने छान प्रकाश टाकला आहे.
दूरदर्शन स्थापनादिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
आकाशवाणीनंतर 1959 मध्ये भारतात युनेस्कोच्या सहकार्यानं दिल्ली येथे प्रायोगिक स्तरावर दूरचित्रवाणी केंद्र सुरू झालं. याचा मूळ उद्देशच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहिती, शिक्षण आणि मनोरंजन विषयक कार्यक्रम उपलब्ध करून देणं हा होता.
दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरूवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरलाय. दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक (नेटर्वक) जाळे आहे. डीडी -१ ही वाहिनी १०४२ प्रादेशिक ट्रान्समिटर्स पर्यंत याचे जाळे पसरले आहे. देशात ९० टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१ चे कार्यक्रम पोहचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समिटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इन्सॅट) वर अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे.अगदी सुरुवातीला हे कार्यक्रम घराच्या छतावर लावलेल्या Yagi antenna मार्फत हे कार्यक्रम घराघरात पोचत असत परंतु तंत्रज्ञानातील वरचेवर होणाऱ्या संशोधन आणि विकास ह्यामुळे तेच कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातून आणि सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे प्रसारित होत आहेत. सध्या प्रत्येक राज्यासाठी दूरदर्शनने स्वतंत्र प्रादेशिक वाहिनी दिली आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावरचं प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होतं- पण ते पाहायला खुद्द दिल्लीकरांकडेही टीव्ही सेट नव्हते.त्यामुळे टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला १९६५ मध्येच, त्यामुळे काहींच्या मते दूरदर्शनची तीच सुरवात मानली जाते.
2 ऑक्टोबर 1972 पासून मुंबई केंद्र सुरू झालं. त्याचप्रमाणे आपल्या देशातील इतर राज्यातून देखील दूरदर्शन केंद्र टप्प्याटप्प्यानं सुरू झाली. तेथे देखील प्रादेशिक भाषेमध्ये कृषी विषयक कार्यक्रम सुरू झाले आणि स्थानिकांना त्यांच्या बोलीभाषेतच कृषी आणि ग्रामीण विकास विषयक कार्यक्रम प्रसारित करण्यात आले.
कृषि, शिक्षण, माहिती आणि मनोरंजन कार्यक्रम हा दूरदर्शनच्या डीएनएचा भागच आहे. बालिका शिक्षण, स्त्री सबलीकरण, आरोग्य जाणीवजागृती, तरुणाईसाठी स्फूर्तिदायी कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी डीडी सह्याद्री अनेक कार्यक्रमांची निर्मिती करत आली आहे.
दिल्ली दूरदर्शन केंद्रानं 1961 मध्ये ‘एज्युकेशनल टीव्ही’ (ई-टीव्ही) हा कार्यक्रम सुरू केला. त्यातून वैज्ञानिक माहितीच्या प्रसारावर भर देण्यात आला. त्याचा शेतकऱ्यांनाही उपयोग होऊ लागला.
युनेस्को आणि भारत सरकारच्या सहकार्याने 1967 मध्ये देशाच्या विकासात उपग्रहाच्या उपयोगासंदर्भात एक पाहणी करण्यात आली. त्यात दूरचित्रवाणीचे योगदान महत्वाचे ठरू शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला. ॲटोमिक एनर्जी आणि नासाच्या माध्यमातून 1975 मध्ये ‘सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट’ (साईट) नावाने कार्यक्रम सुरू करण्यात आला. यातील कार्यक्रम ओरिसा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील जवळपास 2 हजार 400 खेड्यांमध्ये दिसत असत. त्यात शिक्षण, शेती, आरोग्य आणि कुटुंब नियोजनासारख्या विषयांवर अधिक भर दिला जात असे.
साईट प्रकल्पासाठी कृषी मंत्रालयानं काही मार्गदर्शक तत्वं निश्चित करून दिली होती. कोरडवाहू शेतीसंदर्भात मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकं दाखवणं, कुक्कुट पालन आणि पशुधनाची माहिती देणं, पीक व्यवस्थापन समजावून सांगणं, बियाण, खतं, पणन, कर्जाची उपलब्धता यासारख्या विषयावर साईटमध्ये भर द्यावा, अशी काही मागर्दर्शक तत्वं कृषी मंत्रालयानं ठरवून दिली होती. शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित कराव्यात, हवामानाचा अंदाज आणि बाजार भावांचीही माहिती द्यावी, असंही कृषी मंत्रालयातर्फे सूचवण्यात आलं होते. त्यामुळच साईटचा प्रयोग यशस्वी झाला.
मुंबई दूरदर्शन केंद्रावरील ‘आमची माती, आमची माणसं’ हा कार्यक्रमही घराघरात पोहोचला होता. शेतकरी कुटुंबात तो आवर्जून पाहिला जाणारा कार्यक्रम होता. तो सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस प्रसारित होत असे. नंतर तो आठवड्यातून पांच दिवस अर्ध्या तासासाठी प्रसारित होऊ लागला. १९९० च्या दशकात कृषी मंत्रालयाने कृषी विषयक कार्यक्रमांच्या निर्मितीत आर्थिक सहभागाच्या माध्यमातून त्यांचा सहभाग वाढवला आणि भारतातील सर्व दूरदर्शन केंद्रावरून दररोज कृषिदर्शन कार्यक्रम प्रादेशिक भाषेत narrocasting च्या स्वरूपात सुरू झाले. त्यामुळे दूरदर्शनचे कृषीविषयक कार्यक्रम खऱ्या अर्थानं घराघरात पोचले.
१९८१ पासून ह्या कृषीविषयक कार्यक्रमांच्या निर्मितीत “कृषि कार्यक्रम निर्माता” म्हणून माझा स्वत:चा मोठा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्ही कृषी विषयक कार्यक्रम निर्मित केलेले आहेत. त्यापैकीच “गप्पागोष्टी” हा कार्यक्रम त्याच्या लोकप्रियतेमुळे दीर्घकाळ स्मरणात राहिला आहे.
गप्पागोष्टी कार्यक्रम हा हसतखेळत कृषी विषयक गप्पाटप्पांचा कार्यक्रम असे. त्यामध्ये ग्रामीण पात्र आपल्या अवतीभवतीच्या विषयावर विनोदी पद्धतीने भाष्य करत. त्यामुळे हा कार्यक्रम ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये देखील त्यामधील उखाण्यामुळं खूपच लोकप्रिय झाला होता. त्याशिवाय विविध कृषीविषयक तांत्रिक माहिती (शॉर्ट ड्युरेशन), विविध यशोगाथा, प्रात्यक्षिके देखील या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होऊन गेली त्यामुळे कार्यक्रमही अधिक माहितीपूर्ण झाला.
त्याचप्रमाणे “विकासाची वाटचाल” या कृषीविषयक बातम्यांच्या माध्यमातून महाभारत मालिकेत, श्रीकृष्णाची अजरामर भूमिका साकार करणारे डॉ नितीश भारद्वाज
बिग बॉसचे निवेदक श्री.रत्नाकर तारदाळकर यांच्यासारखे गुणी कलाकार यांचे सुद्धा आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचे उल्लेखनीय योगदान आहे.
आपल्या राज्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सह्याद्री वाहिनीतर्फे सन्मान व्हावा म्हणून “सह्याद्री कृषी सन्मान सोहळा” या वार्षिक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. परंतु प्रायोजकांअभावी हा कार्यक्रम पूर्णत्वास जाऊ शकला नाही.नंतर पुढे प्रसारभारतीच्या मार्केटिंग विभागाचा मी स्वतः संचालक असताना आर.सी.एफ. मार्फत त्याचं प्रायोजक्त मिळवण्यात यश आलें आणि मग तो सन्मान सोहळा जवळपास १५ वर्ष सह्याद्री वाहिनीमार्फत प्रसारित होत राहिला.
पुढे दूरदर्शन अहमदाबाद येथे माझी संचालक म्हणून नेमणूक झाल्यानंतर तेथे देखील कृषीविषयक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आलं आणि हे कार्यक्रम लोकाभिमुख होण्यासाठी, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्ं कौतुक व्हावं म्हणून “डिडि गिरनार कृषी सन्मान सोहळा” यासारखा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम वार्षिक जरी असला तरी शेतकरी प्रेक्षक त्यामधील आपल्या सहभागासाठी त्याची आतुरतेने वाट पहात असत.
२०१५ मध्ये भारत सरकारचा ‘डीडी किसान’ या चॅनलचं दिल्ली येथे मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या चॅनलच्या कार्यक्रम नियोजन, सादरीकरण आणि प्रसारणाची पायाभरणी करण्यात माझा मोठा सहभाग होता. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी यासाठी माझी विशेष नियुक्ती केली होती. अजूनही DD kisan हा जागतिक पातळीवर फक्त शेतकऱयांसाठी चोवीस तास शेती आणि ग्रामीण विकास विषयक कार्यक्रम प्रसारित करणारी एकमेव राष्ट्रीय वाहिनी आहे.
“DD किसान” चॅनल देशातील कृषी आणि ग्रामीण समुदायाची सेवा करण्याच्या उद्देशाने आणि त्यांना शिक्षित करून सर्वांगीण विकासाचे वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करत प्रगतीशील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. डीडी किसान चॅनल संतुलित शेती, पशुसंवर्धन आणि वृक्षारोपण या शेतीविषयक त्रिमितीय संकल्पनेला बळकट करत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात देखील ही वाहिनी मागे नाही. सध्या दूरचित्रवाणी वाहिनीला नवीन अवतारात सादर करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून डीडी किसानने दर रविवारी दोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर तैनात केले आहेत. ‘एआय कृष’ आणि ‘एआय भूमी’ अशी नावं देण्यात आलेल्या अँकरना 50 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये बोलता येते.
आपले शेतकरी प्रेक्षक देशातील सर्व राज्यांमध्ये हे अँकर पाहू शकतात,त्यांच्याशी संवाद साधू शकतात…. हे AI अँकर देशात आणि जागतिक स्तरावर होत असलेल्या कृषी संशोधनाविषयी, कृषी मंडईतील ट्रेंड, शेतीमधील बदल याविषयी आवश्यक असलेली प्रत्येक माहिती पुरवतात. हवामान, किंवा सरकारी योजनांची इतर कोणतीही माहिती हे anchor आपल्याला घरबसल्या देत आहेत.
अश्याप्रकारे दूरदर्शनच्या निर्मिती पासून ते आतापर्यंत शेती आणि ग्रामीण कार्यक्रम विषयक प्रसारण आणि आपल्या देशाच्या शेती विकासात दूरदर्शनचा मोठा सहभाग राहिला आहे.
— लेखन : शिवाजी फुलसुंदर.
निवृत्त उपमहासंचालक, दूरदर्शन. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
फारच सुंदर लेख
दूरदर्शनच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाची छान माहिती प्रकाशित केली आहे. कृषि, शिक्षण, माहिती आणि मनोरंजन इत्यादी विविध समाज प्रबोधनाचे तसेच दूरदर्शनची कनेक्टिव्हिटी साठीचे प्रयत्न इत्यादी माहिती या लेखातून मिळाली
दूरदर्शनची शेतीविषयक माहितीचे प्रसारण करण्यात भूमिका मोलाची आहे.
खूप सुंदर लेख
जुन्या प्रेमळ आठवणींना या मुळे उजाळा
धन्यवाद साहेब 🌷🙏
Nostalgic Sir,
Fantastic and fruitful memories.
Well written
It’s highly appreciated since inception of Doordarshan for its creativity, approach of education , extension , agriculture, cultural in all sectors of community in very wonderful way . Hats off to you and your crew members for such dedication for the cause of society and rural population at large
My compliments to you
Rohidas Ghodekar
Horticulturist
मनापासून धन्यवाद , सर…! 🙏
… प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
हा लेख अप्रतिम जमला आहे.खूप सुंदर जुन्या आठवणी आहेत.
अतिशय उत्कृष्ट लेख,आणि आपले मोलाचे योगदान…..🙏💐🌹💐🌹
खूपच प्रभावी आणि मनोरंजक प्रवास झालाय “दूरदर्शन” या प्रकल्पाचा। आमच्या घरी प्रथमच 1979 च्या दरम्यान TV आला, तेव्हापासून मी आपल्याला तिथे पहातोय, फार छान वाटतंय की मी आपल्याला जवळून ओळखतो, अभिमान वाटतो आपल्या कामगिरी विषयी।
खूप शुभेच्छा।
👍👍👌👌🌹🌹