प्रत्येक व्यक्तीला आनंदाने जगण्याचा हक्क आहे. पण आनंदाने जगण्यासाठी आपलं जीवन हे मुळात आरोग्यदायी असणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्येनुसार, आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नाही तर त्यात व्यक्तीचे मानसिक, भावनिक, सामाजिक आरोग्य हे सुध्दा अंतर्भूत केले आहे. या दृष्टीने वैद्यक शास्त्रातील सर्वात आधुनिक शाखा असलेली निसर्गोपचार पद्धती समजून घेणे उचित ठरेल.
– संपादक
नुकतेच आम्ही, म्हणजे मी व माझी पत्नी सौ अलका, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात १० दिवस राहून आलो. तसे तर मी गेली अनेक वर्षे, वर्षातून एकदा तरी १०/१२ दिवस तिथे जात आलो आहे आणि त्याचा मला अत्यंत फायदाही होत आला आहे.
निसर्गोपचाराचे फायदे आणि महत्व जाणून घेण्यापूर्वी आपण निसर्गोपचार या वैद्यकीय शास्त्रातील सर्वाधिक आधुनिक उपचार पद्धतीचे जनक कोण होते ? त्याची सुरुवात कशी झाली ? भारतात त्याचे आगमन कधी झाले ? मुळात निसर्गोपचार म्हणजे काय ? हे समजून घेण्याची गरज आहे.
निसर्गोपचाराचे जनक :
जर्मनीत १८७२ मध्ये जन्मलेले डॉ. बेनेडिक्ट लस्ट हे निसर्गोपचाराचे जनक आहेत. निसर्गोपचाराची स्थापना आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा या क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला आहे.
डॉ. लस्ट यांचा निसर्गोपचारातील प्रवास हा त्यांच्या बालपणातील दीर्घ आजाराशी केलेल्या संघर्षामुळे सुरू झाला. यामुळे त्यांना या नैसर्गिक उपचार पद्धतींचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली.
जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये हायड्रोथेरपी, फिजिकल थेरपी आणि इतर नैसर्गिक उपचार पद्धतींचे औपचारिक प्रशिक्षण घेतल्यानंतर, डॉ. लस्ट १८९२ मध्ये अमेरिकेत आले. त्यांनी न्यूयॉर्क शहरात “अमेरिकन स्कूल ऑफ नॅचरोपॅथीची” स्थापना केली. त्यांनी या संस्थेद्वारे निसर्गोपचार उपचारक यांच्या पहिल्या पिढीला प्रशिक्षित करून अमेरिकेत संपूर्ण निसर्गोपचाराची तत्त्वे आणि पद्धतींचा प्रसार केला.
१९०२ साली “द नॅचरोपॅथ अँड हेराल्ड ऑफ हेल्थ” हे पहिले निसर्गोपचारविषयक वैद्यकीय प्रकाशन त्यांनी सुरू केले. या प्रकाशनाने निसर्गोपचाराचे ज्ञान, संशोधन आणि प्रगती सामायिक करण्यासाठी, निसर्गोपचाराची तत्त्वे आणि पद्धतींचा जगभर प्रचार करण्यासाठी मोठे योगदान दिले. याशिवाय त्यांनी “द युनिव्हर्सल नॅचरोपॅथिक एनसायक्लोपीडिया” यासह अनेक पुस्तके आणि प्रकाशने लिहिली, जी विविध नैसर्गिक उपचार आणि त्यांचे अनुप्रयोग करणारी निसर्गोपचार चिकित्सकांसाठी मुख्य संसाधने बनली.
भारतातील निसर्गोपचार
भारतातील निसर्गोपचाराचे जनक डॉ. कल्याणकृष्णन रामदास हे होत. त्यांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन देशात निसर्गोपचाराची स्थापना आणि प्रगती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
केरळ मध्ये १९२३ साली जन्मलेल्या डॉ. रामदास यांनी नैसर्गिक उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. १९८६ साली पुणे येथे त्यांनी भारतातील पहिल्या “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी” या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. ही संस्था शिक्षण, संशोधन आणि निसर्गोपचाराचे केंद्र बनले आहे .डॉ. रामदास यांनी संस्थेचे संचालक म्हणून अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि निसर्गोपचार अभ्यासकांच्या नवीन पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारतातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये निसर्गोपचार समाकलित करण्यासाठी विविध सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांसोबत सहकार्य केले.
जागरुकता निर्माण करण्याच्या आणि निसर्गोपचाराच्या फायद्यांचा पुरस्कार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे निसर्गोपचार पद्धतीस, भारत सरकारकडून अधिकृत औषध प्रणाली म्हणून मान्यता मिळाली. डॉ. कल्याणकृष्णन रामदास यांची निसर्गोपचाराची दृष्टी आणि समर्पण यांचा भारतातील क्षेत्रावर मोठा प्रभाव पडला आहे.
निसर्गोपचार म्हणजे काय ?
निसर्गोपचार हा आरोग्यसेवेसाठी एक व्यापक आणि सर्वांगीण दृष्टीकोन आहे जो स्वतःला बरे करण्यासाठी शरीराच्या जन्मजात क्षमतेचा उपयोग करण्यावर भर देतो. निसर्गोपचारामध्ये नैसर्गिक उपचार आणि उपचारांचा एक विस्तृत दृष्टिकोन आहे जो केवळ आजाराची लक्षणेच नाही तर मूळ कारणे देखील हाताळण्याचा प्रयत्न करतो. ही सर्वांगीण शिस्त संपूर्ण कल्याणासाठी पोषण, हर्बल औषध, हायड्रोथेरपी, शारीरिक हाताळणी आणि जीवनशैली समुपदेशन यासह विविध पद्धतींमधून काढते.
निसर्गोपचाराच्या मुळात संपूर्ण व्यक्तीवर उपचार करणे हे तत्त्व आहे, हे ओळखून शारीरिक आरोग्याचा भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणाशी संबंध आहे. निसर्गोपचाराचे उपचारक आजारांची मूळ कारणे शोधण्यासाठी रूग्णांची सखोल माहिती घेतात. त्यानुसार उपचारांची दिशा ठरवितात.
निसर्गोचार पद्धती :
निसर्गोचार या नावातच म्हटल्याप्रमाणे या पद्धतीत नैसर्गिक बाबींचा जसे की सूर्य प्रकाश, उष्णता, शीतलता, पाणी, फळे, नैसर्गिक अन्न पदार्थ म्हणजे तिखट मीठ नसलेल्या भाज्या, चटण्या, भाकरी, ताक अशा बाबींचा समावेश असतो. या शिवाय भारतातील निसर्गोपचार पद्धतीत प्रार्थना, योग याचाही अवलंब केला जातो. विशेषत: या पद्धतीत कोणत्याही रोगाच्या बरे होण्यासाठी औषधे देत नाहीत किंवा शस्त्रक्रिया केली जात नाही.
उरळी कांचन निसर्गोपचार आश्रम
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्यांना झालेल्या काही आजारासंबंधी उपचार घेण्यासाठी १९४६ साली पुणे येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ फिरोज मेहता यांच्याकडे आले होते. त्या उपचारांचा महात्मा गांधी यांना चांगला फायदा झाला. निसर्गोपचाराचे महत्व ओळखून त्यांनी त्यांच्या तत्वांनुसार निसर्गोपचार खेड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत त्यांच्या अनुयायांना सांगितले. यासाठी पुणे येथील भन्साळी परिवाराने त्यांची पुणे – सोलापूर महामार्गावर असलेल्या, रस्ते आणि रेल्वे ने जोडल्या गेलेल्या उरळी कांचन येथील जागा निसर्गोपचार आश्रमासाठी दिली. त्यामुळे १९४६ साली उरळी कांचन येथे निसर्गोपचार आश्रम सुरू करण्यात आला.
हा आश्रम निसर्गोपचार ग्रामविकास ट्रस्ट तर्फे चालविला जातो. सध्या श्री हृशिकेश अ. मफतलाल हे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तर डॉ नारायण जी हेगडे हे कार्यकारी विश्वस्त असून सर्वश्री गिरीश जी सोहनी, ज्ञानोबा टी कांचन हे विश्वस्त तर डॉ अभिषेक देविकार हे विश्वस्त सचिव आणि संचालक आहेत.
या आश्रमाच्या उभारणीत, तो वाढविण्यात गांधीजींचे अनुयायी स्वर्गीय श्री मणिभाई देसाई आणि स्वर्गीय श्री बाळकोबा भावे यांचे अमूल्य योगदान आहे.
कोरोना काळाचा अपवाद वगळता गेली ७८ वर्षे हा आश्रम, येथील डॉक्टर्स, सर्व कर्मचारी अहोरात्र सेवा देत आले आहेत. येथे राहून एकावेळी २५५ जण उपचार घेऊ शकतात. तर ६० बाह्य रुग्णांना उपचार देण्याची सुविधा आहे. देश विदेशातून लोक इथे येत असतात.
कशावर उपचार होतात ?
या आश्रमात पुढील रोगांवर उपचार केले जातात.
१) हायपर टेन्शन / उच्च रक्तदाब
२) अस्थमा / दमा
३) सोरायसिस, एकझिमा, त्वचा विकार
४) मेटाबॉलिक सिंड्रोम/ चयापचयजनक विकार
५) लठ्ठपणा / वाढीव वजन
६) मनोकायिक विकार / मधुमेह (टाईप २ डायबेटिस)
७) स्त्रीरोग विकार (पी सी ओ डी), इंशुलिन रेझिस्टँट
८) अस्थिचे विकार – संधिवात, आमवात, संधिजोड विकार.
इथे येण्यासाठी आश्रमाच्या वेब साईट वर जाऊन आरक्षण करावे लागते. साधारण तीन महिने आधी आरक्षण केलेले बरे असते. आश्रमात आपल्या बजेटनुसार निवास व्यवस्था उपलब्ध आहे. तथापि, आहार आणि उपचार केंद्रे मात्र सर्व रहिवासी यांच्यासाठी समान आहे. तसेच येताना आपल्या सोबत आपल्या आजाराबाबतची फाईल, अद्यावत रिपोर्ट्स आणावे लागतात. प्रवेश देण्यापूर्वी येथील डॉक्टर्स आपली फाईल, रिपोर्ट्स पाहून आहार, विहार, उपचार पद्धती निश्चित करतात. त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आणि महत्वाचे म्हणजे आपल्या हिताचे असते. येथील वास्तव्याचा कालावधी हा कमीतकमी ७ दिवस तर प्रत्येक व्यक्ती, त्याचे आजार, उपचार या नुसार वेगवेगळा असतो.
दिनचर्या :
या आश्रमातील दिनचर्या पुढील प्रमाणे असते.
पहाटे
५:०० – जागे होणे आणि प्रार्त:विधी आटोपणे.
५.१५ ते ६.०० – सर्व साधारण योग साधना.
६.०० ते ७.००- व्यक्तीच्या आजारानुसार योग साधना / विहार
६.१५ ते ७.००- पॉवर योग
सकाळी
७.२५ ते ७.३० – काढा
७.३० ते १०.००- मालिश, मिट्टीलेप, बाष्प स्नान, जल उपचार.
या दरम्यान
८.०० ते ९.०० – रस पान
१०.३० ते १२.०० – निसर्गोपचारानुसार आहार
दुपारी
१२.०० ते २.१५- आराम
२.१५ ते २.३० – बैठे योगा
३.०० ते ०५.३० – उपचार
४.०० ते ४.३० – रसपान
४.३० ते ५.३०- आरोग्य विषयक व्याख्यान
संध्याकाळी
५.३० ते ६.३०- निसर्गोपचारानुसार आहार
६.३० ते ७.१५ विहार
७.१५ ते ७.४५- प्रार्थना
रात्री
७.४५ ते ८.३० – ध्यान धारणा
८.३० ते ९.०० – मनोरंजन
९.३० – झोपी जाणे.
हा आश्रम आहे, केवळ उपचार केंद्र नाही, याचे भान येथे सतत बाळगणे गरजेचे आहे.
डॉ अभिषेक देविकार, त्यांचे सहकारी डॉक्टर्स, सर्व सहकारी, कर्मचारी अशी सर्वच मंडळी अतिशय आपुलकीने, शिस्तीने आपापली सेवा देत असतात.
हा लेख लिहिण्यासाठी डॉ अभिषेक देविकार यांच्याशी झालेली बातचीत, आश्रमाने प्रसिद्ध केलेले माहिती पत्रक, त्यातील छायाचित्रं आणि गुगल वरील माहितीचा खूप उपयोग झाला, याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आश्रमात काही दिवस राहिलो म्हणजे कायमचा कायापालट होईल, अशी अपेक्षा करू नये. तर महत्वाचे आहे ते आश्रमात पाळलेल्या जीवनशैलीचा तसेच व्यक्तीनुसार दिलेल्या सूचनांचा अंगीकार कायम स्वरुपी केला पाहिजे. हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली आहे. तर चला मंडळी, निसर्गोपचाराकडे वळू या आणि आनंदी, आरोग्यदायी जीवन जगू या.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय उपयुक्त माहिती देवेंद्र सरांनी लेखात सविस्तर मांडली आहे.
निसर्गोपचार सध्या मानवी जीवनाला फारच गरजेची आहे. आपली बदलती जीवनशैली ही आपल्या आरोग्याची विषबाधा आहे.
मग चला तर….
सुंदर माहिती दिली आहे. मी सुद्धा एक शिबिरामध्ये भाग घ्यायचा विचार करत आहे..
खूपच सुंदर सविस्तर माहिती दिली आहे .
निश्चित आम्ही आश्रमाला भेट देऊ
Newsstorytoday या वेबपोर्टल तर्फे आपण Dec.ला एक ७ दिवसाचा कॅम्प अरेंज करणार आहोत. आपण interested असाल तर जमल्यास फोन करा सविस्तर बोलणे होईल.
निसर्गोपचार ही आनंदी जीवनासाठी उत्कृष्ट पध्दती आहे.
उरुळीकांचन येथील निसर्गोपचार केंद्राविषयी ऐकून होतो.प्रस्तुत लेखात भुजबळ सरांनी या केंद्राचा तपशील सांगून उपयुक्त ज्ञानप्रसाराची लोकशिक्षकाची भूमिका साकरलीय. ही माहिती मार्गदर्शक आहे.
खूपच छान माहिती मिळाली निश्चितच जावेसे वाटत आहे, आभार 🙏
आपण dec.ला एक ७ दिवसाचा कॅम्प अरेंज करणार आहोत. आपण येणार असल्यास फोन करा.
निसर्गाउपचार विषयी बऱ्याच जणांना माहिती नसते.संपादक भुजबळ साहेबांनी स्वतः अनुभव घेऊन अभ्यासू माहिती लिहिली आहे.
अभिनंदन सर
गोविंद पाटील सर जळगाव.
खूपच उपयुक्त माहिती…!
मनापासून धन्यवाद, देवेंद्र सर…!!🙏