कानपूर हवाईदलाचे मुख्सालय, सोमवारची सकाळ होती, एयर फोर्स स्टेशन कानपूरमध्ये ते आठवड्याच्या स्टेशन प्रॅक्टिस परेड दिवसाचे असायचे. पूर्ण वेबिंग आणि कमरेभोवती लटकवलेल्या रिव्हॉल्व्हर्ससह दोन फेऱ्या झाल्यानंतर, ते जड सामान परत करून सर्वजण आपापल्या विभागांमध्ये आणि हँगरमध्ये परतले.
फ्लाइंग ऑफिसर पी.एन. मिश्रा, माझा अकाउंट्स कोर्समेट, मला त्याच्या बाईकवरून ४०२ स्टेशनच्या अकाउंट्स सेक्शनला घेऊन गेला, जे परेड ग्राउंडजवळ होते. तिथे आम्ही ग्रुप डी सिव्हिलियन कळकट कपड्यातील कालीचरणने बनवलेला कडक चहा प्यायलो. फ्लाइंग ऑफिसर मिश्रा अचानक म्हणाला, ‘शनिवारी तुझी कॅश टॅली झाली होती का ?’ हे माझ्यासाठी धक्कादायक होते ! माझा चेहरा गंभीर झाला. मी म्हणालो, ‘नाही यार, पण तुला कसे कळले ?’
तो चेहऱ्यावर भाव न दाखवत म्हणाला, ‘असेच’. मग मला वाटले की मी हे माझ्या प्रिय कोर्समेट बरोबर काय झाले ते शेअर केले पाहिजे. मिश्रा कोर्समेट असूनही एक्स रँकर असल्याने १२-१३ वर्षांनी वयाने मोठा होता. शनिवारी आम्ही उरलेल्या पैशाचा मेळ लावायसाठी संघर्ष करत होतो. बाकीचे सर्वजण पॅक अप करून गेले, पण कॅश अकाउंट क्लार्क कॉपल शिवदासन आणि मी पेमेंट झाल्यावर उरलेल्या पैशाचा हिशोब करण्यासाठी झटत होतो. आम्ही पेड आणि अनपेड व्हाउचर्सची तपासणी केली. व्हाउचर्सचा सारांश तपासला. पण काहीही सापडले नाही. आम्ही संपूर्ण कॅश पुन्हा तपासली. जरी आम्ही दैनिक कॅश पेमेंट रजिस्टरमध्ये व्हाउचर सारांशानुसार आवश्यक रोख काढली होती. सामान्यत: पद्धत अशी असे की मी पैसे मोजून ते कॉर्पोरल शिवदासनला पुन्हा मोजण्यासाठी देत असे. त्यानंतर तो लाभार्थ्यांना देत असे. लाभार्थी पैसे मिळाले म्हणून सही करत असे आणि आमच्यासमोर मोजूनबरोबर असल्याची खात्री करून निघून जात असे.
शनिवारी असे झाले की दरम्यान मला काही कारणास्तव मला एसएओकडून बोलावले गेले आणि त्या काळात कॉर्पोरल शिवदासनने माझी वाट न पाहता काही जणांना पेमेंट केले. म्हणून त्याला वाटत राहिले की चूक त्याच्याकडून झाली असावी. भयंकर गर्मी आणि घामाने थकून गेल्याने, आम्ही तिजोरी बंद केली आणि विचार केला की सोमवारी नव्याने पाहू आणि आता तू प्रश्न विचारलास की पैशांचा हिशोब जुळला का ? हिशोबात घोळ झाला, हे तुला कसे कळले ?
तो म्हणाला, ‘पहा, मला काल लखनऊहून माझे बॉस स्क्वाड्रन लीडर आरएन सिंह यांच्याकडून ट्रंक कॉल आला होता. त्यांनी म्हटले, “ओकला विचार, त्याने कॅश टॅली केली आहे का ? नसेल तर, शनिवारी जितके पैसे कमी पडत होते तितके पैसे त्याला तू दे. मी सुट्टीवरून परत आल्यावर तुला रक्कम परत देईन. पण आधी ओकला पैसे दे”?’
हे कसे घडले ते सांगताना स्क्वाड्रन लीडर आर एन सिंह म्हणाले, ‘रजेवर जाण्यापूर्वी पे ॲडव्हान्स आणि इतर काही देयके मी नीट मोजल्याशिवाय तोंडी बेरीज केली. मला घाई असल्याने, फ्लाईंग ऑफिसर ओकने मी सांगितले तेवढे पटकन काढून दिले. त्यानंतर, मी वाटेत काही पैसे खर्च केले. त्यामुळे मला किती पैसे नक्की जास्त मिळाले ते कळू शकले नाही.’ मी कॉपल (कार्पोरलचा शॉर्टफॉर्म) शिवदासनला बोलावले. तो शनिवारच्या देयकांचा तपशील घेऊन आला. फ्लाईंग ऑफिसर मिश्रा यांनी त्याला विचारले की किती कमतरता आहे ? ते सुमारे ₹ सातशे होते. मिश्रा यांनी पाकीट उघडून रक्कम भरली. ‘शशी, सुदैवाने आपल्याच अकौंट्स ब्रांचच्या आर.एन.सिंग सरांच्या बाबतीत घडले. म्हणून तू थोडक्यात बचावलास. कानपूर हे कुप्रसिद्ध ठिकाण आहे हे तुम्हाला माहीत आहेच. ‘पैशाचा मोह इतका भयानक असतो की फसवणूक करण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. जादा पैसा कोणाकडे गेला हे माहीत असूनही ते पैसे परत मिळण्याची शक्यता येथे नाही. जपून व्यवहार कर. जोपर्यंत पैसे तुमच्या हातात आहेत तोपर्यंत खात्री करा की तुम्ही ते गफलत करून गमावणार नाही याची. त्याच्या पोक्त सल्ल्याने मला माझ्या भावी कारकिर्दीत मदत झाली.
फणिंद्रनाथ मिश्रा नंतर अकौंट्स ब्रांचमधून जज एडव्होकेट झाला. कोर्टमार्शल संदर्भात पुन्हा भेट झाली. तो किस्सा नंतर सांगेन. आता तो बिहारमधे वयाच्या ८८ व्या वर्षात सिवानजवळ राहतो. असो.
पैसे गमवायच्या संदर्भात पूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला…! त्याचे असे झाले की लवानिया म्हणून वन विंग, श्रीनगरच्या अकौंट्स सेक्शन मध्ये एक माझा चीफी होता. फ्लाईट सार्जंटला कौतुकाने चीफी असे संबोधत असत. आता ती रँक राहिली नाही. तर एकदा ऐन थंडीत, एक विमान काही सैर सपाटा करून लँड झाले. ते पालमला चालले होते. आधी जम्मूपर्यंत कटकटीचा दीर्घ रस्ता नंतर रेल्वेतून बिना रिझर्वेशन प्रवास करत दिल्लीला जायचे, तिकडून पुन्हा गाडी बदलून पुढच्या प्रवासाला जाता जाता सुट्टीचा आनंद मावळत असे. म्हणून बरेच जण दिल्लीला एअरलिफ्ट घेण्यास उत्सुक होते. अशावेळी ते दिल्लीला जाणारे विमान म्हणजे सुट्टीवर जाणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी होती. जो तो आपापले सामान जसे जमेल तसे घेऊन त्या विमानात बसून जाण्यासाठी प्रयत्नात होता. बऱ्याच जणांना खिशात पैसे असण्यासाठी अकाउंट सेक्शनकडे धाव घ्यावी लागली आणि त्यामुळे मला वेळ न दवडता पटापट पेमेंट करायची वेळ आली. आता प्रत्येकालाच घाई होती जो तो विमानात आपल्याला बसायला जागा मिळेल का नाही या चिंतेत होता. त्यामुळे तोही पैसे घेताना जास्त कटकट न करता पटापट पैसे घेऊन खिशात घालत असे. या सर्व गोंधळात पेमेंट झाले. ते विमान आपल्या ठराविक वेळी दिल्लीला रवाना झाले.
त्यानंतर मी डोके धरून बसलो ! कारण शंभर रुपये कमी पडत होते ! आता ज्यांना पेमेंट केले होते ते तर आता सापडणे शक्यच नव्हते. त्यामुळे आता काय करायचं असा सारखा विचार करत मला बाकीचे काही सुचेना ! त्यावेळेला आमचे चीफी म्हणाले, ‘सर आता तुम्ही या सेफ पासून लांब रहा. माझ्या हातात चाव्या द्या आणि पहा काय होते ते ! कारण माझी खात्री आहे की आपल्या हातून पेमेंट जास्त गेलेले नाही ! शंभर रुपयाची नोट इथेच कुठेतरी असली पाहिजे ! आता त्याच्या त्या म्हणण्यामुळे मला धीर आला आणि त्या तिजोरीचे आणखी काही कप्पे असलेल्या किल्ल्याचा जुडगा मी चीफी लवानिया याच्या हातात दिला. माझी उभे राहायची नक्कल करून म्हणाला, ‘सर आता तुम्ही बुखारीजवळ आरामात चहा प्या. बघा मी कसा शोधून काढतो ते ! मी पूर्वी पण असेच काही काही वेळेला शोध लावलेले आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मला वाटले की हे आपले मला बरे वाटावे म्हणून थोडेसे पेपटॉप करतोय. काही वेळानंतर ते सगळे खालचे ड्रॉवर्स असतात ते ते सगळे बाहेर काढून त्यानी पाहिले तरी सुद्धा ती काही एक नोट सापडेना ! त्यानंतर आणखी एका ड्रॉवरला हात घातला आणि तो ड्रॉवर बाहेर काढल्यानंतर त्यांनी खोल हात घालून एक शंभर रुपयाची नोट बाहेर काढली ! माझ्या दृष्टीने ती जादूच होती ! त्याचे झाले ते असे की बऱ्याचदा तो संपूर्ण ड्रॉवर नोटांनी भरल्यानंतर तो बंद करत असताना वरची एखादी नोट अशी सरकून त्या ड्रॉवरच्या खाली जाऊन बसत असे. त्यामुळे बाकी सगळं जरी शोधलं तरी त्या ड्रॉवरच्या खाली सरकून गेलेली ती नोट कधी सापडणं शक्य नव्हतं. मोठ्या आढ्यतेने चीफी म्हणाला, ‘सर मैने बोला था ना आपको, आपको नोट मिल जायेगी’ असे म्हणून त्यांनी माझा चेहरा हसरा केला !
नंतरच्या काळात माझ्या जुनियरवर असे प्रसंग येत तेव्हा मी लवानिया सारखा त्यांना बाजूला सारून गफलत सोडवत असे. काही मजेशीर अनुभव पैसे हाताळताना होणाऱ्या गफलतीतून निर्माण होतात याची जाणीव मला हवाईदल सोडेपर्यंत सतत होती. अर्थात फारच कमी वेळा असे पैसे गमावण्याचे प्रसंग माझ्यावर नंतर आले. तर माझ्या मित्रांनी सांगितलेला सल्ला लवानियानी आणि केलेली ती शोधाची मजा आता आठवून छान वाटतं की आपल्याला असे साथीदार, असे सहाय्यक मिळाले आणि माझ्या हवाई दलातील आठवणीत अनमोल भर टाकून गेले…!
क्रमशः
— लेखन:विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800