प्रतिभावंत लेखक, चित्रपट सृष्टीचे अभ्यासक दिवाकर गंधे यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांचे सहकारी, मित्र श्री निरंजन राऊत यांनी जागविलेल्या या त्यांच्या काही आठवणी..दिवाकर गंधे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मी कार्यरत असताना मला दिवाकर गंधे यांच्या सारखा एक प्रतिभावंत मित्र लाभला, हे मी माझं भाग्य समजतो. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. माझे जेष्ठ सहकारी केशवराव चव्हाण, म ना राणे, मी आणि दिवाकर यांची आम्हाला वेळ मिळाला की नेहमीच मैफिल रंगत असे.
आमच्या या मैफिलीत चित्रपट सृष्टीतील के.एल सैगल, के.एच.आत्मा, राज कपूर, मीना कुमारी, लता मंगेशकर, मन्नाडे, तलत महमूद, व्ही शांताराम, शुभा खोटे अश्या अनेक नामवंत कलाकार यांच्याबाबतचे विविध किस्से दिवाकर सांगत असे. अशा किश्यांचा खजानाच दिवाकरकडे होता. ते किस्से त्याच्या कडून, त्याच्या शैलीत ऐकणे ही एक प्रकारची मेजवानी असे. अशा मेजवानींचा आस्वाद आम्ही नेहमी घेत असू. सुप्रसिद्ध उर्दू लेखक के अब्बास यांच्याशी त्याची खास मैत्री होती.
हा आमचा प्रतिभावंत मित्र शासनाच्या लोकराज्यचे संपादन करीत असे. त्याच्या संपादकीय कारकीर्दीत त्याने चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, लता मंगेशकर, कवी कुसुमाग्रज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अश्या अनेक दिग्गजांवर काढलेले लोकराज्य चे विशेषांक अतिशय लोकप्रिय ठरले.
त्यामुळे लोकराज्य हे सरकारी प्रकाशन असून देखील त्याला एक वेगळीच झळाळी आणि लोकप्रियता मिळाली. अनेक थोर, जाणकार व्यक्तींनी हे अंक अजूनही जपून ठेवले आहेत.
या शिवाय दिवाकर ला अनुबोधपट लेखनाची आणि चित्रपट सृष्टीतील घडामोडींची आवड होती. यामुळे नामवंत लेखक, कलावंत, दिग्दर्शक, गायक यांच्या बरोबरच त्याने इतर अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर भरभरून लिहिले.
या लेखांची पुढे पुस्तके देखील निघाली. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळावर त्याने लिहीलेले लेख अत्यंत वाचनीय होते. राज कपूर हा त्याचा आवडता नट. त्याच्या मते राज कपूर म्हणजे एक अद्रुश्य संगितकार होता. त्यामुळे आज आपण पाहतो की राज कपूर यांच्या चित्रपटातील सर्वच गीते अजूनपर्यंत तरुण राहिली आहेत. या शिवाय संगीतकार शंकर जयकिशन, सुप्रसिद्ध गायक मुकेश, मन्ना डे, लता, मोहम्मद रफी यांच्या मुलाखती घेऊन त्यावर त्याने विपूल लेखन केले. मीनाकुमारी यांच्यावर दिवाकर ने लिहिलेला “वेदनेची हिरवी वेल” हा अप्रतिम लेख तर मी कधीच विसरू शकणार नाही.
दिवाकर ला अनेक पुरस्कार मिळाले होते. मात्र त्याने त्यांची प्रसिद्धी कधीच केली नाही. मुंबईतील कुर्ला येथील नेहरू नगर मध्ये तो रहात असताना त्याला नेहरु नगरच्या रहिवाश्यांनी “नेहरूनगर रत्नभूषण” हा पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते.
असा हा आमचा प्रतिभावंत, जिवलग मित्र आम्हाला १ मार्च २०१९ रोजी कायमचा सोडून गेला. तो गेला, मात्र त्याच्या आठवणी आमच्या मनात कायम आहेत. दिवाकर ला भावपूर्ण श्रद्धांजली.
— लेखन : निरंजन राऊत.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
प्रतिभावंत लेखक दिवाकर गंधे यांच्या बहुगुणी व्यक्तीमत्त्वाविषयी आमचे मित्र लेखक निरंजन राऊत यांनी लिहिलेला विशेष लेख खुप आवडला. लेखक आणि संपादक यांचे यांचे अभिनंदन…
आमचे मित्र दिवाकर गंधे यांच्या जीवनकार्यावर श्री.निरंजन राउत यांचा लेख आवडला.दिवाकर यांस जयंती निमित्त अभिवादन… सुधाकर तोरणे
त्यांचा लोकराज्य चा कालखंड मलाही अनुभवता आला. उत्तुंग असे साहित्यिक व्यक्तीमत्व होते. अशी माणसे अगदी अभावाने मिळतात. त्यांच्या पारिजात या कथासंग्रहावर मी दुर्मीळ पुस्तके या सदरात लेख लिहिला आहे. तो आवर्जून वाचावा.
अशा थोर व्यक्तीमत्वाला सलाम आणि भावपूर्ण आदरांजली