“माझे आजोळ”
का. रा. केदारी.
ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.
हे माझे आजोळ. वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार गाव. झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर, हिरवे माळरान, कौलारू, चौसोपी, ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा, शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड. सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं. प्रचंड दंगामस्ती, सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.
हो की नाही ?
पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं. गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती. तिथेच काही आऊट हाऊसेस आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती.
त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर, डबा ऐसपैस, लगोरी, लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती. विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये बोलायचे सारे.
मी ठाण्याची. माझा घरचा पत्ता,
धोबी आळी, शा.मा. रोड, टेंभी नाका ठाणे.
पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत, मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी. सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.
माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी, इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी, प्रसन्नमुखी मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.
वयाच्या पस्तीस—चाळीस वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते. खूप आठवणी आहेत. माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का ? दोन भागात विभागलेलं आहे. बालपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.
वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई. वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत. तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार नीराप्राशनाचा अनुभवही फारच आनंददायी असायचा.
आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक, अतुल आणि संध्या. संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची. सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं. आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं, मज्जा करायची. धम्माल !
धमाल तर होतीच. पण ? हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप, स्वच्छ. फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही. दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला, वॉशबेसीनवरचा पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे, शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ सुंदरच होतं.
आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का ? आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा.
आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा. पत्ते, कॅरम ! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं. आत्या रागवायची पण आजोबांना..ज्यांना आम्ही भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.
एकदा एका सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली. तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या, मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती. पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.
इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे. ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो. त्यावेळी भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे. आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे. संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरीमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो. त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू ? त्या फेसाळत्या लाटा, तो थंडगार वारा, समोर धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा. या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.
दुसरं— टाईम इज मनी आणि तिसरं— इफ यू सेव्ह अ पेनी पाऊंड विल सेव्ह यु.
समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.
मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची. तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं ! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.
पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे, निवडणे वगैरे. ही सारी कामं सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी आदिवासी माणसं असायची आणि त्यातही बायाच असायच्या. त्यांचं वागणं, बोलणं, काम करताना गाणं, त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची.अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी रमायची. माझी भावंडं मला चिडवायची पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.
शाळेच्या अंतीम परिक्षेच्या निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो. तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.
ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,
“जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे.”
‘आक्खा आंबा’ ही कल्पना खूप मजेदार आहे बरं का ?
भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद यात फरक आहे ना ? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे. म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला ?
आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं !
”अरे ! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते.” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का ? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं. त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.
आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे, ”कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका.”
“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू ? थांबते आता.
पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम !
क्रमश:
— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान आठवणी. त्या सर्व तुम्हाला अजूनही आठवत आहेत यातच ते आजोळ व तिथले तुम्ही व्यतीत केलेले दिवस आनंददायी असणार हे तुमच्या लेखन शैलीतून जाणवतं.