मधल्या काळात १९७४ साली माझ्या धाकट्या बहिणीचा विवाह माझा शाळा आणि कॉलेजमधला मित्र अविनाश रानडे याच्या समवेत पुण्यातील जयश्री मंगल कार्यालयात झाला होता. दिवाळीच्या सुट्टीला मी माधवनगरला आलेलो असताना माझ्यासाठी मुली पाहण्याचे काम आई-वडिलांनी हाती घेतले होते. याप्रमाणे काही मुलींचे फोटो आणि माहिती घेऊन काही मुली पाहण्यात आल्या. परंतु माझ्या मनात कोणी भरेचना. कारण माझ्या स्वप्नाची राणी ही तडफदार, पटापट इंग्लिश बोलणारी, पॅन्ट आणि टी-शर्ट वेषात आरामात राहणारी मुंबईची असावी, तिला दुचाकी चालवण्याचा सराव असावा आणि दर सुट्टीत तिला आणायला किंवा न्यायला मला जायला लागू नये अशा तऱ्हेची आणि मॉडर्न स्मार्ट व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर होती. म्हणूनच डोंबिवलीला माझ्या बहिणीकडे एक पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यात छाया ही माझ्यासाठी योग्य असे वाटून ‘आई-वडिलांच्याशी बाकीची बोलणी करा’ असे म्हणून मी कानपूरला परतलो.
१९७५ च्या २ मार्चला पुण्यात जिथे माझ्या बहिणीचे लग्न झाले होते त्याच कार्यालयात आमचे लग्न झाले. सांगलीला जाताना कात्रज घाटातील बोगद्याच्या अंधारात ‘च्युक’ आवाज झाला. छायाचे बीए सायकॉलॉजीचे फायनल वर्ष असल्यामुळे एप्रिलमध्ये परीक्षा संपून तिने कानपूरला यायचे ठरले होते. ती हुशार आणि बुद्धिमान आहे हे मी तिच्या बोलण्यातून समजून होतो. कानपुरातील महाराष्ट्र मंडळात आयआयटी, कानपुर आणि आमच्या हवाई दलातील स्टेजवर दोन्ही “घरचा पाहुणा” नाटकात आम्हा दोघांनी मुख्य भूमिका केली. छाया आणि मी रात्रीच्या प्रॅक्टिस करायला जात असू, त्यावेळेला तिचे संवाद पाठ असतच पण बाकीच्यांचेही संवाद पाठ असल्याचे जाणवत असे. मध्येच चहापाणी वगैरे होत रात्री बारानंतर आम्ही परतत असू. त्यावेळी आमची लँब्रेटा दुचाकी चालू व्हायला नेहमीच कुरकुर करत असे. त्यावेळेला बाकीचे तुम्ही दोघे बसा आम्ही धक्का मारतो असे म्हणून ती चालू करत असत !
माझ्या आजोबांनी लिहिलेल्या एका नाटकाचा प्रयोग कानपूरच्या महाराष्ट्र मंडळात सादर केला. त्याचे नाव होते ‘हे असेच चालायचे’ सिनेमात काम करण्याचे स्वप्न घेऊन लहान खेड्यातून आलेले तरुण जोडपे शहरात येऊन जादूनगरीतील एक एक छक्केपंजे समजून घेत सिनेमा, नाटक, दिखाऊ माध्यमे किती तकलादु आहेत, अशी मध्यवर्ती कल्पना असलेले ते नाटक माझ्या आजोबांनीच दिग्दर्शित करावे अशी माझी खूप इच्छा होती. परंतु काही ना काही कारणाने तसे घडले नाही. सार्जंट तेंडुलकरांनी माझ्या आजोबांच्या साहित्याला मान देऊन ते दिग्दर्शित केले.
माझ्या लग्नाआधी कॉलेज जीवनावर आधारित ‘हा, ही, हे’ वगैरे संवादामुळे चर्चेत राहिलेले मधुकर तोरडमल यांचे खूपच लोकप्रिय नाटक ‘तरुण तुर्क, घराणेशाहीचा आहेत तर म्हातारे अर्क’ नाटक केले होते. १९७६ साल उजाडले आणि मार्चमध्ये माझी पोस्टिंग टू टू झिरो टू स्क्वाड्रनला झाल्याचे फरमान आले.
सामान्यपणे सिनेमात घडणाऱ्या घटना किंवा गाण्याचा संदर्भ प्रत्यक्ष जीवनात फार क्वचित येतो. पण माझ्या बाबत असे घडले असेल तर नवल नाही. ‘अजीब दासता है ये’ या गाण्याचा प्रत्यक्ष जीवनात अनुभव मला आला, तो किस्सा पुन्हा केव्हातरी वेगळा सांगावा लागेल.
अकौंट्स ब्रांच कोर्समेट अप्पण्णा आणि त्याच्या बरोबरची ती घटना मी कधीच विसरणार नाही. आता ५२ वर्षांनंतर रिटायरमेंट झाल्यावर अप्पण्णाचा सदैव चेष्टेखोरी करायचा स्वभाव तसाच आहे !
ते साल होतं १९७५. पुण्यात मी छायाशी लग्न केलं पण तिची बीएच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा अगदी तोंडावर आली होती, म्हणून मी कानपूरला एकटाच परतलो. असा एकटा परतल्याचं भांडवल करून मला सगळ्यांनी भंडावलं. सगळ्यांनी फैलावर घेतलं झालं. नंतर असं घडलं की तिची परीक्षा काही कारणांनी दोन महिने पुढे ढकलली गेली आणि म्हणून मी तिच्या मुंबईच्या घरी जाऊन तिला काही काळापुरते कानपुरात आणायचे ठरवले. मी अगदीच जूनियर ऑफिसर असल्यामुळे मला सुट्टी मिळण्याचा प्रॉब्लेम फार झाला नाही. पण मला राहायचं कुठे हे कळत नव्हतं. कारण त्यावेळी आमच्या ऑफिसर्स मेस मध्ये असलेल्या खोल्यांची अवस्था अगदीच बेताची होती. सीसीए (ज्याला आम्ही चेंदीरा करी अप्पण्णाचा शॉर्ट फॉर्म करत म्हणतो.) ऑफिसमधे म्हणाला, ‘अरे असा तोंड पाडून का आहेस ? मेस मध्ये कशाला, तू आमच्या क्वार्टरमध्ये राहा. त्याचं लग्न नुकतच जरी झाला असलं तरी लग्नाच्या बाबतीत मला तो सीनियर होता. एका मॅरीड क्वार्टरमध्ये राहत होता. आता कोर्समेटने मदत नाही करायची तर कोण करणार ? म्हणाला, ‘तात्या (टोपे) अरे तू असं कर. घरी ये. मग पाहू आपण काय करायचं ते. त्या दिवशी मी संध्याकाळी त्याच्या घरी रंगीबेरंगी मग मधून कॉफीचा आस्वाद घेत असताना त्याने विषय काढला. ‘आम्ही पुढचे ४५ दिवस सुट्टीवर चाललोय तर आमच्या पश्चात तू तिला घेऊन रहायला ये. म्हणजे तुझा राहण्याचा प्रॉब्लेम संपेल!’
‘काय ग’ असं म्हणून त्यांनी सुमित्राकडे पाहिलं आणि ती मला पहात मानेने हो म्हणाली. सीसीए म्हणाला, ‘ घेऊन ये तिला. सांग छायाला, आता काय शिकायची वगैरे काही गरज नाहीये. थेट ये आणि माझ्या सीएम म्हणजे कोर्स मेटच्या घरात रहा.
आणि तसंच झालं. खरंच ती आली. त्याचे क्वार्टर आमच्यासाठी स्वर्ग होते. ते दिवस फुलपाखरासारखे निघून गेले. नंतर सीसीए पुन्हा जॉईन झाला. ती परत गेली. परीक्षा संपल्यावर पुन्हा आली. सीसीएला पहिल्यांदा भेटल्यावर ती त्याच्या तडफदार आणि रुबाबदारपणाला, आणि त्याच्या भरदार मिशांवर फिदा झाली. त्याच्या विनोदी कौशल्यावर तिला हसायला येई. घरी आल्यावर ती विचार करत होती की तो कसा त्याच्या बायकोचा कीस घेत असेल ? त्याच्या गालावरच्या त्या झुपकेदार मिशा तिच्या आड येत नसतील का ? त्यातून मला तात्काळ सिग्नल मिळाला आणि मी माझ्या मिशांना कायमचा गुड बाय केला ! ….
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800