नवरात्री दुर्गादेवीचे आठवं रूप ‘महागौरी माता‘ देवी म्हणून पूजली जाते. ‘महा’ म्हणजे सर्वोच्च, उत्तम आणि ‘गौरी’ म्हणजे गौर वर्णाची. उत्तम सर्वोच्चपदी तेजस्वी अशी महागौरी माता म्हणून वर्णिय असते. पवित्र अशी ही महागौरी देवी ही पांढऱ्या बैलावर आरूढ होत पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली असते.
देवीला चार हात आहेत. त्यापैकी उजव्या वरच्या हातात ‘त्रिशूल’ आणि डाव्या खालील हातात ‘डमरू’ आहे आणि बाकीचे दोन हात अभय मुद्रा आणि वरद मुद्रेत आहेत. देवीच्या चेहर्यावरील भाव शांत, समाधानाचे आहे.
महागौरी ‘अष्टवर्षा भवेद् गौरी…’ म्हटले आहे म्हणजे या देवीचे आयुष्य आठ वर्षाचे मानले जाते. आख्यायिकेनुसारची महागौरीची कथा, भगवान शिव ‘पती’ रूपात प्राप्त व्हावे म्हणून पार्वती देवीने कठोर तपश्चर्या केली. कठोर तपस्येने देवीचे शरीर काळे झाले. भगवान शिव पार्वतीच्या तपस्येवर प्रसन्न झाले. पार्वती देवीला पवित्र गंगाजल ने स्नान घातले. त्यामुळे भगवान शिवच्या दिव्य कृपेने पार्वतीदेवीची कांती तेजस्वी गौरवर्णीय झाली. त्यामुळे पार्वती ‘महागौरी’ झाली.
महागौरीच्या तेजस्वी प्रकाशात बसून उपासना केल्याने आपल्या जीवनातील गोंधळ, दुःख आणि दारिद्र्य दूर होते अशी श्रद्धा आहे. महागौरी देवी भक्तांना माणसामध्ये नातेसंबंध, परिवार यात अतूट निष्ठा आणि चिरस्थायी बंध निर्माण करण्यासाठी भक्तांना आशीर्वाद देते. महागौरीला मोगऱ्याची फुले आवडतात. तसेच प्रसाद म्हणून नारळापासून बनवलेली खोबऱ्याची वडी, लाडु नेवैद्य म्हणून दाखवतात
मस्तकाच्या वर मध्य बिंदूत ‘सहस्त्रार चक्राच्या वर सहा इंचा’ पर्यंतच्या ‘तेजोवलय’ मध्ये महागौरीचे स्थान स्तिथ आहे.
‘ॐ ‘ हा बीज मंत्र आहे.
नवदुर्गा देवी महागौरीचे स्थान तुळशीपाशी आहे. तुळस वातावरण शुद्ध करत सकारात्मक उर्जाची सातत्याने निर्मिती करत असते.
महागौरीची अनेक मंदिरे आहेत. वाराणसी, काशीमध्ये ‘बाबा बोले’ येथे मोठे मंदिर आहे. तसेच लुधियाना मध्ये सुध्दा मंदिर आहे.
क्रमशः
— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800