Tuesday, July 1, 2025
Homeलेखबदलते पत्ते !

बदलते पत्ते !

आपला जन्म होतो, तेथील पत्ता, पुढे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण, नवी नोकरी, बदलत्या नोकऱ्या, पदोन्नत्या, स्त्रियांच्या बाबतीत तर या शिवाय विवाह… अशा एक ना अनेक कारणांनी बदलत जाणारे आपले पत्ते म्हणजे जणू आपल्या जीवनाचा आलेखच ! असा हा सुंदर आलेख रेखाटलाय माजी कुलगुरू प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांनी. हा लेख वाचत असताना, आपल्या डोळ्यांसमोर आपले स्वतःचेही बदलत आलेले पत्ते नक्कीच येतील ! निदान माझ्या डोळ्यासमोर तरी आलेच !
– संपादक

आपले चेहरे, डोळे फसवे, नाटकी असतात. जे दिसतं ते खरं नसतं. पण खरं आहे असं भासत असतं. आतली वादळं आपणच आजमावतो.. आपण एकटेच त्यात भरकटत जातो.

आयुष्यातले शेवटचे स्वतःचे घर बदलताना माझे तसेच काहीसे झाले आहे. या निमित्ताने आयुष्यातल्या सर्व घराच्या पत्त्यांचा हिशेब मांडावा, असे वाटले. तसेही या वयात पुढची चिंता करत बसण्यापेक्षा भूतकाळात रमायला जास्त आवडते.

माझा जन्म मध्य प्रदेशातील छापरा इथला. मी सव्वा वर्ष वयाचा असताना मला माझ्या आईने माझ्या आजीच्या कुशीत टाकले. माझी रवानगी काका, आजीकडे मुलतापी ला झाली. हे आमचे घर तापी नदीच्या जवळ होते. म्हणजे कपडे धुवायला, अंघोळीला आजी नदीवर जात असे.
या गावच्या आठवणी फारशा लक्षात नाहीत. कारण काका, आजी यांनी नागपूरला स्थलांतर केले तेव्हा मी तीन वर्षाचा होतो.
नागपूरच्या पहिल्या घराचा पत्ता होता…
पारखी वाडा, इतवारी,
नागपूर २.
हे घर मुख्य पोस्ट ऑफिसच्या समोर, दाजी प्रायमरी शाळेच्या शेजारी होते. माझे प्रायमरी म्हणजे चौथी पर्यंतचे शिक्षण नगर पालिकेच्या याच शाळेत झाले. जवळ टांगा स्टॅण्ड होता. इतवारी हा भाग त्यावेळी व्यापार पेठ म्हणून प्रसिध्द होता. त्यावेळी स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोरावर होते. इतवारी भागात विदर्भ चंडिकेची स्थापना होत असे. त्यावेळी झालेला लाठीमार, अश्रुधूर आठवतो.

पाचवी नंतर अकरावी पर्यंत चे माझे शिक्षण महाल च्या सी पी अँड बेरार या शाळेत झाले. चीतार ओळी मार्गे शाळेत जाण्यात मजा यायची. तिथल्या गणपती, देवी च्या सुबक रंगी बेरंगी मूर्ती डोळ्यात कायमचे घर करून बसल्या आहेत. पारखी वाड्याचे घर पहिल्या मजल्यावर होते. एक दिवस अचानक आमच्या घरचा जिना चक्क कोसळला ! कुणाला काही झाले नाही हे नशीब ! त्यावेळी माझी एक काकू ओली बाळंतीण होती. आम्हाला शेजारच्या घरून जा ये करत घर रिकामे करावे लागले.

पारखी वाडा सुटला अन् घरचा पत्ता बदलला. आम्ही संती रोड वरील डांगे यांच्या वाड्यात शिफ्ट झालो. हे घर इतवारी हायस्कूल शेजारी होते. तेही पहिल्या मजल्यावर. या घरच्या दर्शनी भागात पिठाची गिरणी होती. त्याला टिना चे छप्पर होते ! याच टिनाच्या छपरा वरून जा ये व्हायची. उन्हाळ्यात याच टीना वर गाद्या टाकून आम्ही झोपत असू ! कॉमन संडास जुन्या पद्धतीचे. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची घृणास्पद प्रथा त्यावेळी (१९७० पर्यंत म्हणजे मी इंजिनियरिंग ची पदवी घेईपर्यंत) होती ! इथल्या घरात बंद बाथरूम नव्हते. त्यामुळे घरच्या मुली, स्त्रिया यांना किती लज्जास्पद, अडचणीचे वाटत असेल याची कल्पना केलेली बरी !

या शाळेच्या काळात नीलसीटी हायस्कूल मध्ये होणारी वसंत व्याख्यानमाला, आयचीत मंदिरातील गजानन बुवा मराठे यांची कीर्तने, चिटणीस पार्क मैदानावर ऐकलेले सुधीर फडके यांचे गीत रामायण, तिथेच ऐकलेला किशोर कुमारच्या गाण्याचा कार्यक्रम, पुढे कॉलेजात गेल्यावर धनवटे रंग मंदिरात पाहिलेली कोल्हटकर, कालेलकर, कानेटकर, अत्रे यांची नाटके.. या न पुसल्या गेलेल्या आठवणी..

माझी असली जडणघडण या इतवारी भागातल्या घरातच झाली. घराजवळील दत्त मंदिराशेजारी माझ्या एका विधवा आत्या चे घर होते. अभ्यासासाठी माझा मुक्काम तिच्याकडे असे. यावेळी मित्र मिळून रविवारी सायकल ने रामटेक, कोरहाडी ची देवी या सहली अजूनही विसरल्या जात नाहीत. सर्वार्थाने मंतरलेले दिवस होते ते !

पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आय आय टी ला जावे लागले. इथल्या हॉस्टेल चा दोन वर्षा साठीचा पत्ता होता :
१२२, डी राधा कृष्णन हॉल,
आय आय टी,
खरगपूर – ७२१३०२.
आय आय टी खरगपूर च्या हॉस्टेल ची नावे भारतीय नेत्यांच्या नावाची होती. उदा. नेहरू, पटेल, आझाद, गोखले, विद्यासागर, सरोजिनी नायडू वगैरे.. अपवाद फक्त महात्मा गांधींचा ! का ते मलाही कळले नाही.

एम टेक झाल्यावर माझा पहिला जॉब होता मुंबई चा. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तिथे माझे वास्तव्य होते कल्याणला. पत्ता..
डॉ वैद्य यांचा बंगला,
सिंडिकेट, मुरबाड रोड
कल्याण -४२१३०१.

मी इथे आलो होतो ते पेईंग गेस्ट म्हणून राहायला. पण मी या कुटुंबाचाच एक भाग झालो. आयुष्यातला पहिला मृत्यू मी या घरात अनुभवला, डॉ वैद्य यांचा.. त्यांनी आपले मृत्युपत्र करण्यासाठी माझी मदत घेतली होती. ऋणानुबंध कसे कुठे जुळतील सांगता येत नाही. अशी नाव नसलेली बरीच नाती पुढे माझ्या आयुष्यात आली.

या घरून कुलाबा येथील ऑफिसला जायला दोन तास लागायचे. सकाळी आठला घरून निघावे लागे. एक तासाच्या लोकल प्रवासात जाता येता मी बरीच उत्तम पुस्तकं वाचली. इथल्या वास्तव्यात माझ्या पहिल्या दोन कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या. या दोन्ही पुस्तकांवर कल्याण चा पत्ता आहे. मुंबई म्हणजे एक आगळा वेगळा रंगीत स्पेक्ट्रम ! या दीड वर्षाच्या वास्तव्यात मी मंगेशकर कुटुंबाचा कार्यक्रम ऐकला. नाना पालखीवाला यांचे बजेट वरील फेमस व्याख्यान ऐकले. बरीच नाटके पाहिली.

मला पी एच डी करायची होती. तिही नोकरी करून. त्यामुळे आय आय टी ला लेक्चरर ची जाहिरात येताच मला तेथील प्राध्यापकांनी कळवले. तेव्हाचे प्राध्यापक विद्यार्थ्यावर मुलासारखे प्रेम करीत असत, टॅलेंट असले तर ! माझे अर्थातच सिलेक्षन झाले. मूळ पगारावर पाच बढत्या मिळून !
आता माझा पत्ता होता :
गोखले हॉल ऑफ रेसिडेन्स !
वयस्क पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्टेल होते. समोर मुलींचे हॉस्टेल होते. या मुली आमच्या हॉल ला बुढा हॉल म्हणत असत विनोदाने !

काही महिन्यांनी मला क्वार्टर मिळाले. पत्ता झाला :
४/१४ ब्याचलर फ्लॅट,
आय आय टी कॅम्पस,
खरगपूर -७२१३०२.
लग्न झाल्यानंतर आमचा संसार याच घरात सुरू झाला. हे घर तळ मजल्यावर होते. तिथे चोऱ्या व्हायच्या ! म्हणून आम्ही ३/३ बॅचलर्स फ्लॅट ला शिफ्ट झालो. माझी मुलगी श्वेता चा जन्म याच घरातला. सिनियर झाल्यावर आम्ही ‘सी २३’ या स्वतंत्र क्वार्टर मध्ये शिफ्ट झालो. याच काळात माझी पी एच डी पूर्ण झाली.
या नऊ वर्षाच्या वास्तव्यात दोन प्रमोशन मिळालीत. खऱ्या अर्थाने प्रोफेशनल भरभराट याच काळात झाली.

अचानक उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली. हैदराबाद हे नवे स्टेशन आयुष्यात आले. इथे सुरवातीला नल्लाकुंटा, नंतर बोध्द नगर, पुढे टिळक नगर अशा भाड्याच्या घराचा प्रवास करीत आम्ही :
एल २५, ओ यू क्यांपस, येथील क्वार्टर मध्ये स्थिरावलो. याच दरम्यान परदेशातील एका विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून भरपूर पगाराची संधी मिळाली. इथे माझा पत्ता :
अबियान बीच, एडन,
नॉर्थ येमेन
असा होता. ही ऑफर दोन वर्षासाठी असली तरी कुटुंब इकडे एकटे म्हणून मी एका वर्षातच परतलो. पण त्या मिळालेल्या पुंजीतून आमचा स्वतःचा फ्लॅट घेता आला.
गेले २५ वर्षे आमचा पत्ता होता..
१०१, सुरभी हेवन अपार्टमेंट २-२-१०,
उस्मानिया विद्यापीठ रोड, हैदराबाद ५००००७.
हे घर अनेक अर्थाने लकी ठरले. एक तर ते माझ्या कॉलेजच्या अगदी जवळ म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावर होते. मुलांचे शिक्षण, लग्न, पत्नीची पीएच डी सारी याच घरातली कमाई. एकूणच उस्मानिया विद्यापीठातले वास्तव्य माझ्यासाठी सर्वांगाने चढत्या आलेखाचे होते. उस्मानिया विद्यापीठाने, या शहराने मला भरपूर मान सन्मान दिला. प्रतिष्ठा मिळाली. विद्यार्थ्यांचे आदरयुक्त प्रेम मिळाले. सर्वांचे सहकार्य मिळाले. मलाच नव्हे तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला ! मला स्वतःला पत्राचे अतिशय वेड होते. आता होते असेच म्हणावे लागेल. कारण आता इंटरनेट ईमेल व्हॉट्स ॲप मुळे पत्राचे महत्व उरले नाही. पोस्टमन ची वाट बघणे संपले. पण कोण एके काळी मी पत्र वेडा होतो. माझी दुसरी कादंबरी पत्रांजली पत्राच्या माध्यमातून लिहिली आहे.. गेली पस्तीस वर्षे इथे केवळ उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद या पत्त्यावर देखील पत्रे मला पोहोचली आहेत !!

हैद्राबाद येथील वास्तव्यात अचानक नागपूरच्या वी एन आय टी चा पहिला संचालक म्हणून संधी मिळाली. आता पत्ता झाला :
डायरेक्टर बंगला,
वी एन आय टी क्यांपस, अंबाझरी
नागपूर -४४००१०.
इथले वास्तव्य काही प्रमाणात वादळाचे अन् अल्पजीवी म्हणजे काही महिन्याचे ठरले. पण ज्या संस्थेत आपण शिकलो तिथेच प्रमुख पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान होता. इथल्या वास्तव्यात मी बरेच काही नव्याने शिकलो. त्याचा पुढे कुलगुरू झाल्यानंतर बराच उपयोग झाला !

माझ्या आयुष्यातली बहुतेक स्टेशन्स अचानक आलीत. निवृत्त झाल्यानंतर ध्यानी मनी नसताना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाली. २०११ ते २०१४ या तेथील कालावधीतील माझा पत्ता होता :
कुलगुरू निवास
विद्यापीठ परिसर,
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
औरंगाबाद.

औरंगाबाद येथील (आताचे छ्त्रपती संभाजीनगर) या वास्तव्याने शिक्षण क्षेत्रातील नवे वास्तव अनुभवायला मिळाले. माझा हा बंगला चोवीस तास कुणासाठीही उघडा असे. त्यामुळे खूप जनसंपर्क वाढला. नव्या ओळखी झाल्या. ज्या अजूनही टिकून आहेत. याच बंगल्यात माझ्या नातीचा अन्वेशीचा जन्म झाला. कुलगुरू निवासात जन्मलेले ते एकमेव बाळ असावे ! या वास्तव्यात ग्रामीण भागातील मराठवाड्याच्या या विद्यापीठाचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी योगदान देता आले. गाठी असलेल्या अनुभवाचा उत्तम उपयोग येथल्या वास्तव्यात झाला. इथल्या लोकांचे भरभरून प्रेम मिळाले आम्हाला ! अजूनही मला जास्तीत जास्त कॉल याच विद्यापीठातून येतात !

आता सगळी निरवानीरव सुरू असताना आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा आमचा पत्ता बदलला. वय झाले म्हणून दूर राहण्यापेक्षा आमच्या जवळ राहायला या, हा मुलगी, जावई यांचा आग्रह पटल्यामुळे नुकतेच आमचे बिऱ्हाड बदलले. आता पत्ता झाला :
एस एम आर विनय टेकनोपोलीस्
गुगल ऑफिस शेजारी,
हाय टेक सिटी कोंडापुर, हैदराबाद ५०००८४.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या शब्दाचा अंतर्भाव असलेला आधुनिक पत्ता झाला. हा आता शेवटचा पत्ता. कारण या नंतरच्या पत्त्याचा कुणालाच पत्ता नसतो उतार वयामुळे !

अशा अनेक घरांनी माझे आयुष्य घडवले. घराशी आपले जवळचे नाते असते. इथले कपडे, इथल्या वस्तू, इथली आपण केलेली सजावट, कडू गोड आठवणी.. सारेच हृदयाच्या कप्प्यात घर करून बसले असते. घर आपल्याला खऱ्या अर्थाने मोठे करते. आयुष्याला अर्थ देते घर. घराच्या भिंती बोलतात आपल्याशी जेव्हा आपण उदास, एकटे असतो. खचलेलो असतो. घर आपल्याला सांभाळून घेते. ऊर्जा देते. आपले घरच आपले आयुष्य असते. जे इतरांना माहिती नाही ते आपल्या घराच्या भिंतींना माहिती असते. या घराच्या भिंतीच्या आरशात आपले असली रूप, स्वरूप दडलेले असते.

जाता जाता एक योगायोग सांगावासा वाटतो. ज्या चार प्रमुख शहरात माझे आयुष्य सर्वार्थाने घडले, त्या शहराच्या नावात देखील काव्याचे यमक आहे.. नागपूर, खरगपूर, हैदराबाद, औरंगाबाद !
त्यामुळे आयुष्याचे सुरेल गाणे झाले नाही तरच नवल !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील