हिंदूंची मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नसून त्यांना पौराणिक, ऐतिहासिक, शिल्पकला, सांस्कृतिक, सामाजिक आणि लोक जीवनातील महत्वाचे केंद्र असे बहुविध महत्व प्राप्त झालेले आहे.
भारतातील तिरुवनंतपुरम पद्मनाभस्वामी मंदिर हे सर्वात जुने म्हणजे २० हजार वर्षांचा इतिहास असलेले आहे कारण पुंपुहार साम्राज्याचा इतिहासच तितका जुना आहे. आज भारतात जवळपास १० लाख मंदिरे आहेत. कोणे एकेकाळी हिंदू धर्म आणि संस्कृती चा विस्तार इतका होता की, आज ही कंबोडिया देशातील अंकोरवाट येथे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे जसे अती प्राचीन मंदिर आहे, तर अमेरिकेतील न्यू जर्सी येथील स्वामी नारायण मंदिर हे अत्यंत आधुनिक काळात उभारलेले भव्य दिव्य मंदिर आहे. सुदैवाने या दोन्ही मंदिरांना भेटी देण्याचे भाग्य मला लाभले आहे.
भारतातीलही बहुसंख्य मंदिरांना मी भेटी दिल्या आहेत. त्यांचे दर्शन घेतले आहे. भारतातील मंदिरांचे दोन प्रमुख भाग पडू शकतील. ते म्हणजे दाक्षिणात्य मंदिरे आणि उत्तरेकडील मंदिरे. या दोन्ही भागातील मंदिरांमध्ये प्रथम दर्शनीच आढळनारी बाब म्हणजे दाक्षिणात्य मंदिरे आणि त्यांच्या परिसरातील प्रसन्न वातावरण, स्वच्छता, शिस्त, अतिशय छान पद्धतीने होणाऱ्या दैनंदिन, वार्षिक धार्मिक बाबी होत.
या उलट उत्तरेकडील मंदिरे, त्यात महाराष्ट्र राज्य सुध्दा आलेच तर या भागातील बऱ्याचशा मंदिरांमध्ये, मंदिराच्या परिसरात ज्या प्रमाणात स्वच्छ्ता, शिस्त, वातावरणातील प्रसन्नता हवी असते, तशी दिसून येत नाही. काही ठिकाणी तर गेल्या गेल्या तेथील काही व्यक्ती दर्शन लवकर करून देतो म्हणून इतका पिच्छा पुरवतात की ते नकोसे होते. परिसरात विविध दुकानांनी इतकी दाटीवाटी केलेली असते की नीट चालता सुध्दा येत नाही. गर्दी तर इतकी असते की, त्या गर्दीचे नीट नियोजन सुध्दा होत नाही. काही ठिकाणी तर मूर्तीवर आपण डोके टेकवल्या टेकवल्या गाभाऱ्यातील व्यक्ती आपले डोके उचलते आणि पटापट ते पुढे ढकलत राहते. हा प्रकार तर मला फार अपमानास्पद वाटतो. दुरून दुरून येणाऱ्या भाविकांना क्षणभर सुध्धा त्या गाभाऱ्यात बसता येत नाही की, पूजा, प्रार्थना, ध्यान करता येत नाही. केवळ त्या मंदिरात जाऊन आलो, इतके चुटपुटसे समाधान काय ते आपल्याला मिळते.
महाराष्ट्रातील सुध्दा बहुसंख्य मंदिरे या परिस्थितीला अपवाद नाही. पण मला दोन अपवाद आढळले ते म्हणजे शेगाव येथील गजानन महाराज देवस्थान आणि अहिल्यानगर येथील देवगड संस्थान. या दोन्ही ठिकाणांची स्वच्छता, शिस्त, प्रसन्न वातावरण खरोखरच आपल्याला प्रभावित करणारे आहे. पण मग प्रश्न पडतो की, ही दोन मंदिरे, त्यांचा सुंदर, स्वच्छ, प्रसन्न वातावरण असणारा परिसर, सेवाभावी वृत्तीने काम करणारी तेथील मंडळी आहे अशी परिस्थिती इत्र्थिकानी का राहू शकत नाही ? या साठी आपल्याला काही करता येईल का ? तर मला या बाबतीत असे वाटते की, संबधित मंदिर व्यवस्थापन, त्या त्या गावातील नागरिक, स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन एक दिलाने ठोस पावले उचलली पाहिजेत. येणाऱ्या भाविकांच्या भावना जपल्या जातील यासाठी दक्ष राहिले पाहिजे. काही दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत.
आज स्वतःच्या वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालली आहे. या वाहनांना व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे.स्वच्छ उपहारगृहे, स्वच्छ्ता गृहे, यांची उभारणी केली पाहिजे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या भाविकांना निश्चित वेळ उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून मंदिर व्यवस्थापनाला शिस्तीचे नियोजन करता येईल आणि भाविकांना सुध्दा निश्चित वेळ पाहून येता येईल आणि सुटीच्या काळात जत्रांच्या दिवशी ऐनवेळी जी मोठी गर्दी त्याचे वेगळे, कायम स्वरुपी नियोजन करण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंदिर व्यवस्थापन असे काही पूर्ण वेळेचे, काही अल्पकालीन अभ्यासक्रम विद्यापीठांनी सुरू करावेत, जेणे करून मंदिर व्यवस्थापनाला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल तर त्या त्या भागातील युवक युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळू शकेल. शासनाने देखील मंदिर विकास प्राधिकरण स्थापन करून सर्व मंदिरांच्या व्यवस्थापनात एकसूत्रीपणा येईल, या साठी पावले उचलली पाहिजेत.
आज भारतीय आणि मराठी माणूस सुध्दा जगभर पसरत आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे जगाच्या विविध भागात हिंदूंची मंदिरे उभी रहात आहेत. त्यामुळे या प्रशिक्षित युवक युवतींना स्थानिक पातळीवरच नव्हे तर जगभरच्या मंदिरांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. गेल्याच वर्षी अबू धाबी येथे हिंदूंचे भव्य मंदिर उभे राहिले आहे. अशीच हिंदूंची मंदिरे जगभर उभारल्या जाऊन हिंदू धर्म, संस्कुतीचा विस्तार करण्याची गरज आगामी काळात भासणार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असो.
मी एक लेख लिहिला म्हणजे सर्व काही आपोआप होईल, अशी माझी अपेक्षा नाही. तर या विषयावर व्यापक विचार विनिमय, मंथन सुरू होईल आणि सर्व संबधित यांच्या सहमतीने ठोस पावले उचलल्या जातील, अशी माझी अपेक्षा आहे.
(पूर्व प्रसिद्धी: विश्व हिंदू परिषदेचा “महामंदिर” दिवाळी अंक)
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००.
आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला आहे. गेल्या वर्षी पद्मनाभ स्वामी मंदिरात जाण्याचा योग आला होता. पण तिथला अनुभव अत्यंत वाईट होता. मंदिरानी आखून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यावरही येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे चोर किंवा गुंड म्हणूनच गणल्या जाते. वृध्द आणि अपंगाची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. शेवटी देव तो अंतरात नांदती याच भावनानी परत तिथे कधीही न जाण्याचा निर्णय घेऊन आम्ही परतलो.