“सणासुदीचा सुगंध ओला
आली आनंदमय दिवाळी
चौखुर स्नेह मीलनानी
साजरी होत असे दिवाळी”
सण दिवाळीचा मोठा नाही कशाचाच तोटा, मग कोणी धनवान असो वा कोणी झोपडीत वसो. वसुबारस – धनत्रयोदशी – यम दीपदान – लक्ष्मी पूजन, चोपडी पूजन – पाडवा – भाऊबीज इतके सारे त्यौहार एकाच सणात घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळीचा सण मग त्याच्या स्वागताची तयारीही तितकीच साजेशी करायला हवी ना ? अन जो तो त्याच्या परिने करतोच.
मी जन्मापासूनच कोकणात रहाणारा आहे .पण सध्या फ्लॅट संस्कृतीमधे वास्तव्य असल्यामुळे कोकणातली दिवाळी प्रकर्षाने आठवतेय. घर, घराभोवतीचे मोठे अंगण, आवार त्यामुळे सर्वप्रथम आवारात वाढलेले गवत साफ करून घेणे अशा बेणण्यांनी शुभारंभ व्हायचा. मग घराची स्वच्छता. घराचा कानाकोपरा साफसूफ करायचा. पावसाळ्यापूर्वी बंदिस्तीसाठी लावलेले खिडक्यांवरचे फ्लास्टीक काढून टाकायचे .त्याच्या आतली जळमटं काढून टाकायची. अशी साफसफाई झाली की आपोआपच वर्षभर मनांत साचून राहिलेली जळमटं सुद्धा निघून जायची अन आनंदाने सणाच्या पुढच्या तयारीला लागायचो.
शेजाऱ्याच्या गोठ्यातून टोपलीभर शेण आणायचं. समोरचं अंगण सारवणे, त्यावर पांढरी रांगोळी काढून मंगलमय वातावरणाची तयारी करायचो. मागच्या वर्षीच्या पणत्या, विद्युत माळा, आकाश कंदिलाचा बांबूच्या कामट्यांचा सांगाडा हे सर्व ठेवलेला पेटारा बाहेर काढून पणत्या स्वच्छ करायच्या. माळेत जीव जीवंत आहे का तपासून पहायचं. अन मग ती माळ लावण्यायोग्य करून ठेवायची. हे सर्व झाले की राक्षस शोधायला बाहेर पडायचो .आसपास वेलींवर लटकलेली कारेटी तोडून आणायचो, हो नरकासुराचा वध आपल्या टाचेखाली करायला हवा ना! कारेटं हे फळ त्याचं प्रतिक म्हणून आणायचं. खरा राक्षस ठार मारायची काय टाप होती हो आमच्यात ? पण टाचेखाली टचकन ठेचून राक्षस ठार मारल्याचं समाधान काय मिळायचं हो! काय वर्णावं जणूं राक्षसच ठार मारलाय हा अविर्भाव असायचा. आपल्याला कारेटंच बरं म्हणून ती फळं जमवायचो.
अशी ही सगळी प्राथमिक तयारी झाली की, नाही आनंदाला तोटा अशा सणाच्या पहिल्याच दिवशी सकाळी फटाक्यांच्या दुकानात काही पैशांचे फटाके विकत आणायचो (आता पाच हजार रुपयांचे फटाके जरी आणले तरी दिवाळी सण संपायच्या आतच संपतात) अन मुलांना वाटणी करून द्यायचो. रोज वाजवायचे फटाके रोज उन्हात तापवायचो म्हणजे रात्री फाड फाड फटाक ठॉक असे वाजायचे.
घरात फराळ बनवण्याची तयारी सुरू असताना इकडे माळा लावणे कामट्यांचा कंदिल तयार करणे ही लगबग सुरू व्हायची. पणतीसाठी तेल – वाती बाजूला काढून ठेवायचो अन प्रत्येक पणतीच्या खाली शेणाचा छोटा गोळा ठेवावयचो मगच त्यावर पणती. अंगणभर प्रकाश पडेल असा पणत्यांचा मंद प्रकाश, विद्युत माळांची झकमक, आकाश कंदिलातून बाहेर पडणारा पिवळा हिरवा निळा पांढरा मंद प्रकाश ……. मन प्रसन्न व्हायचं. रोज येणारा तो तो सण प्रथेप्रमाणे संस्कृती प्रमाणे ऐपती प्रमाणे साजरा करण्यासाठी मनाची अन खिशाची तयारी करायचो अन दिवाळी सण अत्यंत उत्साहानी आनंदानी साजरा करायचो.
आजही दिवाळी सणाचा आनंद असतोच पण बहुदा सारी कृत्रिम तयारी व रेडिमेड वस्तुंवर भागवतो त्यामुळे तयारीची पुर्वीची जी मजा असायची ती कुठतरी या नव पिढीत नव जीवनात हरवलेय याची रुखरूख मात्र वाटते. चालायचंच, बदलत्या परिस्थिती प्रमाणे बदलणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. हो ना ?
— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800