Tuesday, July 1, 2025
Homeसंस्कृती"दिवाळी माहात्म्य"

“दिवाळी माहात्म्य”

दीपावली पाडवा

बळी प्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा .हा दिवस विक्रम संवताचा प्रारंभ दिन म्हणून स्मरला जातो .अर्थात हा दिवस शेतकऱ्यांचा कैवारी असलेला राजा बळीचा गौरव दिनही आहे .

बळीराजाच्या औदार्य व त्याग वृत्तीच्या अनेक कथा भारत वर्षात प्रसारित आहेत. दिवाळीतील पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदेला बळीराजाची पूजा करतात. ‘बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना करतात.

ओणम् हा केरळ प्रांतातील प्रमुख सण आहे. या उत्सवात प्राचीन वैभवशाली बळीराजाच्या साम्राज्याचे स्मरण स्थापन केलें. तो उत्तम प्रजापालक होता. त्याच्या राज्यात सदैव सुख समृद्धी नांदत होती ; त्यामुळे प्रजेला सुख शांति मिळाली. प्रजा आनंदी झाली व राजाचे गुणगान करू लागली. केरळमध्ये अशा अनेक कथा लोकमानसांत सांगितल्या जातात.बळी राजावर केरळी लोकांची मोठी श्रद्धा आहे.

ते बळीराजाचे राज्य आदर्श असे मानतात. एका केरळी कवीने त्याच्या राजाचे सुरेख वर्णन केलें आहे. तो म्हणतो, “जेव्हा महाबली राजा राज्य करीत होता, तेव्हा सर्व माणसे समान होती. राज्यात चोरी नव्हती .कपट नव्हते, लोक तिळाएवढे खोटे बोलत नव्हते”. बळीच्या अशा अनेक गुणामुळे त्याच्या श्रम सुसंस्कार व सहजीवनाच्या संस्कारामुळे तो लोकात लोकप्रिय आहे .तसेच या दिवशी बळी आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो, आपले दुःख त्याला दिसू नये म्हणून प्रजा उत्सव साजरा करते आणि प्रजा सुखी आहे असे पासून तो आनंदाने परत जातो, अशीही समजूत आहे.

बळी राजा हा कृषी संस्कृतीचा संस्थापक आहे. रंजलेल्या कष्टकरी लोकांना एकत्र करून त्याने रानटी जीवन नष्ट केले व स्थिर जीवन देणारी कृषी संस्कृती बळीराजाने स्थापन केली म्हणून इडा पिडा संकटं टळून बळीचे सुख समाधानी राज्य येऊ दे अशी प्रार्थना सर्व जण करत.

दिवाळी पाडव्यादिवशी तांदळांनी बळीची आकृती काढली जाते किंवा राजा बळीचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया, पुरूषांना ओवाळताना ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणतात. यावरून प्रजेच्या मनातील त्याच्या विषयीचा आदर स्पष्ट होतो. एकूणच महान चक्रवर्ती राजा बळी याचं आज पुण्यस्मरण! त्यासाठी त्यांना त्रिवार वंदन !

काही परंपरेनुसार ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ म्हणून घरातील पुरूषांना ओवाळतात. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते, असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे. आज जसे भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख जोतीबा, मल्हार व मरतड हे सुरक्षा अधिकारी होत, अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती, हे लक्षात येईल. अशा सुखी व संपन्न राज्यावर नेहमीच परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असत.

दिवाळी पाडवा हा हिंदू परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस पवित्र मुहूर्तातील एक शुभमुहूर्त मानला जातो . या दिवशी सोने, चांदे इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाण्याची परंपरा आहे. व्यापाऱ्यांसाठी हा नवीन आर्थिक वर्षाचा दिन आहे. दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. उत्तम अर्थप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

व्यापारी वर्षाचा प्रारंभास शुभ आशीर्वाद प्राप्ती व्हावी म्हणून व्यापारी ग्रामदेवतेचे पूजन परंपरेने व्यापारी वर्ग करीत असतात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने मातेने भगवान महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे. विक्रमादित्य राजाची पूजा करण्याची परंपरा काही ठिकाणी आहे.

पाडवा हा पती-पत्नी नाते दिन आहे. पहाटे पत्नी पतीस अभ्यंगस्नान घालते. त्यानंतर ओवाळते व त्याला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते.

उभयतां एकमेकांस भेटवस्तू अलंकार देतात. मिष्टांन्नांचे एकत्र सेवन केले जाते. बलिप्रतिपदा या तिथीला नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळसण म्हणतात. दिवाळी पाडव्याला पत्नीच्या माहेरकडील मंडळी जावयाला आपल्या घरी निमंत्रित करतात. पत्नी आपल्या पतीला तेलाने मालीश करते. त्यानंतर स्नान घालून त्याचे औक्षण करते. त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घालतात. त्यानंतर सासरच्या मंडळीकडून सन्मानार्थ भेटवस्तू पोशाख इ.दिला जातो.
कुटुंब व्यवस्थेतील पती-पत्नी नाते हे शिवपार्वती सारखे सदृढ नाते असावे. शिवाने आपल्या पत्नीस नेहमीच सन्मानाचे स्थान दिले आहे, त्याची आठवण या दिवशी काढली जाते. कुटुंब व्यवस्थेतील पती-पत्नी नाते आधारवड आहे. अशा प्रकारचे नातेबंध दृढ होण्यासाठी आपल्या सणांमध्ये अशा जागा निर्माण केलेल्या असाव्यात. अशा अनेक बाजूंनी दिवाळी पाडवा या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

— लेखन : राजेंद्र गुरव. औंध
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील