Tuesday, December 3, 2024
Homeलेखदुबईत भेटलेले पु.ल.!

दुबईत भेटलेले पु.ल.!

आज 8 नोव्हेंबर.पुलं चा वाढदिवस.त्यानिमित्ताने पुलंनी दुबईच्या महाराष्ट्र मंडळात 1982 साली कथा कथनाच्या रूपाने पहिला परदेश दौरा केला. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांचा सहवास लाभला. आज त्या आठवणी ताज्या झाल्या !

दुबई च्या एअरपोर्ट समोर त्यावेळचे दुबई इंटरनॅशनल हॉटेल चे भव्य सभागृह दुबई महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांनी खच्च भरले होते. सर्वांना उत्सुकता होती ती महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांना डोळे भरून पाहण्याची. आता पर्यंत पुस्तकातून भेटलेले पुल प्रत्यक्ष भेटणार होते. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या कार्यक्रमातून ते आपल्या काही कथा साभिनय सादर करणार होते. या आधी पुलंना वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ या सारख्या प्रयोगातून बघितलेले ही काही भाग्यवंत मंडळात होतेच. त्यांच्या कडून पुलं बद्दल खूप काही कौतुकास्पद गौरव उदगार कानी आले होतेच. पण आज मात्र मंडळाचे पदाधिकारी कॉलर ताठ करून फिरत होते. त्याला कारणही तसेच होते. मंडळाच्या आठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतातून एका नामवंत कलाकाराला आमंत्रित करण्यात आले होते आणि तो कलाकार सर्वांचे आवडते पुलं असावे हा एक सुंदर योगायोग होता. तत्पूर्वी मंडळाचे कार्यक्रम हे स्थानिक कलाकारांचे नाटक, गणेशोत्सव,वार्षिक सहल यापुरते मर्यादित असायचे. पण यावर्षी पुलं ना आमंत्रित करून मंडळाने एका नवीन पर्वाला सुरुवात केली होती. त्या पर्वाचे साक्षीदार होण्याचे भाग्य ज्या सभासदांना लाभले ते हा क्षण डोळ्यात साठवून आयुष्यभर आठवण म्हणून जपून ठेवणार होते. (पुलं च्या ‘चित्रमय पुलं’या पुस्तकात पुलं च्या दुबईतील पहिल्या वहिल्या परदेश दौऱ्याच्या पोस्टर चा फोटो अंतर्भूत केला आहे.)

कार्यक्रमाला सुरुवात झाली.सुरुवातीलाच सांगण्यात आले की ‘जर कोणी हा कार्यक्रम रेकॉर्ड करताना आढळला तर कार्यक्रम थांबवण्यात येईल व टेपरेकॉर्डर जप्त करण्यात येईल.’उपस्थित या अनाउन्समेंट चा अर्थ लावत असतानाच कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली. पुढचे दोन अडीच तास सभागृह हशा टाळ्यांनी एवढे दणाणून गेले की मघासच्या अनाऊन्समेंट चा सर्वांना विसर पडला.
कार्यक्रम पार पडल्यावर पुलं पण खुश होते. आखाती देशातील त्यांचा पहिलाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्रेक्षकांच्या गराड्यात असताना कोणीतरी मघासच्या अनाउनसमेंट विषयी विचारले, तेव्हा पुलं म्हणाले, अहो, त्याचे काय आहे, कधीतरी अशा कार्यक्रमात बोलण्याच्या नादात विनोदाने एखादया नेत्याविषयी विनोद म्हणून काहीतरी बोलले जाते. ते तेवढ्या पुरतेच घ्यायचे असते. पण काही जण असे कार्यक्रम रेकॉर्ड करून त्या नेत्यापर्यंत पोहोचवतात, पुलं तुमच्या बद्दल जाहीरपणे असे बोलतात. असे सांगून कान भरले जातात. मग तो नेता नाराज होतो म्हणून मला अशी काळजी घ्यावी लागते. पुलं च्या या खुलाशाने मात्र या सभासदांचे समाधान झाले आणि पुढील आठ दिवसांचा पुलं चा दुबई मुक्काम दिलखुलास होणार याची खात्री पटली. पण यात आणखी एका आनंदाची अचानक भर पडणार आहे याची कोणाला कल्पना होती ?

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सतवा च्या दुबई प्लाझा हॉटेल मध्ये पुलं चा पेटीवादनाचा आणि सभासदां सोबत गप्पांचा प्रोग्राम ठरला होता. पण त्यावेळी मिळालेल्या पेटीचे आणि पुलंचे सूर काही जुळले नाहीत. म्हणून पेटी बाजूला सारून पुलं गप्पा मारायला बाह्या सरसावून बसले. तेवढ्यात तिथे त्याकाळच्या रेडिओवरचे बादशाह, निवेदक अमीन सयानी यांचे आगमन झाले. त्याचे झाले असे की रेडिओ च्या काही कामानिमित्त अमिनजी शारजा ला होते. त्यांना पुलं दुबईत असल्याचे समजल्यावर ते पुलं ना भेटायला आले होते. दोघांची दिल्लीत ऑल इंडिया रेडिओ पासून ची ओळख होती. पुलं त्यांना सिनियर म्हणून पुलं ना ते ‘दादा’म्हणत होते. मग तेही पुलंच्या बाजूला मांडी घालून बसले आणि दोघांच्या अनौपचारिक गप्पांना सुरुवात झाली. साक्षीदार होतो आम्ही.हातात माईक येताच अमीन भाईंनी पुलं ना काहीतरी प्रश्न विचारताच पुलं पटकन हात जोडत म्हणाले, “ए बाबा, मेरा interview वगैरे मत लेना !

हसत हसत अमिनभाई म्हणाले, “खैर, दादा अब तो छोड देता हुं, लेकिन इंडिया मे मिले तो नही छोडुंगा ! मग थोडा वेळ गप्पा मारून ते निघून गेले. त्यानंतर मात्र पुलंचे सभासदांच्या घरी जेवणाचे वार लागले. रोज कोणा ना कोणाकडे तरी आमंत्रण असायचे. जेवणा बरोबर गप्पांचा फड पण रंगायचा.
एकदा एकाकडे असाच जेवणाचा बेत ठरला होता. पुलं वेळेवर हजर होते.गप्पा सुरूच होत्या. पण जेवणाची टळून चालली होती.कोणीतरी यजमानांना जेवणाची आठवण करून दिल्यावर ते म्हणाले, ‘एक मित्र येणार होते त्यांची वाट पाहतोय. ‘पुलं पटकन मिश्कीलपणे म्हणाले, ‘मलाच जेवायला बोलावलंय ना ? त्या प्रश्नातच यजमानांना काय समजायचे ते समजले.
एकेदिवशी पुलं च्या प्रकाशकाचे एक स्नेही पुलं ना भेटायला आले आणि घरी चलण्याची गळ घालू लागले. बोलता बोलता पुलं ना म्हणाले, “माझ्याकडे B & O ची म्युझिक सिस्टिम आहे, त्यावर तुम्हाला कुमारांचे गाणे ऐकवतो. कुमारांचे गाणे कोळून प्यालेले पुलं म्हणाले “अहो, गाणे जर समजत असेल तर साध्या टेपरेकॉर्डर वर देखील चांगले वाटते. त्यासाठी म्युझिक सिस्टिम च कशाला हवी ? असे बोलून पुलं नि त्याला कसेबसे (पि)टाळले.
पुलं च्या सहवासातले ते दिवस हा हा म्हणता सरले. जाताना मंडळाच्या अध्यक्षांनी मानधनाची ठरलेली बिदागी म्हणून 1001 दिरहाम चे पाकीट पुलं च्या हातात ठेवले. पुलं नी ते बघितले आणि अध्यक्षांना म्हणाले, “तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी मानधन 1001 रुपये असे सांगितले होते. दिरहाम नाही. (त्यावेळी 1 दिरहाम ला 2 रुपये असा exchange rate होता.)

अध्यक्षांनी नम्रपणे सांगितले की हो आम्हाला माहीत आहे पण आम्ही आनंदाने ही बिदागी तुम्हाला देतोय. सांगितलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम मिळत असतांना पुलंचा हा सालस प्रामाणिकपणा सर्वाना स्पर्शून गेला.
दुबईहून गेल्यानंतर काही दिवसांनी पुलं चे पत्र आले त्यात सर्वांचे आभार मानत असताना पुलंनी लिहिले होते की, “लहानपणी आयुष्यात वारावर जेवायची वेळ कधीच आली नव्हती ती पाळी दुबईत आली आणि तेव्हा प्रत्येक भगिनींच्या घरी जेवायला जाताना भाऊबीज असल्यासारखे वाटत होते.”

एका घरी गप्पा मारताना पुलं असेच सहज म्हणाले होते.तुम्ही वसंतराव देशपांडेंना बोलवा. मी त्यांच्या बरोबर पेटी वाजवायला येईन. सर्वांना ही कल्पना पसंत पडली होती. पण हे होणे नव्हते. पुढच्याच वर्षी वसंतराव गेले अन कल्पना पोरकी झाली. शेवटी प्रत्येक कार्यक्रमाचे पण नशीब असते !
असाच एक कार्यक्रम पुलं च्या पंचाहत्तरी निम्मित दुबईत करायचा ठरला. नावही पुलंना साजेसेच दिले गेले “पुलंदाजी”.

पुलंच्या साहित्यावर कार्यक्रम करायला त्यांनीही आनंदाने परवानगी दिली. कार्यक्रमा नंतर ठरलेले मानधन द्यायला मित्र त्यांच्याघरी गेला. त्या दिवशी तारीख होती 6 डिसेंबर (बाबरी मशीद घटनेचा दिवस). बोलता बोलता पुलंना त्या तारखेची आठवण होऊन ते सुनीताबाई ना म्हणाले, ‘अगं, आज त्या बाबरी मशिद चा वाढदिवस ना ? सुनीताबाई ना त्या घटनेचा वाढदिवस हा उल्लेख आवडला नाही. तसे त्यांनी म्हणताच पुलं पटकन म्हणाले, “ठीक आहे, वाढदिवस नाही तर ‘पाडदिवस’ म्हण हवे तर.😀
त्या वयातही पार्किन्सन्स च्या आजाराने ग्रासलेल्या पुलंची विनोदबुद्दी, हजरजबाबी पणा शाबीत राहिला होता.
पुलं च्या सुरुवातीच्या काळातील पुस्तकांवर पारल्यातील घराचा अजमल रोड असा पत्ता असे. यानंतर पुण्याला गेल्यावर 777 रुपाली असा झाला आणि नंतर मालती माधव. घर बदलत गेले तसे त्यांचे पत्तेही बदलत गेले पण पत्याचा धनी मात्र एकच होता. ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ !
आता चौवीस वर्षें झाली ह्या धन्याचा पत्ता बदलून पण पत्त्याचा धनी आमच्या मनात कायमचा घर करून बसलाय.

प्रशांत कुळकर्णी

— लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण : २६
Dr.Satish Shirsath on पुस्तक परिचय
सौ. शिवानी श्याम मिसाळ. on कदरकर काकू : चैतन्याचा झरा
वासंती खाडिलकर, नासिक on कदरकर काकू : चैतन्याचा झरा
गोविंद पाटील on शब्दात येत नाही