Friday, May 9, 2025
Homeसाहित्यजगण्याचेही झाले ओझे !

जगण्याचेही झाले ओझे !

जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||धृ||

दुर्बलतेचे बळकट धागे
जडती जिवाला पुढती मागे
धुगधुगलेपण तरिही जागे
मरगळलेल्या धमन्यांमधुनी, कोठे उरले रक्तच ताजे?
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||१||

श्वास बिचारे येती जाती
उरलेच काय त्यांच्या हाती ?
उदास जळती फिक्कट वाती
धकधक देता थाप हृदय ते, धाप शरीरी आता निपजे !
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||२||

स्वप्ने झाली केविलवाणी
पोतेऱ्याची दशा जीवनी
तुच्छपणाच्या भरल्या गोणी
ढोर पडावे मरून कुजके, तसले माथी भाग्य विराजे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||३||

आकांक्षांची झाली माती
आठवणींच्या चिंध्या हाती
एकांताची स्मशानभीती
प्राण पाहतो अता उडाया, बंद घराचे परि दरवाजे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||४||

उरलीसुरली आशा सरली
नैराश्याने झोळी भरली
परावलंबी काया उरली
उठता बसता आधाराला, चाचपती कर दोन्ही माझे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||५||

विझता अग्नी फुंकरून का
तगवित जाणे, असे योग्य का?
व्यर्थ परिश्रम, नाहक हेका
हीच प्रार्थना, श्रवणी यावे, आयुष्याचे भरतवाक्य जे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! || ६||

— रचना : डाॅ. श्रीनिवास आठल्ये. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. सरत्या आयुष्यावर खूप छान रचना केली आहे सर👌👌👌👌

  2. जगण्याचेही झाले ओझे ही कविता वाचनीय आणि अर्थपूर्ण आहे.

  3. आशयघन कविता आहे आठल्येसर

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास