सकाळीच लवकर ऊठून फिरायला बाहेर पडायची माझी जुनीच संवय आहे. शांत व निस्तब्ध वातावरणात निसर्ग समजून घेत लांबवर फेरफटका मारत आपल्यासाठीच निसर्ग कसा आहे हे ध्यानात घेता येईल तितकं समजून घ्यायचं.
खरं तर मी निसर्गाच्या प्रेमापेक्षा मायेत गुंतत गेले आहे. अगदी जवळच्या आप्तस्वकियाच्या मायेत गुंतून जातो ना ! तसेच.
निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात तर सारखीच पडते. पण ते तेवढ्यापुरेसेच.
या मायेमुळे निसर्गातले बदल मी चटकन् टिपते.
सध्या अगदी सकाळी हे शरद ऋतूतील निळे स्वच्छ निरभ्र आभाळ निरखत जायला फार मजा येते. संपला तो नकोसा झालेला पाऊस.
पण पंधरा दिवसात वातावरण शुष्क होतंयची जाणिव होते. झाडाझुडपांची पाने हळदकूंकवासारखी लाल पिवळी होऊ लागतात. वारा सुटल्यावर पानांची सळसळ मनाला गुदगुल्या करते.
हे बोचरे वारे अंगावर गारठ्याची शिरशिरी आणू लागतात.
अंगणात पडणारे मोती पोवळ्यांचे सडे प्राजक्त आवरून घ्यायला लागतो, तर जाई जुई कूंद मोगराही सुकायला लागतात. काही वृक्ष पाने गाळतात. झाडे फुला पाना विना केविलवाणी होतात. पक्षांचेही कंठ गोठायला लागतात किलबिलाट शांत होऊ लागतो.
या अशा वातावरणामुळे मनातही ऊदासपणा, निराशा दाटायला लागते.सकाळ ऊशीरा ऊजाडते तर संध्याकाळ लवकरच होते. सूर्यबिंबाची प्रखरता कमी होते व झांकोळलेले वाटते.
काही दिवस हे असे शरदाचे प्रसन्न असे पहिले दिवस तर नंतर शुष्क व गारठलेले शिशिराचे दिवस असलेतरी काही निष्पर्ण वृक्ष व लालपिवळी पाने झालेल्या तरूवेली, छान दाट धुके पहाटे खाली तरंगत येणारे रूपेरी दंवबिंदू ,सुवर्णाचा साज घेऊन येणारे सोनेरी कोवळे ऊन ह्या सर्वांनी निसर्ग सुंदरच दिसतो.
या रूपाच्या प्रेमात पडतोय तोच हळुच नवतीची लाल पालवी तरूवेलींवर बाळाच्या जावळासारखी लवलवू लागते.
गिरक्या घेत सुकलेली पाने खाली येतात. तरूतळी ढीग साठतो.
हा निसर्ग किटक पक्षांना या पानांच्या ढिगाखाली थंडीपासुन इतके दिवस जगवतो. अन्नपाणी पुरवतो.
झाडातलं पाणी वाचवून तीही जगवतो.
आणि शरद व शिशीर संपतात.
पानापानातुन लवलवणारी लाल पालवी वाढू लागते हळूहळू हिरवी होत. सुर्यप्रकाशाशी मैत्री करते.
आम्रवृक्षावर मोहोर आलाय हे सांगत कोकीळ पंचमात गायला लागतो. सुरंगी, मोह, कूडा आंबा यांच्या मोहोराच्या वासाने सृष्टी आनंदुन जाते.
जंगलात निष्पर्ण काटेसावरीवर पळसावर लाल फुले लगडली कि फार सुंदर दिसतात.
कॅशिया, जाकरांदा इ. फुलोरे बहरून येतात. रानात आणि हल्ली आमच्या शहरी रस्त्यांवर सुद्धा गुलाबी, पिवळे, जांभळे पांढरे फुलोरे फूलून येतात व ते निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात भरुन ठेवावेसे वाटते.
हळूहळू जाई जुई कण्हेरी अबोली निशीगंध रातराणी ही सुगंध व बहर यांनी वेडी करतात.
हेच निसर्गाचे रूप ऋतू राज वसंत आल्याची वर्दी देतो.
हळूहळू वसंत रंगात येऊन निसर्गाची रंगपंचमी चालू होते.
सोन चांफा फुलांचा राजा असल्यासारखा तोर्यात सुगंध व पिवळा रंग घेऊनच पुढे येतो. पाठोपाठ वसंत आम्र वृक्षावर हिरव्या कैर्यांची तोरणे लटकवतो.
अबोली पिवळे अननस पपया झाडावर पिकू लागतात. काळी मैना म्हणवत करवंदे जांभळी जांभळे झाडावर गर्दी करतात.
आकाशाचा निळा रंग गडद होतो.
रानात फुलांचे व बागात फळांचे रंग डोळ्याचे पारणेच फेडतात.
शेवटी आम्रफळांची पालखी घेऊन वसंत निरोप घेऊ लागतो.
खरंच आंब्याचे देणं दिलं. …. फणस अननस खाऊन झाले कि वसंत संपला असंच वाटतं.
नारळ, फणस आंबे पपया चिकू व जांभळे ऊतरवली किआधी फळे अंगाखांद्यावर घेऊन लगडलेली लेकुरवाळी झाडे केविलवाणी दिसू लागतात.
हिरवाई नाहीशी होते. इतक्यात माझे लक्ष असणार्या वाटेवरच्या बहाव्याला मूठभर आकाराचे छोटेसे बाळ लोलक डोकावताना दिसतात व ग्रिष्म आल्याची वर्दी देतात. चारच दिवसात अंगभर सार्या दुनियेचा पिवळा हळदीरंग माखुन सुवर्णलोलक डुलायला लागतात. हे बहाव्याचे वैभव बघण्यासारखेच असते.
ऊन्हाचा तडाखा, सहन न होणारा दिवसाचा प्रकाश, कोरडी सुकत जाणारे वृक्षांचे वैभव यात सगळेच होरपळून निघतात.
मातीत या ऊन्हामुळे रोगिष्ट किटक, घातक जीवजंतू, झाडाची जुनी पाळंमुळं जाळली जातात.
पाने सुकून खाली गरगरत येतात व मातीत मिसळून खत होते.
काहीच दिवसात बहावा सुकतो व गुलमोहर कुंकू ऊधळत येतो तो वर्षा येणार हे सांगतच.
पानागणिक लालंम लाल फुलोरे फूलू लागतात.
बहाव्याच्याची व गुलमोहोराची झाडे ऊंची, डेरेदारपणा, लोलक, झुंबरांसारखी येणारी पिवळी व लाल फुले आणि रस्तोरस्ती पडणारे सडे यामुळे ही दोन्ही झाडे फार देखणी व रूबाबदार दिसतात.
मन मोहुन जाते व मनात सांठवून घ्यावीशी वाटतात.
आता वर्षा नाचत खेळत, गरजत बरसत येईल.
सुकलेल्या पानाफुलांचे खत, अन्नब्रम्हाच्या वाढीला ऊपयोगी होईल.
तापलेल्या मातीत ही वर्षा लक्ष लक्ष बीज अंकूरत राहिल व सृष्टी अन्नब्रम्हाच्या पूजेला बसेल.
हा निसर्ग म्हणजेच साक्षात ब्रम्हांडच.
प्रत्येक सजीवाचा एक कणभर का होईना पण ब्रम्हांड म्हणजेच निसर्ग हा अंश असतो.
तो प्रत्येक सजीव जगेल या जिवनसांखळीत तरेल वाचेल याची काळजी घेतो.
जे आहे ते ब्रम्हांडाचं…. माझं मीपणाचं असं काही नसतेच. म्हणून माझं न म्हणता जे आहे ते पुरेसे झाले कि …’इदं न मम !’ हे निसर्गच शिकवतो. नाहीतर इतरांना काही मिळणार नाही.
ऊपयोग झाल्यावर जुने टाकायचे… त्याग करायला निसर्गच शिकवतो.त्याशिवाय नवे कसे स्विकारणार ?
शरद आल्हाददायक वाटतो तर जूने त्यागुन नव्याची तयारी करणारा शिशीर नकोसा होतो.
वसंत रंगपंचमी खेळतो. फळाफुलांची लयलूट करतो तर ग्रिष्म ऊन्हाचा तडाखा वाढवून वर्षेच्या आधीची अन्नब्रम्हाची मशागत करतो.
वर्षा सृष्टीला सचैल भिजवत हिरवाई देईल. शेतात बाळरोपे वार्यापावसाबरोबर डुलतील. बाळरोपांचा गंध नाकात शिरेल . गवत चारा कडबा मिळून पशुपक्षांची दिवाळी होईल.
फुलं पुन्हा बहरून श्रावण साजरा होईल. थोडा विसंबलेला वारकर्यांची पावले पंढरीच्या वाटेवर धावतात. गणराय गौरी वाजत गाजत आंनद घेऊन येतील.
मग वर्षा संपेल आणि बाळरोपे मोठी होतील त्यात मोतीदाणे भरतील व ते पिकायला हेमंतीवातावरण येईल हा ऋतू शेतातलं धान्य घरात आणणारा म्हणुन बळीराजाचा मित्रच आहे. आनंदलेल्या शेतकरी, पशूपक्षी, सजीव या हेमंतात सृष्टीच्या हिरव्या सौंदर्याने व ऊन पावसाच्या खेळात मजा घेत असतात.
ऋतू हे निसर्गाचे नियोजन करत सजीवसांखळी जगवत असतात. हे कार्य आज युगे न् युगे विना तक्रार चालू आहे.
आभाळ, पृथ्वी जल वायू आणि तेज हे एक भव्यदिव्य असं नातं आहे. आपण त्यांचाच एक अंश असल्याने सगळे सगेसोयरे आहोत.
निसर्गाची शिकवण समजुन घ्यायला, तो सृष्टीचे नखरे नट्टा पट्टा कसा हौसेने पुरवतो, बदल कसे घडवतो, बदल चांगलेच कसे असतात ?, जूने त्यागायची व नवे स्विकारायची तयारी कशी हवी हे समजुन घेतले तर आपण क्षणात त्याचे ऋणी होऊ.
हे ऋतूंचे सोहाळे आपल्यासाठीच असतात. मात्र हे जाणवायला आपली नजर मात्र दर्दीच असायला हवी.
— लेखन : अनुराधा जोशी. अंधेरी, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800