Friday, December 27, 2024
Homeयशकथाछंद माझा वेगळा

छंद माझा वेगळा

“बीज अंकुरे अंकुरे….”

नमस्कार वाचक हो.
एखाद्या इवलाश्या बिजापासून बनलेले रोपटे वाढत जाऊन त्याच्या रंग, रूप, गंधाने पुष्पवनात स्वतःचे वेगळे अलौकिक अस्तित्व दाखवून देते. अलवारपणे आपल्या गुणांनी मनं जिंकून घेते. अगदी शांतपणे कार्य करत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करून स्मरणीय ठरते.

छंद माझा वेगळामध्ये आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वास भेटणार आहोत. ज्यांच्या प्रवासाला शून्यातून सुरुवात होऊन आज यशाच्या शिखराकडे वाटचाल चालू आहे.

आईवडील हाडाचे शेतकरी असल्याने सौ. माधवी संजय माळी यांच्यावर लहानपणापासूनच शेतीचे संस्कार झाले. शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे ताईंना शेतीविषयी – माय मातीविषयी फार जिव्हाळा. शेतीतील फायदा तोटा, निसर्गाची कृपा अवकृपा, कष्ट, खतं, पाणी अशा शेतीविषयीच्या चौफेर गप्पा ऐकत त्यांचे बालपण गेले. सोबतच वेगवेगळी झाडं, वनस्पती, पाना फुलांचीही आवड निर्माण झाली.
कुरुंदवाड हे ताईचे माहेर आणि सासरही. लग्नानंतर सुखी संसाराच्या पथावर चालताना एक छंद म्हणून त्यांनी झाडे लावण्यास, घराभोवतीचा परिसर हिरवागार करण्यास सुरुवात केली.

आजूबाजूच्या रोपवाटिके मधून रोपं आणायची, लावायची त्यांची व्यवस्थित निगा राखायची असे चालूच होते. पण प्रत्येक झाडाची एक वेगळी गरज असते, वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगळे स्वभाव, वेगळे शास्त्र असते हे त्यावेळी त्यांना माहित नव्हते. तंत्रज्ञान युगातील भ्रमणध्वनीने घरोघरी प्रवेश करण्या अगोदरही माधवीताई पती, मुले नोकरीला, शाळेत गेल्यावर संगणकावर बाग बगिचा विषयक चित्रफित बघत असायच्या. एखादं खत कसं करायचे, कमळ कसे लावायचे, वनस्पतींची काळजी कशी घ्यायची.. इत्यादी. आणि हे सर्व फक्त आवड म्हणूनच चालू होते. काही काळानंतर आपणही त्या सगळ्याचा हिस्सा होणार आहोत हे तेव्हा त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते.

अशीच एक चित्रफीत पाहताना तिथे एका बागेच्या समुहात जाण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक मागितला होता. त्यावेळी भ्रमणध्वनी आल्यानंतर आंतरजालावरती आभासी जग निर्माण होत होते. तेव्हा या आभासी जगावर किती विश्वास ठेवायचा हा एक मोठा प्रश्न असायचा .. तरीही घरच्यांचा विरोध टाळून स्वतःच्या मनाने दिलेला कौल ताईंनी ऐकला आणि त्या समुहात जाण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यांचे वेगळेपण इथेच दिसून येते.. त्यातून पुन्हा महाराष्ट्रातील सदस्यांसाठी असलेल्या समुहात जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या छंदासाठी एक नवीन दालनच खुलं झालं असं म्हणता येईल.

मध्यमवर्गीय कुटुंबातील संसारात, जबाबदाऱ्यात गुंतलेल्या एका गृहिणीची आंतरिक तळमळ होती, मला काहीतरी करून दाखवायचे आहे, माझे नाव जगासमोर आणायचे आहे. घर संसार सांभाळणारी गृहिणी असली तरी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचे आहे.

ताईंची ही इच्छा म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास होता, मनाचा प्रांजळपणा होता. पानांच्या आड दडून जसा हिरवा चाफा सुगंध उधळत राहतो तसेच माधवी ताईंच्या बाबतही वाटते. पुढील गंधित प्रवासाची सुरुवात झाली ती हिरव्या चाफ्यानेच. १९९४ पासून ताईंकडे हिरवा चाफा आहे. जुन्या घरातून नवीन घरी प्रवेश करतानाही त्यांनी अंगणात हिरवा चाफा सोबत आणला होता.
एका बागेच्या समुहातून ओळख झालेले – खामगावचे श्री. मिलिंद काळे सर ( Msc agri ) हिरव्या चाफ्याच्या निरीक्षणाकरिता ताईंकडे आले होते. जसं की प्रत्येक बागप्रेमी एकमेकांना बिया रोपे भेट देतात तसंच सरांनीही मौल्यवान खजिना त्यांना दिला होता. त्यात सगळ्यात महत्त्वाच्या होत्या Australian Butternut Pumpkin च्या बिया.
२०१९ चे साल म्हणजे जवळपास अर्ध्या अधिक महाराष्ट्रासाठी भयानक महापुर. त्यातून कृष्णा, पंचगंगा काठची गावे कशी वाचतील ? ताईंचेही संपूर्ण गाव, घर, बाग आणि त्या अनमोल बियाही पंधरा-वीस दिवस पाण्याखाली होत्या. महापुराच्या वेळी ताईंना राहते घर सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले. पुरामुळे बिया कोणत्या स्थितीत असतील किंवा मुळात त्या टिकतील की नाही याची काहीच कल्पना नव्हती. बाहेर असूनसुद्धा काळजीपोटी घरातल्या ज्या ज्या गोष्टींची वारंवार आठवण येत होती त्यात या बियांचाही समावेश होता.. की काहीतरी अनोखे आपल्या हाती लागले आहे, ते बिलकुल निसटून जाता कामा नये.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरी परत गेल्यावर चिखलगाळाचे पाणी चाळून गाळून त्यांनी त्या भोपळ्यांच्या बियाची पुडी शोधून काढली होती. हा आनंद त्यांच्यासाठी अपूर्वाईचा होता. आकाश ठेंगणं करणारा होता. केवळ बिया ठेवलेली ती खोली एक पायरी खाली असल्यामुळे आणि बिया छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत असल्यामुळे सुरक्षित राहिल्या होत्या. परंतु त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते. महापूराचे ते काळेकुट्ट पाणी तांब्या तांब्याने चाळणीत ओतून, गाळून पहावे लागले होते. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मनात एकच अत्यंत प्रबळ इच्छा, की त्या बिया सापडणार आहेत… सापडणारच आहेत. ही मनाची प्रचंड ताकद, अत्यंत इच्छाशक्ती कामी आली असावी. पुढे या बिया ताईंनी छानपैकी रुजवल्या, वाढवल्या. त्या फुलाफळाला आल्या.

हे सगळं काहीतरी वेगळं आहे. वेगळं काहीतरी घडतंय, असं ताईंना सातत्याने वाटत राहिलं. हे सगळं आपल्याला कुठे तरी नमूद केलं पाहिजे. लोकांसमोर आणलं पाहिजे. या अंत: प्रेरणेतून त्यांनी मधुबन गार्डन हे चॅनल सुरू केलं. मनापासून अभ्यास करण्याची ताईंची वृत्ती, वनस्पतींबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची प्रवृत्ती त्यांना प्रेरित करत होती. तू काहीतरी कर.. नक्की करू शकशील. सुरवातीच्या काळात त्यांचे गुरु श्री. मिलिंद काळे सरांनी खूप मदत केली. चर्चेतून, अभ्यासातून नवनवीन विषय मिळू लागले.
यातून पैसे मिळवणे हा हेतू नसल्याने म्हणा किंवा व्यावसायिक प्रवृत्ती नसल्याने फक्त आवड जोपासणे, आपल्याला आलेल्या समस्या या इतरांना येऊ नयेतं आणि आल्या तर त्यावर काय उपाय करावेत हे इतरांना समजावे या हेतूने चॅनेलची निर्मिती झाली.

सुरुवात झाली ती हिरव्या चाफ्यानेच. पण पुढे काय ? हा प्रश्न त्यावेळी होता.. शिवाय पहिले एक दोन भाग न त्यांनी बोलता केले कारण कसे बोलावे वगैरे काहीच माहिती नव्हती.. पण जशी वाटचाल सुरु झाली तशी पुढची दिशा मिळत गेली. एक एक टप्पा यशस्वीरित्या पार पडत गेला. आता ताईंच्या बोलण्यातला आत्मविश्वास अगदी सहज वेधून घेतो. त्यांच्या विशेष आवडीबद्दल सांगायचं तर, दुर्मिळ होत असलेल्या भाज्यांचे बियाणे मिळवून त्याचा प्रसार करणे, माधवी ताईंना फार आवडते.
जसे की चौधारी शेंगा, काशी टमाटर, झूमके दोडके, अबईच्या शेंगा इ. अनेक गोष्टींची जपणूक त्या करत असतात. इतरांकडूनही दुर्मिळ वनस्पतींचा प्रसार व्हावा म्हणून अगदी माफक दरात त्या बियाणे देत असतात. तसंच बागकामात त्या वेगवेगळे प्रयोगही करत असतात.

मोगऱ्याच्या बिजापासून पासून तयार केलेले रोप तर ताईंच्या प्रयत्नांची यशोगाथा सांगते. न थकता प्रयत्नात सातत्य राखणे किती महत्वाचे आहे ते दाखवते.

अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेला सोनचाफा, ऑस्ट्रेलियन भोपळा, वाळा, मरवा, लाल केळी, लिंबू, रुखाळू, एअर पोटॅटो असे कितीतरी विषय, विविध प्रकारची फुलझाडे तसेच वनौषधी, रानभाज्यांसारखे विषय माधवी ताईंनी यशस्वीपणे हाताळले आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाला ताई भेट देतात आणि जे तिथपर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतात. अशाच एका व्हिडिओपासून प्रेरणा घेऊन एका शाळेत रानभाजी प्रदर्शनाची छोटी प्रतिकृती केली गेली. यांसारखी आनंदाची गोष्ट ती कोणती असेल ? हे एक प्रकारचे समाजप्रबोधनच आहे असे वाटते.
इतरांप्रमाणे बी लावणे एका भागात दाखवायचे आणि नंतर त्याची वाढ चार सहा महिन्यांनी दुसऱ्या भागात दाखवायचे असे ताईंचे नसते. ताईंच्या चॅनेलवरती एकाच भागात त्या वनस्पतीचा पूर्ण प्रवास आपल्याला पाहण्यास मिळतो. बिजापासून बिजापर्यंतचा (From seed to seed) इत्यंभूत तपशील मिळतो. त्यासोबतच करण्यायोग्य असलेल्या भाजीची कृतीही त्या करून दाखवत असतात. थोडक्यात आपल्या बागेतील सेंद्रिय ताज्या भाजीपाल्याची गरमागरम चविष्ट भाजी /आमटी आपली रसना तृप्त करायला ताटात हजर असते. (From garden to table) अतिशय पद्धतीशीरपणे काय करावे आणि काय करू नये हे ताई सांगत असतात.
जुन्या सोबत नव्याचीही सांगड घालणे हे कौतुकास्पद आहे. पांढऱ्या झेंडूची लागवड, लाल केळीची लागवड आणि त्यांचा प्रसार करत नवीन गोष्टींचेही त्या मनापासून स्वागत करतात.

फक्त बी लावणे, रुजवणे आणि चित्रफीत करणे एवढाच ताईंचा उद्देश नाही तर खतांचेही निरनिराळे प्रयोग करून पाहण्यात ताई मनापासून रमतात. फक्त पालपाचोळा वापरून त्यात उत्तमरित्या टोमॅटोचे पीक घेतले आहे.
बागेत पडणाऱ्या पाला पाचोळ्याचा त्या पुरेपूर उपयोग करून घेतात. खाली पडलेली – सुकलेली पाने, फांद्या अजिबात वाया घालवत नाहीत. फेकून द्यायला तो कचरा नसतोच मुळी. त्याचा उपयोग खत तयार करणे, लिफमोल्ड करणे, माती आणि सुकलेल्या – अर्धवट ओल्या पानांपासून अमृत माती बनवतात. ज्याचा उपयोग बागेत केला जातो.

विविध प्रकारचे प्रयोग करून पाहणे म्हणजे आज केले आणि उद्या संपले असे नसते. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम बाळगणे. संयम ठेवून जिद्दीने मनापासून कार्य करत राहणे. तन मन हरून त्यात गुंतून पडल्यानंतरच कुठे अपेक्षित परिणाम दिसून येतात. मनात योजलेले कार्य सफल होते.
सातत्याने प्रयत्न करत राहिल्यावर गवसलेल्या सुंदर मार्गावर चालणे सोपे होऊन जाते.. तरीही कधी कुठल्या अडचणी कशा समोर येतील ते मात्र कोण सांगू शकत नाही.

२०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये ताईंच्या बागेतील कितीतरी झाडे गेली, पुराच्या पाण्यामुळे घराचे बागेचे बरेच नुकसान झाले तरीही त्या डगमगल्या नाहीत. प्रेमळ कुटुंबियांच्या, जिव्हाळ्याचा मित्र परिवार आणि हितचिंतकांच्या साथीने न हारता त्यांनी पुन्हा सुरुवात केली. पण.. बऱ्याचदा असेही होते की एखाद्याची यशस्वी वाटेवर गतिरोधक ही असतात, काही अप -प्रवृत्तीना ते बघवत नाही, खूप खाचखळगे आडवे येऊनही प्रामाणिकपणा आणि मेहनतीत ताई मागे हटणाऱ्या नव्हत्या. म्हणूनच हळूहळू का होईना त्यांना यश मिळतच गेले. कसल्याही अडचणींनी विचलित न होता, त्यांकडे दुर्लक्ष करून चालत राहिले तर जीवन पथ सुलभ होऊन जातो. सुखदुःखात प्रिय कुटुंबीय सोबत असतातच. पण एक व्यक्ती तनमन अर्पून साथ देत असते .. अगदी घट्ट हात धरून.. विश्वास देत असते .. बळ देते आणि हेच ते रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन अजून एक श्रेष्ठ नाते असते ते म्हणजे मैत्रीचे नाते.

माधवी ताईंची मैत्रीण नाशिकच्या सौ. ललिता सानप या अगदी खंबीरपणे ताईंसोबत असतात. त्यांनी माधवी ताईंचे कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रयत्न पाहिले आहेत. त्यांचा हा मैत्रबंध अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे.
माधवी ताई आणि ललिता ताईंचे मैत्रीचे हे अलौकिक नाते दिवसेंदिवस दृढ होत राहील याची खात्री आहे.
ललितासारख्याच अजून खूप साऱ्या मैत्रीणी नेहमीच त्यांच्या सोबत आहेत. तसेच या प्रवासात प्रद्युम्नजी पंडित सर, दिनकरजी पेठे सर अशी अनेक बागप्रेमी मंडळी भेटत गेली. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर सर यांसारखे तज्ञ परिचित आहेत.

ध्येयावर नजर ठेवून माधवी ताईंचा सखोल अभ्यास करण्याची वृत्तीच त्यांना दिशादर्शक ठरली. हळूहळू त्यांचे बागेविषयीचे प्रचंड ज्ञान उमगत गेले. रोजच्या रोज कुठल्या तरी बिया पेरल्याशिवाय, एखादे रोप लावल्याशिवाय म्हणजेच मातीत हात घातल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. ही फक्त झाडांची आवड किंवा छंद नाही, तर उत्कट आवड आहे आहे असे वाटते.
बागेविषयी, झाडांविषयी कोणताही प्रश्न असला तरी त्याचे उत्तर ताईकडे असते.
मनाला भावणारी गोष्ट म्हणजे ज्याला जी माहिती हवी आहे ती अगदी मनापासून त्या सांगतात काहीही हातचं न राखता.

ताईंकडे पाहताना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते याचीच प्रचिती येत असते.

एक सर्वसाधारण गृहिणी काय करू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सौ. माधवी माळी. माधवी ताई फक्त नावानेच माळी नाहीत तर त्यांनी त्यांच्या कार्याने, जिद्दीने, कष्टाच्या तयारीने, करून दाखणारच अशा हट्टामुळे, माय मातीवरील प्रेमामुळे माळी हे नाव सार्थ करून दाखवले आहे.
शेती हा गुण ताईंच्या रक्तातच असल्यामुळे त्यांचे मातीवरचे प्रेम नेहमी वृद्धिंगतच होत राहिले. निर्मळ मनाने केलेल्या प्रेमाची पावती म्हणूनच जणू की काय माय मातीनेही ताईंची ओंजळ सौख्याने भरून दिली.
ताईंच्या मधुबन या यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सर्व बाग प्रेमींना जी अपूर्व माहिती मिळते ती खरंच परिपूर्ण असते.

ताईंचा हा मोहक प्रवास नेहमी असाचं फुलपाखरांसारखा रंगीबेरंगी होत जावो. मधुमोहक सुमनांसारखा बहरत, गंध पखरण करत नभांगणी पोहचत राहो हीच अपेक्षा.

मनिषा पाटील

— लेखन : सौ. मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. खुप छान लेख मधुबन चा प्रवास मांडलात जसे बीज अंकुरण्या पासून त्याचे डेरेदार वृक्ष होण्यापर्यंत चा प्रवास म्हणावा लागेल . या मागे त्यांची प्रबळ इच्छाशक्ती व प्रामाणिक प्रयत्न नक्की आहेत तुम्ही खुप छान विस्तारक माहिती मधुबन गार्डन व माधवी माळी यांची दिलात माझ्या गावच्या असल्याचा आम्हाला अभिमान आहे .
    तुमचे मनःपूर्वक अभिनंदन

  2. खूपच सुंदर लेख आणि ताई सुद्धा.ताई सुंदरच कारण त्यांचा मला आलेला अनुभव.
    त्यांनी चौधार शेंगांचा प्रवास मी you tube वर पहिला.मला व्हिडिओ तर आवडलाच पण या शेंगा मी कुठंही पाहिल्या किंवा नावही ऐकले नव्हतं.पण फोन नंबर होता.त्यावर मी msg केला की ताई या बिया मला मिळतील का तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला कबूल करून बियाही पाठवल्या.आणि शेंगा पाठवण्याचही कबूल केलंय.या वरूनच त्यांचं वनस्पतीप्रेमा बरोबर माणुसकी दिसून आली.सलाम ताई तुमच्या कार्याला.आपले देशी बियाणे जपत आहात..प्रसार करत आहात खूप मोठी गोष्ट आहे.कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  3. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे माधवी ताई…बाक कामात एकदम निपुण
    आणि सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या ताईंना खूप.खूप शुभेच्छा

  4. छंदातून येवढे होऊ शकते आज वाचकांना कळाले असेल.
    आम्ही करु फुल शेती असे संत सावता माळी म्हटले आहेत ते ताईंनी करून दाखवले .

    मनापासून अभिनंदन

  5. खुप छान माहिती एखादा हिरा जो पर्यंत करागिराकडे जात नाही तोपर्यंत त्याला पैलू पडत नाहीत ते पैलू पडण्याचे काम मनीषा ताईंनी फार सुंदरपणे पार पाडले आहे असे मला तरी वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९