Wednesday, July 2, 2025
Homeयशकथाव्वा, शाहू व्वा….

व्वा, शाहू व्वा….

मुंबईत नुकत्याच झालेल्या मुंबई लिट फेस्ट मध्ये माझे मित्र शाहू पाटोळे यांच्या “अन्न हे अपूर्ण पूर्णब्रह्म” या जवळपास नऊ दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा भूषण कोरगावकर यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या आणि हार्पर कॉलिन्स प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या “दलित किचन्स ऑफ मराठवाडा” या इंग्रजी पुस्तकावर छान संवाद झाला.

महत्वाचे म्हणजे इंग्रजी प्राबल्य असलेल्या प्रेक्षकांचे अजिबात दडपण येऊ न देता प्रसंगी शाहू सरळ मराठमोळ्या भाषेत आणि तेही सडेतोडपणे उत्तरे देत होता. काहीं वेळा भूषण कोरगावकर त्याचा इंग्रजीत अनुवाद करून प्रेक्षकांना समजावून सांगत होता. शुभ्रा चटर्जी शाहू ला बोलते करत होत्या.

या संवाद सत्रानंतर शाहू चे पुस्तक घ्यायला चांगलीच रांग लागली होती. मी ही शाहू नको म्हणत असताना, हे पुस्तक विकत घेतले. या नंतर अनेक जण शाहू कडून अधिक माहिती घेत राहिले.

नंतर शाहू ने त्याचे “खिळगा” हे पुस्तक मला भेट दिले. तर मी माझे “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक त्याला भेट दिले. यावेळी शाहू च्या पुस्तकाचे प्रकाशक श्री जीवन कुलकर्णी हे ही उपस्थित होते.

एकंदरीतच शाहू ची साहित्यातील ही मुशाफिरी पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटत होता. आता विदेशातून ही त्याला त्याच्या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी निमंत्रण मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, असा विचार मनात चमकून गेला.

अशी ही शाहु ची लेखकिय गडबड पहात बसलेलो असताना शाहू शी आधी ओळख आणि नंतर मैत्री झाल्यापासून जीवन पट माझ्या डोळ्या समोर येऊ लागला.

शाहू ची आणि माझी ओळख झाली, ती १९८८ साली. तेव्हा तो मराठवाडा विद्यापीठात बॅचलर ऑफ जर्नालिझम हा कोर्स करायला आला होता. तर मी मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन हा कोर्स करायला (नाईलाजानेच, कारण पुणे विद्यापिठात हा कोर्स सुरू होईल म्हणून ४ वर्षे वाट पाहिली तरी सुरू होईना, म्हणून मग मराठवाडा विद्यापिठात सुरू झाल्याने तिथे प्रवेश घेतला !) गेलो होतो.

आयुष्यात मी कधीच फर्स्ट क्लास मिळवलेला नाही,याचे शल्य दूर करण्याची ही माझी शेवटची संधी होती. म्हणून मी दूरदर्शन मध्ये आहे, हे कुणालाच कळू न देता, हॉस्टेलमधील रूम, जर्नालिझम डिपार्टमेंट, लायब्ररी, कमीत कमी जनसंपर्क असे धोरण ठेवले होते. तरीही अशा परिस्थितीत शाहूशी मैत्री जुळली. प्रेम केल्या जात नाही, ते होतं असं म्हणतात, तसंच मैत्रीही केल्या जात नाही, ती तर होते जुळते असे मला वाटते, तसे ते शाहू च्या बाबतीत झाले.

दरम्यान दोन सेमीस्टर मधील महिना भराच्या सुट्टीत मी पुन्हा दूरदर्शन मध्ये जॉईन झालो. निर्माते सुधीर पाटणकर यांच्या वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर माहिती पट बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मी त्यांच्या सोबत निर्मिती सहायक असल्याने माहितीपट कसा, कुठल्या पैलूवर बनवावा, याची चर्चा करताना मी बाबा साहेब म्हणजे केवळ दलितांचे नेते आणि घटनेचे शिल्पकार अशीच जी त्यांची ओळख आहे, त्या ऐवजीं त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कसे शिक्षण घेतले आणि स्वतःला उच्च पदे मिळूनही त्यातच समाधानी न राहता इतरांना उच्च शिक्षित होण्यासाठी काय योगदान दिले,असा विषय सुचविला. तो त्यानाही आवडला. या माहितीपटासाठी प्रा रतनलाल सोनग्रा यांनी संहिता लिहिली होती. या माहिती पटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही ऑरंगाबादेत पोहोचले आणि जेव्हा लोकमत मध्ये चार कॉलम मध्ये “दूरदर्शन चे चित्रीकरण पथक ऑरंगाबाद मध्ये दाखल” अशी बातमी झळकली. त्या बातमीत माझे ही नाव होते, तेव्हा सर्वांना कळाले की, मी इथे नुसताच कोर्स करीत नसून दूरदर्शन मध्ये निर्मिती सहायक (निर्मिती सहायक पेक्षा सहायक निर्माता, हे सांगायला भारदस्त वाटते म्हणून आम्ही तसेच सांगायचो !) आहे म्हणून मग अचानक शेकड्याने नवं मित्र होऊ लागले. कुणी कवी, लेखक, नाटककार, कलाकार असे…ज्यांना ज्यांना दूरदर्शन वर संधी हवी असायची असे !) असे रोज सकाळ, संध्याकाळ भेटू लागले. अर्थातच त्या तात्पुरत्या ओळख्या असल्याने पुढे कायम राहिल्या नाहीत. कायम मैत्री राहिली असे मित्र म्हणजे शाहू, धरमसिंग चव्हाण आणि विनोद माळाले हे होत. असो…

तर माझा कोर्स पूर्ण झाल्यावर मी पुन्हा दूरदर्शन मध्ये जॉईन झालो. तर शाहू रेल्वे मध्ये क्लार्क म्हणून लागला. एकदा मी त्याला पुणे रेल्वे स्टेशन मध्ये सिमेंट पोती उतरत असताना ती मोजताना पाहिले आणि सिमेंट ने माखलेला म
शाहू पाहून तो मला ओळखुच आला नाही !

पुढे शाहू रेल्वे मधून भारतीय माहिती सेवेत दाखल झाला. (ती जाहिरात मीच त्याला दाखविली होती,असे त्याने फेसबुकवर लिहिले होते पण मला काही ते आठवत नव्हते ! असा हा शाहू चा प्रांजळ पणा !) मग त्याच्या नेमणुका, बदल्या सातारा, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई आणि नंतर तर पार मिझोराम,अहमदाबाद अशा होत गेल्या आणि त्या ही तो कर्तव्य बुध्दीने स्वीकारीत गेला आणि मी ही दूरदर्शन मध्ये यु पी एस सी मार्फत निर्माता, भारतीय माहिती सेवेत निवडला जाऊन शेवटी सारासार विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून लागलो. या सेवेत मी अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, पुन्हा मुंबई, नाशिक आणि शेवटी औरंगाबाद येथे सेवा करून निवृत्त झालो.

या सर्व काळात, सुरुवातीला आमचा नियमित पत्र व्यवहार होत असे. “देवेन प्रिय” अशी सुरुवात असलेली अशी अनेक पत्रे माझ्या अजून ही संग्रही आहेत ! बहुतेक माझी पत्रे त्याच्या संग्रही असतीलच, असे वाटते.

दरम्यान शाहू ची सरकारी नोकरी चालू असताना, त्याच्यातील लेखक ही घडत होता. बाबा आमटे यांनी काढलेल्या भारत जोडों यात्रेतील सहभागावर, निरीक्षणं यावर आधारित “भारत जोडो : उसवलेले दिवस” हे त्याचे पहिले पुस्तक. तर “अन्न हे अपूर्ण ब्रह्म”, “कडूसं”, “खिळगा” ही पुस्तके प्रकाशित झाली या भेटीत त्याने “खिळगा” हे पुस्तक मला भेट दिले.

“खिळगा” वाचताना तर मी शाहू ची समाजाची निरीक्षणे, खरा इतिहास, खोटा इतिहास याचे ज्ञान, त्या वर केलेले मार्मिक भाष्य वाचून मी चकितच झालो. आपण ओळखत होतो,तो शाहू हाच का ? असा मला प्रश्न पडला.इतका शाहू बदलत (अर्थात चांगल्या अर्थाने) गेला आहे आणि जात आहे. हे पुस्तक वाचून एका नव्याच शाहू ची मला ओळख झाली, हे मात्र खरे.

असा हा शाहू,स्वतःची मुळे न विसरलेला, ती जाहीरपणे मान्य करणारा, पोशाखात सुध्धा दिखावा न करता, ५० वर्षांपूर्वीचे लेखक, कवी, पत्रकार जसा पायजमा आणि खादी चा अर्ध्या बाह्यांचा झब्बा घालायचे तसा घालणाऱ्या ,पायात बूट नव्हे तर वहाणा घालणाऱ्या शाहू ची ओरिजिनालिटी एनसीपीए च्या हाय फाय वातावरणात तर अधिकच उठून दिसत होती आणि म्हणूनच मी उस्फूर्तपणे बोलून गेलो, व्वा, शाहू व्वा !

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मित्र असावा गारवा सारखा

    ह्या ओळी आठवल्या संपादक साहेब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४