Saturday, July 5, 2025
Homeलेखआतले आवाज !

आतले आवाज !

आवाजाचे विविध प्रकार आहेत. जसे की कोकिळेचा मंजुळ आवाज, पक्षांचा चिवचिवाट, गायकांचे गोड, मधुर आवाज ज्यामुळे प्रसन्न वाटते व मंत्रमुग्ध करून आपले ताण तणाव पळवून लावतात. संगीताची नाळ आपल्या जीवनाशी जणू जोडलेली असते. नाही का ?

आता अजून काही आवाजाचे प्रकार पाहू. जसे की वाहनांचा कर्कश आवाज, रुग्णवाहिकेचा धडकी भरणारा आवाज, आगीच्या बंबाचा जीवाला घोर लावणारा आवाज, भांड्याचा आवाज. असे एक न अनेक आवाज रोज आपण ऐकत असतो. घरात कधी कधी मोठमोठ्याने भांड्यांचा आवाज येतो. म्हणजे निर्जीव वस्तू ही आवाज करते नाही का ?

मात्र आज ज्या आवाजाबद्दल आपण बोलणार आहोत ना, तो आवाज ना आवाजच करत नाही बरं का ! आश्चर्य वाटले ना ? हे कसे शक्य आहे ? आवाज म्हणजे आवाज होणारच ना असे अनेक प्रश्न पडले ना ? हो सांगते, सांगते…… असे दोन आवाज जे आपल्यातच आहेत तो म्हणजे आपल्या मनाचा आवाज व मेंदू साद घालतो ना तो आवाज. हे आवाज अदृश्य असतात. ते फक्त जाणवतात. हे आवाज फक्त आपण स्वतःच ऐकू शकतो.

एकांतात बसल्यावर देखील आपण कधीही एकटे नसतो कारण आपले विचार सतत आपल्या सोबत असतात.हे आवाज सतत ऐकू येत असतात.अनेक वेळा काही निर्णय घेताना मेंदु एक सांगते तर मन दुसरे सांगते. ह्यांच्या विचारात त्यांच्या आवाजात खूप मोठा विरोधाभास असतो. मग खूप गोंधळ होतो. ऐकावे तरी कोणाचे ?

मेंदू खूप व्यवहारिक असतो त्यामुळे त्याची भाषा ही तशीच असते. अगदी प्रॅक्टिकल विचार करणारी. आपला फायदा तोटा पाहणारी. आपले हित कशात आहे ? फक्त त्याचा विचार करणारी. आकडे मोड करणारी. भविष्याचा विचार करणारी .अतिशय स्वार्थी .स्वतःपुरता विचार करणारी.

मात्र….. आपले मन ह्या सर्वांचा पलीकडे जाऊन विचार करते. ह्याला फक्त भावना कळतात. ते खूप हळवे असते. त्याला दुसऱ्याला दुखावणे जमत नाही. ते निस्वार्थी विचार करते. त्याचा आवाज तसाच असतो प्रेमळ. ते आनंद व समाधान शोधत असते. मनात अनेक विचारांचे काहूर दाटून येते. ते अतिशय निर्मळ असते. ते विचार आपल्या अंत:करणातून येत असतात.

मेंदू अहंकारी असतो. त्याला माघार घ्यायला आवडत नाही. त्याला कमीपणा नको असतो .तो कायम ताठ असतो आपल्या तोऱ्यात.

पण……जेव्हा नाती टिकवावी लागतात ना तेव्हा मात्र मनाचे ऐकावे लागते. जीवलगांचे मन सांभाळता सांभाळता आपले मन ही अनेक वेळा दुखवावे लागते. मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात.कारण परिस्थिती तसे वागायला भाग पाडते. हेच एक कटू सत्य असते. वरून सर्व छान दिसत असते म्हणजे तसे दाखवावे लागते. तसा आभास निर्माण करावा लागतो. मात्र काही जखमा खोलवर असतात. त्या मात्र कोणालाही दिसत नाही व त्या दिसू द्यायच्याही नसतात.

आपल्याला जर कोणी विचारले की काय झाले ? तर आपलं उत्तर असते काही नाही. मात्र….. ह्या काही नाहीत खूप काही असते. ह्याचे उत्तर जाणणारी खूप जवळची व्यक्ती असते जिला सर्व माहीत असते. त्याचे सुख दुःख व बरंच काही.

मनुष्याचे दोन चेहरे असतात. आत एक व बाहेर एक. हे मनाचे खेळ आयुष्यभर चालत असतात. ह्या खेळात अनेक वेळा मनालाच माघार घ्यावी लागते. मेंदू कधीही अपमान विसरत नाही. सतत बदला घेण्याच्या शोधात असतो. मात्र मन त्या यातना सहन करते. म्हणूनच ते अनेक वेळा दुखावल्या जाते.

एकवेळ शरीरावर मारलेले विसरता येते. पण बोललेले मात्र मनुष्य आजन्म लक्षात ठेवतो. ते बोचरे शब्द, ते टोमणे, सतत कमी लेखने, तो दिलेला त्रास कधीही विसरू शकत नाही. मन खूप दुखावले जाते. अनेक न दिसणारे ओरखडे असतात. आपल्याच जीवलगांनी दिलेले. तरी गप्प रहावे लागते. जणू आता मनाला सवय झालेली असते हे आघात सहन करायची.

आता तुम्हीच पहा. मेंदू व मन ह्याच्या विचारात किती मोठी दरी आहे. काही लोक म्हणतात की, नेहमी डोक्याने विचार करावा. ह्या आधुनिक जमान्यात प्रॅक्टिकल असले पाहिजे. नाहीतर लोक आपला गैरफायदा घेतात.तर काही लोक म्हणतात की, नेहमीच आपल्या मनाचे ऐकावे कारण ते नेहमी खरे बोलते व तो आवाज अगदी अंतःकरणातुन आलेला असतो आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातुन आलेला असतो. मनाने विचार करणारी व्यक्ती खूप हळवी असते, समंजस असते व समजूतदार पणे निर्णय घेते.

हा विचारांचा घोळ, हे आवाज आपण अनेक वेळा अनुभवतो. मात्र…..ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच खरे. जे आपल्याला योग्य वाटेल तोच निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटते ? सांगाल ना……?

रश्मी हेडे.

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. रश्मीने केलेले लिखाण एका वेगळ्याचं जगात घेऊन जातं, तिनं मनुष्य प्राण्याच्या मनाच्या वेदना अत्यंत वेगळ्या पण स्पष्ट भाषेत मांडल्या असून खरंच आयुष्यात जगताना खास करून महिलांना अनेक प्रकारची माणसं भेटतात, खासकरून लग्न आधीची व लग्नानंतराची माणसं, नातेवायिक, मित्र, मैत्रिणी या सर्वांशी जुळवून घेतानाप्रत्येक नात्याला न्याय देताना प्रत्येक मनुष्य प्राण्यासअशीच भूमिका निभवावी लागते मात्र आपण ते कधीही व कोणापुढेही उघड करत नाही पण रश्मीने हे धाडसाने सर्वासमोर मांडून एक वेगळीच किमया केलीली आहे, तुझ्या लिखाणाला तलवारी सारखी धार येऊदेत व तुझं उत्तम प्रकारच लिखाण होऊदेत हीच आम्हा साताराच्या सखीची मनापासून इच्छा, तुझं अभिनंदन व कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments