Thursday, December 26, 2024
Homeलेखमाझी जडणघडण : २५

माझी जडणघडण : २५

“संगीत”

आठवी इयत्तेत गेल्यानंतर आमच्या शालेय अभ्यासक्रमात थोडा बदल झाला होता. कुशल व्यावसायिक प्रशिक्षण बाबतीतला अभ्यासक्रम होता तो आणि त्यात होम सायन्स, चित्रकला आणि संगीत या तीन विषयांचा समावेश होता माझ्या बहुतेक वर्गमैत्रिणींनी पटापट त्यांच्या आवडीचे क्षेत्रं निवडली आणि नावेही नोंदवली. वेळ मलाच लागला कारण त्या वेळच्या माझ्या व्यक्तिमत्त्वासाठी यातला एकही विषय माझ्यासाठी तसा बरोबरच नव्हता म्हणजे यापैकी कुठल्याही विषयात मला फारशी गती होती असे वाटत नव्हते.

होम सायन्स या शब्दाविषयीही मला त्यावेळी फारशी आस्था नव्हती. माझ्या मते होमसायन्स म्हणजे घरकाम, शिवणकाम, भरतकाम, विणकाम, स्वयंपाक वगैरे… त्यावेळी तरी मला यात काही फारसा रस नव्हता.
चित्रकला हा विषय मात्र मला आवडायचा पण त्या कलेनच मला जन्मतःच नकार दिलेला असावा. माझी चित्रकला म्हणजे मोर, बदक, फारफार तर दोन डोंगरा मधला किरणांचा सूर्य, एखादी झोपडी, त्यामागे नारळाचं झाड आणि समोर वाहणारी दोन रेषांमधली नदी पण यातही सुबकता, रेखीवपणा वगैरे काही नसायचं. आधुनिक कला किंवा ज्याला आपण अॅबस्ट्रॅक्ट वगैरे म्हणतो ते त्यावेळी इतकं प्रचलित नव्हतं नाहीतर माझं हे चित्र कदाचित खपून गेलं असतं. फ्रीहँड, ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या वेळी माझी अक्षरशः भंबेरी उडायची. अशावेळी माझ्या प्रिय मैत्रिणी विजया, भारती, किशोरी या मला केवळ करुणेपोटी खूप मदत करायच्या ते वेगळं पण विशेष कौशल्य म्हणून मी चित्रकला हा विषय घेणे केवळ विनोद ठरला असता.

मग राहता राहिला तो संगीत हा विषय. एक मात्र होतं की आमच्या घरात सर्वांना संगीताविषयी खूप आवड होती. विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीत पप्पांना आणि ताईला फार आवडायचे. ताई सुंदर पेटी वाजवायची. ताईचा आवाज थोडासा घोगरा असला तरी तिला सुरांचं आणि तालांचं ज्ञान उपजतच होतं. (असे पप्पा म्हणायचे आणि तिने गायनात करिअर करावी असे पप्पांना वाटायचे त्याबाबत आमच्या घरात काय काय गोंधळ घडले हा संपूर्ण वेगळा विषय आहे तर त्याविषयी सध्या फक्त एवढंच..) पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी संगीत सभा आम्ही सर्वजण न चुकता ऐकायचो. त्या शास्त्रोक्त सुरावटीचा झोपेत का असेना पण थोडासा तरी अंमल चढायचा आणि त्यासोबत होणारी ताई -पप्पांची आपसातली चर्चाही मजेदार असायची..
“पपा पाहिलंत ? हा कोमल गंधार किती सुंदर लागलाय ..!”
नाहीतर पप्पा म्हणायचे, ”वा ! काय मिंड घेतली आहे..”
यानिमित्ताने ताना, आलाप, सरगम, सुरावट, कोमल, तीव्र, विलंबित, दृत लय ,राग, तीनताल, झपतात या शब्दांची जवळीक नसली तरी उत्सुकता वाटू लागली होती. आपल्याला हे पेलवेल किंवा झेपेल का याविषयीचा विचार त्या क्षणी इतका प्रबळ नव्हता. परिणामी मी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात संगीत हाच विषय निवडला.

आजही कधी कधी मनात येतं निदान पप्पांनी किंवा ताईने अर्थात मी ताईचा सल्ला मानला असताच असे जरी नसले तरीही मला थोडं योग्य मार्गदर्शन नको होतं का करायला ? पण आमच्या घरात हा नियमच नव्हता. “तुमचे निर्णय तुम्हीच घ्या” हीच प्रथा होती आमच्या गृह संस्कृतीत. “एकतर यश मिळवा, नाही तर आपटा, डोकं फोडून घ्या आणि त्यातूनच शहाणपण मिळवा आणि स्वतःला घडवा हेच तत्व होतं पण त्यातही एक मात्र अदृश्यपणे होतं की यशात अपयशात हे घर मात्र तुमच्याबरोबर आहे हे लक्षात असू द्या.” या एकाच आशेवर मी संगीत हा विषय घेतला.

एकदाच मी वर्गात ऑफ तासाला “एहसान तेरा होगा मुझपे…” हे गाणं म्हटलं होतं आणि मैत्रीचा मनस्वी आदर राखून आशा मानकर माझ्या पाठीवरून मी गात असताना हात फिरवत होती. तिच्या त्या स्नेहार्द स्पर्शाने तरी सूर-ताला चा संगम होऊ शकेल असा दुर्दम्य आशावाद आशाला वाटला असेल कदाचित त्यावेळी.

जाऊदे ! पण आम्हाला संगीत शिकवणाऱ्या फडके बाई मात्र मला फार आवडायच्या. तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व फारसं प्रभावी नव्हतं. मध्यम उंचीच्या, किरकोळ शरीरयष्टी, किंचित पुढे आलेले दात यामुळे त्यांची हनुवटी आणि ओठ यांची होणारी विचित्र हालचाल, नाकीडोळी नीटस वगैरे काही नसलं तरी रंग मात्र नितळ गोरा आणि चेहऱ्यावरची मृदू सात्विकता त्यामुळे त्या मनात भरायच्या. विशेषतः शिक्षकांमध्ये जो दरारा असतो आणि त्यामुळे जे भय निर्माण होते तसं त्यांच्या सहवासात असताना वाटायचे नाही कुणालाच. शिवाय त्या जेव्हा गात तेव्हा त्या विलक्षण सुंदर दिसत. तसा त्यांचा आवाज पातळ होता पण त्या अगदी सफाईदारपणे एकेका सुराला उचलत की ऐकत रहावंसं वाटायचं. पेटीचे सूर धरताना त्यांची निमुळती गोरी बोटं खूपच लयदार आणि सुंदर भासायची.

या संगीताच्या वर्गात आम्ही पाच सहा जणीच होतो. सुरुवातीला त्या राग, रागाची माहिती, सरगम, अस्थायी, अंतरा, वगैरे आम्हाला वहीत लिहून घ्यायला लावायच्या मग एकेकीला प्रश्न विचारून त्या रागाची बैठक चांगली पक्की करून घ्यायच्या. नंतर यायचा तो प्रत्यक्ष गायनाचा सराव. सुरावट त्या गाऊन दाखवायच्या आणि मग सामुदायिक रित्या उजळणी आणि त्यानंतर एकेकीला म्हणायला लावायचे सगळ्यांना. तेव्हा “छान” “सुरेख जमलं” “थोडा हा पंचम हलला बघ” असे सांगायच्या पण एकंदर समाधानी असायच्या. मात्र माझी गायनाची पाळी आली की त्यांचा चेहरा कसनुसा व्हायचा हे मला जाणवायचं. सुरुवातीला माझ्या आवाजाची पट्टी जमवण्यास त्यांना कठीण जायचं. काळी चार,काळी पाच..कसलं काय?

मग त्या हातावरच तीनताल वाजवत म्हणायच्या, ” हं ! असं म्हण. भूपरूप गंभीर शांत रस..”
मी हे पाचही शब्द सलग एकापाठोपाठ एक म्हणून टाकायचे. त्यात संगीत नसायचंच.आळवणं, लांबवणं शून्य. फडके बाईंच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचायला मिळायचं, ”का आलीस तू इथे ?”
आज हे आठवलं की वाटतं, ”कोण बिच्चारं होतं ?” मी की फडके बाई ?”
पण एक मात्र होतं की मला संगीताच्या लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत. कुठला राग कुठल्या थाटातून उत्पन्न होतो, कुठला राग कोणत्या प्रहरी गातात, कोणत्या तालात गायला जातो, त्यातले कोमल, तीव्र मध्यम स्वर.. रागाची बंदीश या सर्वांवर मी माझ्या दांडग्या स्मरणशक्तीने किंवा घोकंपट्टीने मात करायची.
“काफी रागातले कोणते स्वर कोमल ?”
मी पटकन सांगायची, ” ग आणि नी”. “भूप रागात कोणते सूर व्यर्ज असतात ?” “मध्यम निशाद” अशी पटापट उत्तरं मी द्यायचे पण प्रत्यक्ष गाणं म्हटलं की सारे सूर माझ्या भोवती गोंधळ घालायचे. एकालाही मला कब्जात घेता यायचे नाही.
“संगीत” या विषयामुळे माझा वर्गातला नंबर घसरू लागला. प्रगती पुस्तकात कधी नव्हे ते संगीत या विषयाखाली लाल रेघ येऊ लागली. ती बघताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरी फडके बाई खूप चांगल्या होत्या. त्या माझ्याबाबतीत कितीही हताश असल्या तरी त्यांनी माझं कधी मानसिक खच्चीकरण केलं नाही. मला कधीही सुचवलं नाही की, ”अजुनही तू विषय बदलू शकतेस.“
उलट “राग ओळखा” या तोंडी प्रश्न परीक्षेच्यावेळी वेळी त्या माझ्यासाठी नेहमी सोपी सरगम घ्यायच्या. ”हं ओळख.. सखी मोssरी रुमझुम बाssदल गरजे बरसेss”
मी पटकन म्हणायची- ”राग दुर्गा”
“हा ओळख. खेलो खेलो नंदलाsला हमसंग..” अर्ध्यातच मी सांगायचे “राग खमाज.”
“शाब्बास ! आणि आता हा शेवटचा
“शंकर भंडार डोले..” “ राग शंकरा..”
संपलं बाई एकदाचं…ही रॅपीड फायर टेस्ट मी पार करायची.

सर्व बरोबर म्हणून पैकीच्या पैकी गुण. गातानाचे मार्क्स मात्र त्या केवळ कॉम्प्लिमेंटरी म्हणून देऊन टाकायच्या.

पण आता मला वाटतं, की फडकेबाईंनाच वाटायचं का की माझा वर्गातला वरचा नंबर केवळ संगीतामुळे घसरू नये. कुठेतरी माझ्या इतर विषयातल्या प्राविण्‍याविषयी त्यांना अभिमान असावा म्हणून त्या मला कदाचित असेच गुण देऊन टाकत असतील.

संगीत विषयात माझी कधीच प्रगती होऊ शकली नाही हे सत्य कसे बदलणार ? पण पूर्ण चुकीच्या निर्णयाने सुद्धा मला खूप काही शिकवलं मात्र. मी आपटले, डोकं फोडून घेतलं, माझं हसं झालं, मैत्रिणींच्या नजरेत मला ते दिसायचं. मी टोटल फ्लॉप ठरले. आजच्या भाषेत बोलायचं तर माझा पार पोपट झाला.

पण तरीही काहीतरी “बरं” नंतर माझ्या मनात येऊ लागलं होतं. संगीतातल्या अपयशानेच मला एक सुंदर देणगी दिली. संगीत किती विलक्षण असतं! त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करताना मला प्रत्यक्ष खूप कष्ट पडले असले तरी एक आनंददायी कान त्यांनी मला दिला. गाता आले नाही म्हणून काय झाले ? मी संगीत या शास्त्राचा पुरेपूर आनंद ऐकताना घ्यायला नक्कीच शिकले. अनोळखी सुरांची सुद्धा शरीरांतर्गत होणारी काहीतरी आनंददायी जादू मला अनुभवता येऊ लागली. ती किमया मला जाणवू लागली आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला एक सुरमयी दिशा मिळाली. माझ्यातल्या जिवंत, संवेदनशील मनाची मला ओळख झाली. पुढे पुढे तर आयुष्य जगत असताना मला या संगीतातल्या शास्त्रानेच खूप मदत केली.
सात सूर कसे जुळवावेत, कोणते सूर कधी वर्ज्य करावेत, तीव्र, कोमल, मध्यम या पायऱ्यांवर कशी पावले ठेवावीत, योग्य प्रहरांचं भानही ठेवायला शिकवलं, कधी विलंबित तर कधी द्रुतलय कशी सांभाळावी, धा धिन धिन्ना ता तिन-तिन्रा या तालांचे अपार महत्त्व मला संगीतातूनच टिपता आले. गाता नाही आले पण म्हणून काय झाले? जीवनगाण्याचे मात्र मी बऱ्यापैकी सूरताल सांभाळू शकले. या क्षणी नाही वाटत मला की माझा निर्णय चुकला होता म्हणून! एका चुकलेल्या वाटेने माझ्या अनेक अंधार्‍या वाटांना उजळवले.

काही वर्षांपूर्वी मी ठाण्याला माहेरी गेले होते तेव्हा भाजी मार्केटमध्ये मला अचानक फडके बाई भेटल्या. एका क्षणात आम्ही एकमेकींना ओळखले. खरं म्हणजे त्यांनी मला ओळखावे हे नवलाईचे होते. एका नापास विद्यार्थिनीला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडावा हेही विशेष होते.त्यांनी आवर्जून माझी विचारपूस केली. घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि पटकन् खाणाखूणांसहित घरचा पत्ता ही दिला.

मी बराच विचार करून पण संध्याकाळी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातले तानपुरे, अंथरलेली सतरंजी, पेटी- तबला पाहून सुखावले. फडकेबाई खूप थकलेल्या दिसत होत्या. वय जाणवत होतं पण गान सरस्वतीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हाही होतं.
त्याच म्हणाल्या, “माझी मुलगीही आता सुंदर गाते. अगदी तैय्यारीने..”
खरं सांगू ? मला क्षणभर काही सुचेचना काय बोलावे ? संगीताच्या वर्गात होणारी माझी फजिती मला त्या क्षणीही आठवली. डोळे भरून आले. फडके बाईंनी माझ्या पाठीवर अलगद हात ठेवला. म्हणाल्या, ”नाही ग ! तू निश्चितच एक चांगली विद्यार्थिनी होतीस. तुझ्यात शिकण्याची तळमळ होती. त्यासाठी तू प्रयत्नशीलही होतीस.”
कदाचित त्यांनी त्यांच्या मनातलं बोलायचं टाळलं असेल तेव्हा मीच म्हणाले, ”आडात नाही ते पोहर्‍यात कुठून येणार ?”
मात्र त्या क्षणी मी त्यांच्या पायाला स्पर्श केला. गुरुपादस्पर्शाचा एक भावपूर्ण प्रवाह अनुभवला. गुरु-शिष्याचा वारसा नाही राखला पण मान राखला.माझ्यात नसलेल्या आणि त्यांच्यात असलेल्या कलेला केलेलं ते वंदन होतं.
“बाई ! माझ्यासाठी तुमचं ऋण न फिटण्यासारखं आहे. काय सांगू ? कसं ते ?
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. राधिकाताई तुमची स्मरणशक्ती दांडगी आहेच पण लेखन शैलीही खूप छान आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी लिहिता तेव्हा ती व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९