Friday, December 27, 2024
Homeलेख‌"माध्यम पन्नाशी" - १६

‌”माध्यम पन्नाशी” – १६

‘अनोळखी पाऊलवाटा” हे सदर लिहिण्याचा मनाशी निश्चय केला आणि विचारांच्या पावलांना कृतीची जोड देत वाटचाल सुरू झाली. वाटेतल्या शीलाखंडांना वळसा घालून पुढे जावं लागेल याची पूर्वकल्पना होतीच. त्यामुळे जे जे अनपेक्षित घटीत समोर येईल, त्या त्या प्रसंगाला तोंड द्यायची मनाची तयारी झालेली होती.

“अनोळखी पाऊलवाटा” या माहेर मधील सदरासाठी वरिष्ठ दूरदर्शन निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. त्यांच्या घरचा फोन नंबर मिळवला. एक दिवस घराजवळच्या एका दुकानातून सुहासिनीबाईंच्या घरी फोन लावला. फोन वाजला. पलीकडून “हॅलो”—- असा चिरपरीचीत आवाज कानी पडला. धडधडत्या हृदयाने जेमतेम बोलले, “नमस्कार. मी माधुरी प्रधान. आपण सुहासिनीबाई मुळगावकर ना? मला एका मुलाखतीसाठी आपल्याशी बोलायचं आहे. “शी इज आऊट” खट्ट ! फोन ठेवला गेला. पुन्हा फोन करण्याची माझी प्राज्ञा नव्हती. आवाज निःसंशय सुहासिनीबाईंचा होता. मग त्यांनी आपण बाहेर आहोत असं सांगून फोन का बर कट केला असावा ?

आता अशा कितीतरी चित्रविचित्र अनुभवांतून जावं लागणार आहे याची पूर्ण कल्पना आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार! तेच उत्तर !आता दूरदर्शनच्या कार्यालयातच फोन करावा असा मी निर्णय घेतला. पुन्हा एकदा शरद जांभेकर मदतीला धावून आले. त्यांनी दूरदर्शनचा फोन नंबर दिला. (अशा वेळी मोबाईलची उपयुक्तता प्रखरपणे जाणवते. आपली ओळख देणं, अपॉइंटमेंट घेणं हे काम मेसेजचे चार शब्द किती सोपं करून टाकतात!) फोन नंबर देताना शरद जांभेकर यांनी आवर्जून सांगितलं, “आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांच्या कार्यालयात सकाळी १० ते ११.१५ पर्यंत निर्माते आणि संचालक यांची कार्यक्रमांच्या संदर्भात बैठक चालू असते. त्यामुळे सगळे निर्माते साडेअकरानंतरच भेटतात. तू सुद्धा त्यावेळेलाच फोन कर. म्हणजे सुहासिनीबाई तुला फोनवर भेटतील. दुसऱ्या दिवशी अस्वस्थपणे मी साडे अकराची वेळ गाठण्यासाठी तयार बसले. दूरदर्शनच्या ऑपरेटरने बाईंच्या टेबलावरच्या इंटरकॉमशी मला जोडून दिलं. “हॅलो”—– -पुन्हा तोच चीरपरिचित आवाज! तो आवाज मी बरोबर ओळखला. बाईंना माझी ओळख आणि काम थोडक्यात सांगितलं. यावेळी मात्र सुहासिनी बाईंनी त्यांच वेळापत्रक पाहून मला चार दिवसांनंतरची वेळ दिली.

हूश्श! वेळ तर मिळाली. आता पुढची लढाई अधिक कठीण होती. हिमालया एवढं कर्तृत्व असलेल्या बाई! वय, अनुभव, सौंदर्य आणि ज्ञान सर्वच दृष्टीने उत्तुंग व्यक्तिमत्व !त्यांच्यासमोर मी सर्वच बाबतीत खूप खुजी होते. वय बाईंच्या वयाच्या निम्मे! अनुभव फारसा गाठीशी नाही. सौंदर्य आणि ज्ञान सर्वसाधारण ! त्यामुळे समान पातळीवरील गप्पा अशक्यच !असं असूनही उभयपक्षी संवादाचे सूर जुळायला तर हवेत! मग त्यासाठी मलाच काहीतरी मार्ग शोधायला हवा. मी सतत विचार करत राहिले. सुदैवाने मी सुहासिनीबाईंचे सर्वच कार्यक्रम आवर्जून पहात असे. मुलाखत घेताना त्या समोरच्या व्यक्तीशी किती अनौपचारिकपणे वागतात, बोलतात आणि त्या व्यक्तीचं अवघडलेपण कसं कमी करतात ते कौशल्य मी नकळत टिपत होते.

“परिक्रमा” सादर करणारे कमलेश्वर आणि सुहासिनीबाई यांच्या मुलाखतींच्या कौशल्याचा एकलव्याप्रमाणे अभ्यास आधीपासून सुरू होताच. त्याचबरोबर त्या लिहीत असलेलं “सकाळ” मधील ‘सदाफुली’ हे सदरही मी नियमित वाचत असे. असं असलं तरी एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या मुलाखतीतून वाचकांसमोर सादर करताना त्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर, अनेक ज्ञात अज्ञात पैलू स्वतःला ठाऊक असणं गरजेचं होतं. दूरदर्शनवरील कार्यक्रमाची निर्माती म्हणून त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी, दूरदर्शनच्या माध्यमाशी जवळून ओळख असणाऱ्या व्यक्तीशी बोलणं गरजेचं होतं.आपली मुलाखत उथळ वरवरची वाटू नये यासाठी नेमका अभ्यास कसा करावा याचा मनांत सतत विचार सुरू होता. अचानक सुहासिनी बाईंना जवळून ओळखणारे, त्यांच्यासाठी दूरदर्शनवर नाट्यसंगीताचे कार्यक्रम करणारे मित्रवर्य शरद जांभेकरांची मला आठवण आली. मी त्यांना भेटले. मैत्रीला जागून शरद जांभेकरांनी मला सुहासिनीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या स्वभावाची आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खूप छान माहिती दिली. न रहावून मी त्यांना पहिल्या फोनचा किस्सा सांगितला. ते हसले. म्हणाले,” तू बाईंना घरी फोन केलास ना? तुझं काम औपचारिक आहे . तेव्हा त्याविषयी कार्यालयातच बोलायला हवं. घरच्या फोनवर बोलायचं नाही, हा बाईंचा कडक दंडक आहे. बाई अत्यंत शिस्तप्रिय आहेत. पण मोकळ्या मनाच्या आहेत. मुलाखत घेण्यापूर्वी तू चांगला अभ्यास करून त्यांच्यासमोर बसली आहेस हे त्यांच्या तात्काळ लक्षात येईल आणि त्या तुझ्याशी खुलून बोलतील.”

शरद जांभेकर यांनी दिलेली ही सूचना सर्वच मुलाखतींसाठी गेली ५० वर्ष मी अंमलात आणते आहे . कोणत्याही व्यक्तीसमोर मुलाखतीसाठी बसताना त्या व्यक्तीच्या कार्याविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी सर्वांगीण माहिती घेतली, तरच मुलाखत अनौपचारिक, खेळीमेळीची पण सखोल होते . उथळ, वरवरची होत नाही असा अनुभव आहे. मात्र काही वेळा त्या व्यक्तीकडून थेट माहिती मिळवता येत नाही. अशावेळी त्या व्यक्तीच्या परिचितांकडून ते व्यक्तिमत्व जाणून घ्यावं लागतं. वृत्तपत्रांमधील लेखांतून, दूरदर्शन व आकाशवाणीच्या कार्यक्रमांतून अथवा व्यासपीठावरून त्यांनी सादर केलेल्या व्याख्यानांमधून सर्वंकष माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. यासाठीच सजगपणे वृत्तपत्रांचं वाचन करणं, दूरदर्शनवरील अभ्यासपूर्ण कार्यक्रम पहाणं‌ आणि व्याख्यानांना हजेरी लावणं या गोष्टी स्वतःच्या अभ्यासासाठी खूपच आवश्यक ठरतात. मुलाखत म्हणजे केवळ प्रश्न आणि उत्तर असं ठराविक साचेबद्ध स्वरूप नसून, तो एक अनुभवांच्या, विचारांच्या देवाण-घेवाणीचा प्रवास असतो. तो प्रवास अतिशय आत्मीयतेने व्हावा असा प्रयत्न करण्याची मानसिक बैठक सुहासिनी मुळगावकरांच्या त्या पहिल्यावहिल्या मुलाखतीने तयार केली. त्या मुलाखतीच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत एके ठिकाणी मी लिहिलं होतं,”बहुविध भावावस्थांमध्ये स्वतः भिजणाऱ्या आणि आपल्यालाही चिंब भिजवणाऱ्या चैतन्य सरीतेच नाव आहे सौ. सुहासिनी मुळगावकर! एकाच वेळी गायन, वादन, साहित्य, अभिनय अशा बहुविध कलांमधील त्यांचं प्राविण्य पाहून आपण थक्क होतो. पण त्यात काही नवल नाही. कारण हाडाच्या कलावंताच्या उर्मीच एवढ्या प्रखर असतात की कारंज्याच्या नाना छिद्रांमधून पाण्याचा फवारा उसळावा, तशा जीवनाच्या विविध अंगांतून त्या प्रकट होऊ पाहतात. त्यांना थोपवणं, बांध घालणं हे मग त्या कलावंताच्याही हातात उरत नाही. मग त्याची प्रतिभा कधी शब्दांतून वा सुरांतून , कुंचल्यातून वा लेखणीतून, वाणीतून अथवा वचनातून, कृतीतून अथवा उक्तीतून सतत प्रकट होत जाते .अस्सल कला लोकमान्यतेच्या प्रकाशात हिऱ्यासारखी लखलखून जाते आणि त्या कलावंताचच नव्हे तर त्याच्या चाहत्यांची ही मनं उजळवते. सुहासिनी मुळगावकर या अशाच प्रतिभावान कलावंतांपैकी एक!
‌‌
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काय नाही ? पुस्तकांच्या बाबतीतला काटेकोरपणा आहे. तसाच निवेदिकेपासून कपड्यांपर्यंत निवड करण्यातला चोखंदळपणाही आहे. टेबलावरील फुलांना अलवारपणे कुरवाळणारी ऋजुता आहे. तसंच पाडगावकरांची कविता असो की मी नेसलेली गर्द टोमॅटो रंगाची साडी असो, कोणत्याही सुंदर गोष्टीला नकळत दाद देऊन जाणारी रसिकता आहे. ही उत्कट रसिकता, निर्मळ आणि निकोप मनोवृत्तीतून जन्मलेली आहे हे विशेष !
हसत खेळत वेगवेगळ्या मूड्स मधून जात मारलेल्या तास दोन तासांच्या गप्पांमधून सर्वार्थाने आयुष्य उपभोगलेल्या या रस रंगीत सदाबहार व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण शोध घेतल्याचा दावा मी करणार नाही. पण जे रूप जसं दिसलं भावलं ते तसंच्या तसं शब्दांतून रेखाटण्याचा मी फक्त प्रयत्न केलाय.

मुलाखतीचा समारोप करताना अक्षरशः भारावलेल्या अवस्थेत मी बोलून गेले होते ,” बाई मध्यंतरी शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी वाचली. छावा, मृत्युंजय, ययाती अशा काही साहित्यकृती वाचल्या की वाटतं आपण काही लिहूच नये. या प्रतिभवान कलावंतांनी सरस्वतीसाठी विणलेली महावस्त्र ही! आपण आपल्या लिखाणाची ठिगळं त्याला जोडू नये. तसच तुमच्यासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व भेटलं ना की वाटतं आपण करावं असं काही हयांनी बाकी ठेवलंच नाही. आपल्या धडपडीला काही अर्थच उरत नाही मग. फार निराश वाटतं !”
त्यावर बाई उतरल्या होत्या, “तसं वाटायचच माधुरी! मोगूबाई कुर्डीकर यांचं गाणं ऐकताना पूर्वी मलाही असंच वाटायचं. वाटायचं, दैवी सूर आहेत हे! आपल्या गळ्यातून कधी निघायचेच नाहीत. पण तरी माणसाने निराश होऊ नये. सतत उत्साही असावं. धडपडत राहावं. एवढे बरे वाईट अनुभव घेतलेत मी. पण मला आयुष्याचा उबग कधी येतच नाही. आता परवा मी पाडगावकरांची ती कविता ऐकली. “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!” मला फार आवडली ही कविता आणि “जगणं” हा शब्द जो घातलाय पाडगावकरांनी ! हॅट्स ऑफ टू पाडगावकर! मी लगेच फोन केला पाडगावकरांना! म्हटलं हे “जगणं” आहे ना पाडगावकर ते दैनंदिन जीवन आहे आणि त्याच्यावर तुम्ही प्रेम करा म्हणता ! म्हणजे ही कल्पनाच किती सुंदर आहे! केवढं चॅलेंज आहे त्यात! दिवस उगवतो. दिवस मावळतो. या प्रत्येक दिवसात किती किती घडतं. काही आपल्या मनासारखं घडतं. काही आपल्या मनाविरुद्ध घडतं. काही वेळा कल्पना नसताना अनपेक्षित सुंदर घडत. कधीवेळा अनपेक्षित वाईट घडतं. हे जगणं आहे आणि ते हिंमतीने जगायला ताकद लागते आणि ही हिंमत, ही ताकद काही इंजेक्शन सारखी टोचून बाहेरून आत घेता येत नाही. ही मनाची उभारी तुमची तुम्हालाच घ्यावी लागते. ही उभारी तुम्ही उगवत्या सूर्यबिंबांतून घेता, निळ्या आकाशात उडणाऱ्या पक्षांच्या थव्यावरून घेता, वसंतात झाडावर फुटणारी कोवळी पालवी असते तिच्यातून घेता. एकदा ही उभारी मनानं घेतली की आयुष्य एवढा निरामय आनंद देऊन जातंं की ते कधी संपूच नये असं वाटतं! मी ही आयुष्यावर असच उदंड प्रेम करते आणि करत राहणार आहे”.

माहेर मासिकाच्या मे १९८१ साली छापून आलेल्या या “अनोळखी पाऊलवाटा” सदरातील शुभारंभाच्या मुलाखतीने सुहासिनीबाई मुळगावकर या उत्तुंग व्यक्तिमत्वाशी माझा परिचय झाला. या परिचयातून पुढे अतूट स्नेह निर्माण झाला. मुलाखतींच्या क्षेत्रांत गुरुस्थानी राहून, त्यांनी दिलेली मौल्यवान शिकवण ही माझ्या भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली.

मात्र सुहासिनीबाईंच्या छत्रछायेखाली सुरू झालेली ही वाटचाल शितल सौम्य नव्हती. कडक शिस्तीच्या झळझळीत उन्हाच्या चटक्यांची दाहकता त्यात होती. मात्र वास्तवाच्या याच दाहक चटक्यांमुळे भावी आयुष्यात माध्यमांच्या जगातील चिरंतन शिकवणुकीचे अतिशय मौल्यवान धडे मी गिरवले. सुहासिनीबाई मुळगावकरांच्या याच शिकवणुकीतून माझ्यासारखी एक नवोदित कलाकार माध्यमांच्या या जगांत आयुष्यभर घट्ट पाय रोवून उभी राहू शकली.
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. “अनोळखी पाऊलवाटा” ह्या सदराचा शुभारंभ सुहासिनीबाई मुळगावकरांसारख्या प्रसन्न आणि उत्तुंग व्यक्तीमत्त्वाशी झाला.खूपच छान!!हा परिचय,स्नेह तुमच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरला हे तुम्ही माध्यमाच्या जगात आजपर्यंत यशस्वीपणे उभ्या आहात ह्यावरुन सिध्द झालं आहे.तसेच ही लेखमाला माध्यम क्षेत्रातील नवोदितांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल हे देखिल तितकच खरं आहे.

  2. खूप सुंदर शब्दांकन. तुमचे हे लेखन नवोदित मुलाखतकारांना मार्गदर्शक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९